डर कसलं? आता बोलूच की थेट!
By Admin | Updated: May 4, 2015 18:06 IST2015-05-04T18:06:03+5:302015-05-04T18:06:03+5:30
हाताची घडी सोडून कायद्यावर बोट नेमकं कसं ठेवायचं हे शिकवणा-या या खास शिबिराचा हा एक लाइव्ह रिपोर्ट.

डर कसलं? आता बोलूच की थेट!
>‘ऑक्सिजन’ नियमित वाचणारे राज्याच्या कानाकोप:यातले काही मित्र-मैत्रिणी; छोटय़ाखेडय़ांतले आणि मुंबई-पुण्यातलेही. आपल्या आसपास काही बदलायला हवं, आपण पुढाकार घेत गोष्टी ताळ्यावर याव्यात म्हणून भांडायला हवं, असं वाटणा-या दोस्तांसाठी ‘ऑक्सिजन’ आणि ‘वयम्’ यांनी आयोजित केलं होतं एक शिबिर त्याचं नाव ‘कायदा शिका’! हाताची घडी सोडून कायद्यावर बोट नेमकं कसं ठेवायचं हे शिकवणा-या या खास शिबिराचा हा एक लाइव्ह रिपोर्ट.
शिबिरं भरतात आणि कार्यशाळा होतात; भेटीगाठी-गप्पाटप्पा घडतात, जेवणंखाणं होतात, नवे काही दोस्त भेटतात.
मोबाइल नंबरची देवाणघेवाण होते आणि मग जो तो आपापल्या घरी, संपर्क केवळ व्हॉट्स अॅप मेसेज फॉरवर्ड फॉरवर्ड खेळण्यापुरता!
- बाकी, बात खतम!
पण हे शिबिर तसं नव्हतं!
या शिबिरात आलेली मुलं महाराष्ट्रभरातून आली, आपापला भाडेखर्च करत आली; त्यासाठी अनेकांनी तर दोन-दोन दिवस प्रवास केला!
आणि येऊन धडकली नाशकात!
कारण काहीही झालं तरी, त्यांना ‘लोकमत-ऑक्सिजन’ आणि ‘वयम्-आपल्या विकासाची चळवळ’ यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या शिबिरात यायचंच होतं!
त्यांची आणि आयोजकांची खरंतर ना ओळख ना पाळख!
त्यांना सगळ्यांना जोडणारा एकच धागा होता, त्याचं नाव ‘ऑक्सिजन’!
निमित्त झालं एका लेखाचं! ‘लाल दिव्याची गाडी यांच्या घरी येतेच कशी?’ नावाचा एक लेख ऑक्सिजनने प्रसिद्ध केला होता. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार या आदिवासी भागातल्या काही धडपडय़ा तरुण मित्रंची ती गोष्ट! वयम् नावाच्या संस्थेत जाऊन, तिथल्या कार्यकत्र्याकडून हे तरुण कायदा शिकले आणि नेमकं नियमावर बोट ठेवत आपल्या भागातल्या यंत्रणोला काम करायला भाग पाडू लागले! ज्या तहसीलदार कार्यालयात पाऊल ठेवायचं तर पोटात बाकबूक होतं, तहसीलदारांच्या केबिनबाहेरचा शिपाईसुद्धा एरव्ही रुबाबात बोलतो, त्याच्याशी बोलायचं तरी शब्द घशात अडकतात, त्याच कार्यालयातला साहेब ‘या-बसा’ म्हणतो, स्वत:हून कामाविषयी बोलतो, हा बदल कसा घडला, हे सांगणारा तो लेख होता!
तो वाचला आणि राज्यभरातून वाचक मित्र-मैत्रिणींनी फोन करकरून विचारलं की, हे आमच्या गावात नाही का होऊ शकत? आम्ही प्रयत्न करतो पण यंत्रणा आम्हाला दाद देत नाही; मग आम्ही नेमकं काय करायला हवं, ते सांगा!
सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, ‘आमच्या गावाकडं काहीच घडत नाही, दुसरी दुनियाच आम्हाला माहिती नाही; त्या दुस:या दुनियेत टिकायची आणि आपल्या मनासारखं जगण्याची धमक कमवायची म्हणून या कार्यशाळेसाठी आलो!’
अमरावतीहून आलेला एक दोस्त सांगत होता, ‘आम्ही बोलतो खूप पण माहिती नाही म्हणून आमचा आवाज कमी पडतो. आणि जिथं डोकं लावायचं काम येतं तिथं आमचा वांधा होतो, त्यामुळे करावं काही, असं कितीही वाटलं तरी आम्ही कमीच पडतो!’
