कोण म्हणतं एथिक्स गुंडाळून ठेवा, तरच करिअर करता येईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 07:25 IST2019-09-12T07:25:00+5:302019-09-12T07:25:01+5:30
चिरीमिरी दिली, चुघल्या केल्या, पुढे पुढे केलं डल्ला मारला तर कोण देईल नोकरी?

कोण म्हणतं एथिक्स गुंडाळून ठेवा, तरच करिअर करता येईल?
-विनायक पाचलग
मूल्य, तत्त्व हे सगळे तसे बोजड विषय ! पुस्तकात वाचून सोडून द्यायचे वगैरे. पण, तुमची मूल्य काय आहेत यावर तुमचं करिअर अवलंबून आहे असं सांगितलं तर? होय, हे खरं आहे.
लोकांना स्किल्स शिकवता येतात. सॉफ्ट स्किल्स, संभाषण कौशल्य वगैरे जर का येत नसेल तरी काम चालून जातं. पण, तुमचे एथिक्स जर का स्ट्राँग नसतील, तर ते व्यक्तित्व मात्र बदलता येत नाही. त्यामुळे आजच्या जगात जर का तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुमच्याबद्दल विश्वास, तुमच्या निष्ठेवर कंपनीची श्रद्धा असायलाच हवी !
आजच्या जगात एथिक्स का महत्त्वाचं याचा अंदाज येण्यासाठी नेटफिलिक्स वरची ‘द ग्रेट हॅक’ नावाची डॉक्युमेंट्री पाहिल्यावर येतो. आज तुमच्याकडे जर का लाखो लोकांचा खासगी डेटा असेल तर तुम्ही काय कराल? तो विकून पैसे कमवाल की तो जिवापाड जपाल? या क्षणी तुम्ही जो निर्णय घ्याल तो जगावर इम्पॅक्ट करेल आणि तुमची मूल्य काय हेही दाखवून देईल. आजच्या जगात जेव्हा सगळं ऑनलाइन आणि व्हच्यरुअल होत चालला आहे तेव्हा माणसाची सद्सद्विवेकबुद्धीची किंमत वाढत चालली आहे. तुम्हाला जर का लाच देऊन ट्राफिकच्या नियमातून सुटायची सवय असेल, तर कदाचित येथून पुढं कंपन्या तुम्हाला नोकरीवर घेण्यास फारशा उत्सुक नसतील. कारण तुम्ही फायद्यासाठी कॉम्प्रोमाइज करता हे त्यातून स्पष्ट होतं.
आजकाल एखादा प्रोग्रॅम एखाद्या पेनड्राइव्हमध्ये असतो ज्याची किंमत कोटय़वधी रु पये असते, किंवा एखादा फोटो लिक झाल्यास सेकंदात तो जगभर जाऊ शकतो. या गतीमुळे विश्वास ठेवणारी माणसे लागतात. नाहीतर सत्यानाश होतो. लोक दर 2 -3 वर्षाला आजकाल नोकर्या बदलतात, तेव्हा आधीच्या कंपनीतील ट्रेंड सिक्रे ट्स सोबत घेऊनच पुढे जात असतात. त्यांनी ती वापरावीत का नाही? ती त्यांनी वापरू नयेत यासाठी काय करावं? असे अनेक प्रश्न आजच्या जगात आहेत.
जग विश्वासावर चालते. जेव्हा तुम्ही एखादी ओला किंवा उबर बुक करता तेव्हा तुम्ही आजवर पूर्वी कधीही न भेटलेल्या त्या ड्रायव्हर वर विश्वास ठेवता. तो आपल्याला सेफली हव्या त्या जागी पोहोचवेल अशी खात्री आपल्याला वाटते. एअर बीएनबीवर एखाद्या अनोळखी माणसाच्या घरी तुम्ही राहता, किंवा होस्ट करता तेव्हा तुम्ही विश्वासच टाकता. या कंपन्यांवर टाकलेला तो विश्वास असतो. अशी एखादी गोष्ट करताना तुम्ही त्या संस्थेचे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर असता. त्यामुळे या कंपन्यांना एखाद्या वेळेस ड्रायव्हिंग स्किल्स कमी असलेले चालेल; पण त्याचे एथिक्स आणि वर्तणूक मात्र उत्तम असायला हवी. त्यामुळे अर्थातच ते नोकरी देताना उमेदवाराची मूल्य तपासणार.
आजवर जगातला कोणताही ब्रॅण्ड हा त्याने किती प्रॉफिट मिळवला यावर टिकत नाही तर त्यांची मूल्यं काय आहेत यावर टिकतो. आपल्याला माहीत असणारा टाटा हा ब्रॅण्ड त्यांचे उत्तम उदाहरण आहे. आपण टाटाला त्यांच्या व्हॅल्यूजवरून ओळखतो आणि विश्वास ठेवतो ते नक्की काय काय प्रॉडक्ट्स बनवतात हेही आपल्याला माहीत नसतं. काही क्लुप्त्या करून, अनएथिकल गोष्टी करून शॉर्ट टर्ममध्ये फायदा मिळवता येतो; पण लॉँग टर्ममध्ये त्याचा तोटाच होतो त्यामुळे येथून पुढच्या जगात मूल्याना महत्त्व येणार.
आजवर आपण मूल्यशिक्षण असा विषय शिकून सोडून दिला, चलता है म्हणत जगत राहिलो. आता मात्र मूल्यांवर फोकस करायला हवाच..