डिप्रेशन नक्की येतं कुठून?

By Admin | Updated: August 22, 2014 11:54 IST2014-08-22T11:54:07+5:302014-08-22T11:54:36+5:30

खूप निराश वाटतं? मला निराशेचा आजार तर नाही? मन का लागत नाही कशातच?

Where does the depression come from? | डिप्रेशन नक्की येतं कुठून?

डिप्रेशन नक्की येतं कुठून?

काहीच करावंसं वाटत नाहीये..
कंटाळा आलाय.
 नकोसं झालंय सगळं..’
-निशा तिची डायरी लिहीत होती.  डायरी लिहिता लिहिता रडत होती.
‘वाटतं, खरंच का जगतोय आपण? कशासाठी चाललंय हे सगळं? सकाळ झाली की कशाला हा दिवस उजाडलाय, असं वाटत रहातं. कशातच मन लागत नाही. सारखंच काहीतरी होतं, बरंच वाटत नाही कशात, माझ्यात काही अर्थच उरला नाहीये, कशातच काहीच अर्थ उरलेला नाहीये, कुणाशी बोललं की थोडावेळ बरं वाटतं, पण नंतर परत खूपच त्रास होतो. काय आहे या जीवनाचा अर्थ? कशाला जगतात सगळे? आपोआपच सगळं  संपून गेलं तर बरं होईल?’ 
 खूपच हताश झाल्यासारखी निशा हे सारं लिहीत होती. खरंतर तिला नीट लिहितापण येत नव्हतं. गेले कित्येक दिवस ती अशीच उदास असायची. कळत नकळत डोळे भरून यायचे. कधी कुणावर एकदम चिडायची. राग आला तरी डोळ्यात पाणी यायचं, काही वेळा तर वर्गातच काय कुठेही रडू फुटेल असं वाटायचं. कशातच तिचं मन रमायचं नाही. कुणीतरी म्हणालं, रोज डायरी लिही बरं वाटेल. कशानं तरी बरं वाटेल म्हणून डायरी लिहायला घेतली. पण रोज तेच काय लिहायचं असंही तिला वाटू लागलं. 
असं काय झालं होतं निशाला? तिला नैराश्यानं ग्रासलं होतं. 
निशा सारखं अनेकदा हल्ली बर्‍याच जणांचं होतं. 
नैराश्य, डिप्रेशन हा आजच्या काळात अगदी सहजगत्या वापरला जाणारा शब्द. हव्या त्या कोर्सला, कॉलेजला अँडमिशन मिळाली नाही म्हणून डिप्रेशन येतं, भ्रष्टाचार वाढला म्हणून डिप्रेशन येतं, क्रिकेटची मॅच हरली म्हणूनही डिप्रेशन येतं, कितीतरी कारणं ज्यांनी नैराश्याला सामोरं जावं लागतं. मन निराश होतं. समोर आशेचे किरण अजिबात दिसत नाहीत, मनावर उदासीनतेचं सावट पसरतं. मनात फक्त नकारात्मक विचाराचं जाळं पसरतं आणि  उभारीच संपून गेल्यासारख वाटतं.
का होतं असं, हे आपण समजून घेतो का?
खरंतर ‘नैराश्य’ या गोष्टीचा तीन टप्प्यांत विचार करावा लागतो.  आणि नेमकं आपलं नैराश्य कसंय हे समजून घ्यावं लागतं. 
नैराश्य हीसुद्धा एक भावना आहे, तिचा भावना म्हणून विचार करावा लागतो. कधी नैराश्य हे एक लक्षण असतं, तर कधी नैराश्य एक आजार म्हणून समजून घ्यावा लागतो.
तेच आपण आज समजून घेऊ....
 
निराशा फक्त एक भावना, केव्हा असते?
नैराश्य एक भावना म्हणून अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही बर्‍याचदा जाणवत असते. तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की, ती आपल्या मनाची एक स्थिती आहे. तो विशिष्ट घटनेला दिला जाणारा प्रतिसाद आहे. दु:ख होणं, वाईट वाटणं, उदास वाटणं, नैराश्य येणं, खिन्नता जाणवणं, विष्ण्णता वाटणं, औदासीन्य येणं. या सर्व नैराश्य या एकाच भावनेच्या छटा आहेत. 
कधी आपण कोणाकडून फसवलो गेलो, खूप सार्‍या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, जवळच्या नात्यात खूप ताण निर्माण झाले, नातं तुटलं, कुटुंब विभक्त झालं, एकाकी पडल्यासारखं वाटलं,  अशा कितीतरी घटनांना सामोरे जाताना मनाला वाईट वाटतं. आपली घोर निराशा होते. हिरमोड होतो. काही गोष्टी आपल्या हातातून कायमच्या निसटल्या असा सल निर्माण होतो. अशा कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाताना निराश वाटणं ही अत्यंत स्वाभाविक भावना आहे.
 