- आणि हा आवाज कमी का पडतो?
त्याचं उत्तर एकच, माहिती नाही, नियम माहिती नाहीत, कायदे माहिती नाहीत!
म्हणून तर हे सारे दोस्त जमले होते, ‘कायदा शिका’ या दोनदिवशीय कार्यशाळेसाठी!
***
कायदा शिका,
नियमाचं बोला!
या कार्यशाळेचं सूत्रच होतं, व्यवस्थेशी भांडण नाही, दादागिरी नाही नी एका रात्रीत क्रांतीची स्वप्न नाही!
जे काही करायचं ते टप्प्याटप्प्यानं!
त्यातलाच एक पहिला टप्पा म्हणजे, माहिती मिळवणं, कायदे माहिती करून घेणं आणि ती माहिती योग्यपद्धतीनं वापरण्याची हिंमत कमावून कामाला लागणं!
आणि म्हणूनच या कार्यशाळेत सामान्य माणसांच्या रोजच्या गरजांसाठी जिथं सरकारी यंत्रणोशी संपर्क येतो, त्या महत्त्वाच्या कायद्यांची ओळख करून घेणं!
म्हणूनच या शिबिरात रोजगार हमी कायदा, रेशन कायदा आणि माहिती अधिकार या तीन कायद्यांची मूलभूत माहिती देण्यात आली! हे कायदे कुणी-कुणासाठी आणि कसे वापरायचे, याचं प्रशिक्षण वयम्च्याच आदिवासी भागातल्या प्रत्यक्ष त्यांच्या भागात काम करणा:या कार्यकत्र्यानीच दिलं! नुस्तं पुस्तकी कायदा नाही तर तो आपण कसा वापरला हे सांगत असताना, कायदा वापरण्याचं ‘व्यवहारज्ञान’ही सांगितलं! एकदम मोठा घास घ्यायला जाऊ नका, छोटय़ा कामापासून सुरुवात करा, जमेल! हे या ‘व्यवहारज्ञानाचं’ खरं सूत्रं होतं!
खरंतर जमलेली सारी मुलं आपण काहीतरी करायचं या कळकळीनं आली होती, सगळ्यांना तळमळ होती समाजासाठी काहीतरी करण्याची! आपल्या अवतीभोवती, खेडय़ापाडय़ांत सामान्य माणसांची होणारी फसवणूक, त्यांचे डावलले जाणारे हक्क यासाठी काहीतरी करायला पाहिजे, असं सारेजण सांगत होते. सांगलीचा सौरभ म्हणाला, ‘आजवर आम्ही हेच शिकलो की, शिकून डॉक्टर हो, इंजिनिअर हो, तुझा कायद्याशी काय संबंध ते कशाला शिकतो?- मात्र इथं आल्यावर पहिल्यांदा जाणवलं की, आपल्याला नियमच माहिती नसले, तर आपण तोंड उघडून काही बोलूच शकत नाही, आपल्याकडे काही ताकदच उरत नाही!’
आणि म्हणून सलग दोन दिवस ‘कायदा’ आणि तो ‘वापरायचा कसा’ हे या शिबिरात ही मुलं शिकली!
आणि त्याचसोबत त्यांनी गाठीशी बांधली एक मोठी गोष्ट; समाजात बदल घडवणं ही एका रात्रीत घडणारी जादूची कांडी नाही. अनेक लहानलहान प्रयत्नांची ती एक प्रक्रिया आहे; आणि मीच एकटा जग बदलीन, असा दावाही करण्यात अर्थ नाही, लोकांचा सहभाग आणि साथ असेल, सगळ्यांसाठी तो प्रश्न महत्त्वाचा असेल, तरच लोक तुमच्याबरोबर येतील; त्यावाटेवर दोन पाऊलं तुम्हाला पुढे टाकावी लागतील इतकंच!
तीच दोन पाऊलं पुढं टाकण्यासाठीचं हे शिबिर होतं..!
विशेष म्हणजे त्या शिबिरानंतर काही तरुणांनी खरंच आणखी काही छोटी पाऊलं टाकत, आपल्या कामाला छोटीशी का होईना सुरुवातही केली!
‘जमेल आपल्याला.’ असं स्वत:ला बजावतच!
- ऑक्सिजन टीम
रेशनच्या प्रश्नासाठी भांडतोय आता.
