Who decides on social media what to suppress and what to go viral? | काय दडपायचं नि काय व्हायरल करायचं, हे सोशल मीडीयात कोण ठरवतं?
काय दडपायचं नि काय व्हायरल करायचं, हे सोशल मीडीयात कोण ठरवतं?

ठळक मुद्देसर्वाधिक ग्राहकांना जे हवं तेच करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. त्यातून मग ग्राहकांना अमुक नको असं सांगून बर्‍याच गोष्टी दडपण्याचा प्रकार होतो.

- मुक्ता चैतन्य

सोशल मीडियाची सगळ्यात मोठी ताकद कोणती?
तर सगळ्यांना समान संधी.
अर्थात असं आपण मानतो.
कुठला स्मार्टफोन वापरायचा त्यात इंटरनेटसाठी कुठल्या कंपनीचा डेटा प्लॅन वापरायचा, कुठला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरायचा आणि तिथे काय लिहायचं हे जो-तो आपापलं ठरवतो. तसं बिनधास्त करतो. लिहून -पोस्ट करून मोकळा होतो. 
जात, धर्म, लिंग आणि वर्णभेद असा कुठलाही भेद सोशल मीडियात व्यक्त करताना केला जात नाही. कुणी कधीही कुठलंही तंत्रज्ञान, गॅजेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकतो. 
सगळं सगळ्यांसाठी खुलं आहे. हीच या माध्यमांची सगळ्यात मोठी ताकद आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाला आधुनिक जगात क्रांती म्हणण्याची पद्धत आहे.
पण खरंच असं आहे? म्हणजे जे वरकरणी दिसतं, तसा मुक्त संचार आणि स्वातंत्र्य सगळ्यात आहे का? खोलात जाऊन विचार केला तर खरंच सोशल मीडिया हे सगळ्यांसाठी मुक्त व्यासपीठ आहे का?
इथे कुणीही काहीही, कधीही शेअर करू शकतं का?
नियमांच्या कचाटय़ात भेदभाव होतंच नाही असं आपण छातीठोकपणे म्हणून शकतो का?
दुर्दैवानं या प्रश्नांचं उत्तर नाही, असंच आहे.
सोशल मीडिया हे जितकं मुक्त माध्यम आहे तितकंच ते भेदभाव करणारं माध्यम आहे. 
विश्वास नाही बसत? मग कसं ते  समजून घेऊया.
काही दिवसांपूर्वीच टिकटॉक या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉमने मान्य केलं आहे की ते जाणीवपूर्वक दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू समुदायाचे व्हिडीओ दाबतात. सप्रेस करतात. दडपून टाकतात. म्हणजे पोस्ट फार लोकांना दिसू देत नाहीत.
टिकटॉकच्या म्हणण्यानुसार या गोष्टी खरं तर ते दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू समुदायाच्या सुरक्षेसाठी करतात. तसे व्हिडीओज ट्रॉल होऊ नयेत म्हणून दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू व्यक्तीचे व्हिडीओ जास्त व्हायरलच  होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते. 
प्रत्यक्षात या विषयात काम करणार्‍या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू  व्यक्तींचे व्हिडीओ जाणीवपूर्ण दडपले जातात. टिकटॉकवर यूझर्सना विचारलं जातं की दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू व्यक्तीच्या अमुक तमुक व्हिडीओला ट्रोल होईल असं वाटतं का?
आणि यूझर्सनी कर ट्रोल होईल असं सांगितलं तर ते व्हिडीओज दडपले जातात.
म्हणजे एकीकडे व्हिडीओ पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य तर दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू  व्यक्तीला आहे; पण ते व्हिडीओ कितपत व्हायरल होऊ द्यायचे याचा निर्णय कंपनी घेते.
 यासंदर्भात असंही म्हटलं जातं की यूझर्सपैकी अनेकांना दिव्यांग आणि एलजीबीटीक्यू व्यक्तींचे व्हिडीओ बघायला आवडत नाहीत. कारण या वर्गाविषयी गैरसमज, चुकीच्या धारणा आणि आकस असणार्‍यांची संख्या सोशल मीडियावर आजही प्रचंड आहे. 
त्याचा परिणाम म्हणून या वर्गाचे व्हिडीओच मागे टाकले जातात.
आता हा प्रकार काही अपवाद म्हणावा का?
तर तेही नाही. 
याबाबत फेसबुकवरची एक केस आवर्जून नोंदवायला हवी.
आल्टन टॉवर्स रोलर कोस्टर राईडला 2 जून 2015 मध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात विकी बाचने तिचा एक पाय गमावला. त्यानंतर कृत्रिम पायाच्या साहाय्यानं तिचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. विकीचा एक सेन्शुअस व्हिडीओ अ‍ॅबिलिटी अ‍ॅक्सेस या दिव्यांग व्यक्तींच्या फेसबुक पेजवर शेअर केला होता.
मात्र  तो काढून घ्यावा म्हणून फेसबुककडून सांगण्यात आलं. कारण विचारल्यावर फेसबुकडून सांगण्यात आलं की, फेसबुक यूझर्सपैकी अनेकांना दिव्यांग व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ बघणं आवडत नाही. ते त्यांना डिस्टरबिंग वाटतात. थोडक्यात, यूझर्सच्या ऑनलाइन प्लेजर्सच्या कल्पनांच्या ते आड येतात. यावर बरंच वादळ झालं आणि  शेवटी फेसबुकने विकी आणि पेजची जाहीर माफी मागितली. पण व्हिडीओ मात्र कधीही त्या पेजवर दिसला नाही. कारण यूझर्सच्या प्लेजर कल्पनांच्या आड येणारा  व्हिडीओ त्यांनी कम्युनिटी गाइडलाइन्सच्या कचाटय़ात अडकवला आणि ऑफ लाइनच ठेवला.