दुसर्‍याच आजाराचं लक्षण?
अनेक शारीरिक व मानसिक आजारांमध्ये नैराश्य हे एक लक्षण म्हणून ‘नैराश्य’ आढळतं. उदा. हायपोयायराइडाझम, हृदयविकार यासारख्या शारीरिक आजारांमध्ये तर स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता यासारख्या मानसिक आजारांमध्ये इतर अनेक लक्षणांसोबत ‘नैराश्य’ हे एक लक्षण म्हणून आढळतं.

डिप्रेशन हाच आजार?
१)  सतत उदास वाटणं  २) रोजच्या जगण्यातला रस नाहीसा होणं 3) पूर्वी अनुभवत असलेल्या गोष्टीमध्ये आनंद मिळेनासा होणं. ४) मनात सतत नकारात्मक विचार येणं. ५) अस्वस्थता ६) आत्मविश्‍वासाचा अभाव जाणवणं. ७) स्वत:विषयी कमतरतेची भावना ८) झोपेवर-भुकेवर परिणाम होणं ९)  डोकेदुखी- अंगदुखी अशा प्रकारची अनेक मनोशारीरिक लक्षणं जाणवणं. १0)  अतिशय निराश, हताश, असहाय वाटणं. मनात आत्महत्त्येचे विचार येणं अशा प्रकारची लक्षणं काही काळापर्यंत सतत जाणवतात तेव्हा नैराश्य हा आपल्या ‘मूडस्’चा आजार असतो. त्याचेही काही प्रकार असतात. मेंदूतील रासायनिक बदलांमुळे हा आजार होऊ शकतो. त्याचा रोजच्या वागण्यावर / कामावर / नातेसंबंधावर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट असतं. अर्थात योग्य औषधोपचार व मानसोपचारांच्या मदतीनं यातून बाहेर पडता येते. 
 
का आपण चेहरा पाडतो?
‘नैराश्य’ या आजाराचा आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता आली आहे. ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या’ पाहणीनुसार नजीकच्या काळात नैराश्य हा आता एक नंबरचा आजार होणार आहे.
तसंही सध्याचा ताण वाढत जाणार्‍या युगात असे अनेक प्रसंग येतात जिथे आपल्याला नैराश्याला सामोरं जावं लागतं. निराशा पेलण्याची मानसिकता त्यासाठी आपण तयार करून ही भावना हाताळायला शिकायला हवं.  त्यासाठी काय करता येईल?
१) नैराश्य ही भावना आपल्याला किती वेळा जाणवते? या भावनेची वारंवारता काय आहे? याची नोंद घ्या.
२) कोणते प्रसंग घडले की, आपल्याला निराश वाटतं? - हे तपासा.
३)  त्या प्रत्येक प्रसंगाचा तुम्ही लावलेला अर्थ काय होता?
४) नैराश्य जाणवायला मी स्वत: किती जबाबदार आहे, बोला स्वत:शीच खरं! 
या प्रश्नांची स्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमची उत्तरं काही अंशी तरी सापडतील.
 
नॅचरल दोस्ती
पर्यावरणाच्या संदर्भातले लेर्स बोअरच होतात हे खरंय, पण इतरांनी काही सांगत बसण्यापेक्षा आपणच आपली लाइफस्टाइल बदलली तर? स्वत:हून काही पर्यावरणपूरक अर्थात नेचरफ्रेण्डली  काम केलं तर? ते तुम्ही करत असाल तर नक्की लिहा? फार मोठं ना सही, पण मनापासून केलेली एखादी छोटी कृती, एखादा छोटा बदल, आणि त्याचा फायदा, ग्रुपनं एकत्र येऊन केलेले काही उपक्रम, हे सारं लिहा आणि पाठवा आम्हाला. पाकिटावर ‘नॅचरल दोस्ती’ असा उल्लेख करायला विसरू नका.
 
- संज्योत देशपांडे
 

 

Web Title: Where does the depression come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.