कोवळे क्रिमिनल कोण पोसतं?
By Admin | Updated: August 22, 2014 11:59 IST2014-08-22T11:59:58+5:302014-08-22T11:59:58+5:30
मिसरुडही न फुटलेली, तारुण्याच्या उंबरठय़ावरची मुलं. गंभीर गुन्हेकरण्याची हिंमत करतातच कशी?

कोवळे क्रिमिनल कोण पोसतं?
>यूवर मनी इज माय मनी.
तुमचा फोन, तो माझा फोन.
तुमची बाईक, ती माझी बाईक.
जे जे दुसर्याकडे आहे, ते ते सारं माझंच.
जशी वस्तू, तशीच अब्रू.
घेतली दुसर्याची अब्रू.
त्यानं असं काय बिघडलं?
ग्लोबलायझेशननं अनेक गोष्टी आल्या. चांगल्या आणि वाईटही.
त्यातलाच हा प्रकार.
लहान वयात, मिसरुडही न फुटलेली, तारुण्याच्या उंबरठय़ावरची मुलं. गंभीर गुन्ह्यांत अडकताहेत.
का होतंय असं??
**
पूर्वी वयाच्या विशी-पंचविशीनंतर ज्या गोष्टी दिसायच्या, मिळायच्या, ज्यांचा अनुभव घेता यायचा त्या सार्या गोष्टी मिळण्याचं, दिसण्याचं, पाहाण्याचं, हाताळण्याचं वय कितीतरी खाली आलंय.
आजच्या मुलांना खूपच लवकर ‘एक्स्पोजर’ मिळतंय.
पण ‘एक्स्पोजर’ नेमकं कशाला म्हणायचं?
कारण डिप्रेशनचा वयोगट किती खाली आलाय.
मद्यपान करणार्यांचं वय किती कमी झालंय.
शाळकरी मुलंही आज ड्रग्ज घेताना दिसतात.
गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचं वय कितीतरी कमी झालंय.
‘बॉयफ्रेंड’ किंवा ‘गर्लफ्रेंड’नं ‘नकार’ दिला म्हणून, ‘अपसेट’ झालो म्हणून, ‘मनासारखं’ झालं नाही म्हणून किंवा कोणीतरी ‘बोललं’, ‘अपमान’ केला म्हणून थेट आपलं आयुष्यच संपवणारी, आत्महत्त्या करणारी किती मुलं आजूबाजूला दिसतात!.
पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड तपासलं तर लक्षात येतं, कोणत्या वयातली मुलं काय काय गुन्हे करतात!.
लैंगिक गुन्हे करणार्यांचा वयोगट.
लैंगिक अनुभव घेणार्यांचा वयोगट.
- सगळ्याच गोष्टींचा वयोगट दिवसेंदिवस कमी कमी होतोय.
आजच एका ११ वर्षांच्या मुलाला त्याचे पालक माझ्याकडे घेऊन आले.
हा मुलगा घरातून आणि संधी मिळेल तेव्हा चोर्या करतो, सायबर कॅफेत जातो आणि पोर्नोग्राफी पाहतो.
अशी कितीतरी मुलं.
अनैतिक आणि गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करणारी मुलं सगळीकडेच दिसतात.
ही ‘चिमुरडी’ मुलं का करतात असं?
याला कोण जबाबदार?
ती मुलं?
- निश्चितच नाहीत.
त्याला समाजही जबाबदार आहे.
मुलं ‘बिघडलेली’ नाहीत, आपली ‘व्यवस्था’च कोसळलेली आहे.
समाजाचा धाक राहिलेला नाही.
कुठल्या व्हॅल्यूज, कोणते आदर्श आज मुलांसमोर असतात?
शाळा डोनेशनशिवाय प्रवेश देत नाही, ‘क्लास’वाले संपूर्ण वर्षाची फी घेतल्याशिवाय मुलाला बसू देत नाहीत.
मुलं कुठला आदर्श घेणार?
सारा दोष मुलांवर ढकलून आपल्याला नामानिराळं होता येणार नाही.
त्याला आपला समाजही जबाबदार आहेच.
पण आपण मुख्य आजारापेक्षा त्याच्या लक्षणांवरच उपचार करत बसलो तर
‘रोगी’ आणि ‘रोग’ कसा बरा होणार?
- डॉ. हरिष शेट्टी
(ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ)
शब्दांकन - ऑक्सिजन टीम
‘हाय रिस्क’ मुलं कशी ओळखायची?
जी मुलं गुन्हेगारी कृत्यांत अडकू शकतात, अशी ‘हाय रिस्क’ मुलं शाळांशाळांतून हुडकणं फारसं अवघड नाही.
खूप अस्वस्थ असणारी, क्षुल्लक कारणांवरून चिडणारी, रागाच्या, भावनेच्या भरात काहीही करायला तयार होणारी मुलं, ‘आत्ताच्या आत्ता पाहिजे’ आणि त्यासाठी उतावीळ कृत्यं करणारी मुलं, ज्यांची गुन्हेगारीची ‘हिस्ट्री’ आहे अशी मुलं. ही सारी मुलं ‘हाय रिस्क’ गटात मोडतात. त्यांच्यावर लक्ष ठेवलं आणि त्यांचं समुपदेशन केलं, योग्य आदर्श त्यांच्यासमोर ठेवले तर ही मुलंही ‘नॉर्मल’ होऊ शकतात.
‘थ्री स्कूल’ सिंड्रोम!
किती स्ट्रेसमध्ये असतात मुलं!.
त्यामुळे त्यांच्यात ‘इमोशनल हायजॅकिंग’चा प्रकारही वाढीस लागतोय.
काय प्रकार आहे हा ‘इमोशनल हायजॅकिंग’?
- म्हणजे आपल्याला राग आला, चिडलो तर त्याला आपण रिस्पॉन्स करतो, काही प्रतिक्रिया देतो, पण त्याऐवजी थेट ‘अँटॅक’ करणं म्हणजे ‘इमोशनल हायजॅकिंग’!
मुख्यत: तीन प्रकारचे स्ट्रेस मुलांमध्ये आढळतात. त्याला आम्ही ‘थ्री स्ट्रेस’ किंवा ‘थ्री स्कूल’ सिंड्रोम म्हणतो.
आजची मुलं तीन शाळांत जातात.
पहिली शाळा म्हणजे आईची. घरातली.
दुसरी, जिथे ती शिकायला जातात ती.
आणि तिसरी शाळा म्हणजे ‘ट्यूशन’, ‘क्लास’.
मुलं काही वेळ घरी असतात. सहा तास शाळेत, सहा तास ‘क्लास’ला!
त्यांना कुठल्याच गोष्टीला वेळ नाही. ही मुलं हसत नाहीत, बोलत नाहीत, खेळत नाहीत, बाहेर कुठे जात नाहीत.
ताणानं त्यांच्या मेंदूची पार वाट लागते. मेंदूचा पार प्रेशर कुकर बनतो. त्यात नैतिक, अनैतिकतेच्या सीमारेषा पार पुसत चाललेल्या.
अवतीभोवती भ्रष्टाचार, राजरोस गुंडगिरी चालते.
काय होतं? किती शिक्षा त्यांना होते? त्यामुळे समाज किती पेटून उठतो?.
- मुलं हे सारं बघत असतात. सगळ्याच ‘फॅँटसी’ प्रत्यक्ष जगून पाहण्याची त्यांची ऊर्मी असते आणि ‘सारेच करतात’ म्हणून त्यांचीही पावलं आपसूक ‘वाकडी’ पडतात.