याच संदर्भात बॉस्टनमध्ये रूडेर्मन फॅमिली फाउण्डेशनच्या अंतर्गत मिरिअम हेयमन त्यांनी एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात त्यांना असं आढळून आलं की दिव्यांग विद्याथ्र्याना इतर विद्याथ्र्याच्या तुलनेत 1.8 जास्त वेळा सायबर बुलिंगला सामोरं जावं लागतं असं दिसून आलं.
आणि त्याचवेळी  सर्वेक्षणात असंही दिसून आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिव्यांग विद्याथ्र्याना मोठय़ा प्रमाणात सहकार्यही मिळत असतं.
मुद्दा काय तर ऑनलाइन जगात ट्रोलिंग आणि सायबर बुलिंग कुणालाही होऊ शकतं. त्यासाठी ती व्यक्ती दिव्यांग किंवा एलजीबीटीक्यू आणि संलग्न समुदायातील असायला हवी असं अजिबात नाहीये. तरीही दिव्यांग किंवा एलजीबीटीक्यू आणि  संलग्न समुदायाव्यतिरिक्तच्या यूझर्सना खूश करण्यासाठी टिकटॉक, फेसबुक आणि इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक छुपा अजेंडा चालवला जातो. दिव्यांग किंवा एलजीबीटीक्यू आणि संलग्न समुदायातील व्यक्तींना वेगळं वागवलं जातं जी आधुनिक काळातली असमानता आहे. आणि बहुसंख्यांच्या आवडीनिवडींसाठी काही गटाची अभिव्यक्तीच दडपणं हेही चूक आहे. 
खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे ग्रह, समजुती, भेदभावाच्या भिंती ओलांडून जाण्याची संधी माणसांना आणि माध्यमांना आहे; पण प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही. कारण तंत्रज्ञानामुळे जरी समान संधी मिळालेली असली तरी माणसांच्या मनातल्या भेदाच्या भिंती कायम आहेत. 
हे सगळं कधी बदलेल का? 
भेदभावाच्या आभासी जगातल्या भिंती कधी पडतील का?
याचं उत्तर एकच, खर्‍या  जगातल्या भिंती जर कोसळल्या तरच आभासी जगातल्या भिंती नाहीशा होतील. अन्यथा, निरनिराळ्या मार्गानी विविध भेदांच्या भिंती पुनर्‍ पुन्हा उभ्या होत राहातील.
तसं होऊ नये म्हणत आपण सजग असलेलं बरं!

**********************
सोशल मीडिया एक प्रकारे माणसांच्या मनाचं, समाजाचं प्रतिबिंबच असल्यामुळे तिथे बहुसंख्याकांचं मत गृहीत धरलं जात नाही, असं नाही. भेदाभेद, आकस, रोष आणि एकांगी मतं तिथंही आहे. त्यामुळे समाजापेक्षा काही वेगळं चित्र बघायला मिळेल अशातला भाग नाही. 
महत्त्वाचं म्हणजे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स चालवणार्‍या कंपन्यांसाठी हा एक व्यवसाय आहे.
 त्यामुळे सर्वाधिक ग्राहकांना जे हवं तेच करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. त्यातून मग ग्राहकांना अमुक नको असं सांगून बर्‍याच गोष्टी दडपण्याचा प्रकार होतो.


( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 

Web Title: Who decides on social media what to suppress and what to go viral?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.