माझं गाव नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरचं. दुर्लक्षितच. अनंत अडचणी. आपल्या माणसांसाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करायचं मनात होतं, पण प्रश्न सोडवायचे कसे, हे कळत नव्हतं. त्यात रेशन आणि रोजगार हमी हे तर अगदी जिव्हाळ्याचे विषय! मी कुठून तरी माहिती मिळवण्यासाठी धडपडत होतो आणि मग या शिबिरात पोहोचलो. कायदा तर शिकलोच पण हेदेखील समजलं की टप्प्याटप्यानं आपण बदल घडवू शकतो. समस्या सोडवायला सुरुवात कशी करायची, हे समजलं. गावात आल्यावर मी तरुण मुलांचा एक ग्रुप तयार केला. गावात रेशनचे प्रश्न खूप. थेट पुरवठा विभागाच्या अधिका:यांना जाऊन भेटलो. त्याला नियम दाखवला, प्रश्न सैल होतोय, सुटतोय, अशी आशा आता वाटू लागली आहे. - सुनील राठोड, सेवानगर, चाळीसगाव
---------------------
बदल हवा? तीन सूत्रं लक्षात ठेवा!
‘आपण काहीतरी करायला हवं, समाजासाठी काहीतरी करायचंच’ अशा भारावलेल्या अवस्थेत आलेल्या तरुण मित्र-मैत्रिणींना या शिबिरात कायदा, तो वापरण्याचं सूत्र हे तर आम्ही सांगत होतोच; पण त्याबरोबर महत्त्वाची होती तीन सूत्रं!
कुठलंही काम सुरू करताना ही तीन सूत्रं लक्षात ठेवा आणि मगच चिकाटीनं, शांतपणो काम करा, काम पूर्ण व्हायला, बदल दिसायला वेळ लागला तरी धीर धरा, हे तर महत्त्वाचं होतंच; पण त्यासोबत काही गोष्टी नेहमी ध्यानात ठेवायला पाहिजेतच!
पहिली गोष्ट- तुम्हाला जी समस्या तुमच्या अवतीभोवती दिसतं आहे, त्या समस्येविषयी आसपासच्या लोकांना माहिती द्या. माहिती देणं हे आपलं पहिलं काम.
दुसरी गोष्ट- माहिती देऊन झाल्यावर त्या प्रश्नाविषयी लोकांना वेदना वाटते का, त्रस होतोय का, तो प्रश्न त्यांना जिव्हाळ्याचा वाटतोय का, वाटत असेल तर लोकांच्याच मदतीनं त्या प्रश्नासाठी काम करा. लोकांना त्या प्रश्नाविषयी काही वाटतच नसेल, तर माहिती देत राहणं या पहिल्याच टप्प्यावर काही काळ थांबावं लागतं.
तिसरी गोष्ट- तुम्हाला लोकांसाठी जो प्रश्न महत्त्वाचा वाटतो, जी समस्या गंभीर वाटते ती त्यांना वाटत असेल, असं नाही. आणि लोकांच्या सहभागाशिवाय कुठलाच प्रश्न सुटू शकत नाही. त्यामुळे लोकांची समस्या काय ते ओळखा, ती सोडवण्यासाठी मदत करा. माहिती द्या.
या तीन टप्प्यांतून जात हळूहळू बदल दिसू लागतील. व्यवस्थेशी भांडत आणि आरडाओरडा करत ते सुटणार नाहीत. त्यासाठी कायदा-नियम आणि लोकसहभाग या तीन साधनांची मदत घेऊन अत्यंत चिकाटीनं, धीर धरत दीर्घकाळ काम करण्याची तयारी पाहिजे!
बदल हवा, तर एवढं जमवायला हवं! - मिलिंद थत्ते, वयम्-संस्थेचे कार्यकर्ते
------------------
लोकसहभागातून गावात बोअर खणलीपण.
शिबिरात मी शिकलो होतो की, गावातल्या बहुसंख्य माणसांच्या जिव्हाळ्याचा, गरजेचा प्रश्न आधी सोडवायचा. आमच्या गावात पाण्याचे प्रचंड हाल. दर उन्हाळ्यात तर पाण्यासाठी वणवण ठरलेली. यंदा या शिबिरात जाऊन मला कळलं की, ग्रामसभा कधीही घेता येऊ शकते.
मी शिबिरातून सोबत आणलेली सगळी कागदपत्रं, पेनड्राईव्ह मधली माहिती गावातल्या सगळ्या लोकांना दाखवली. सगळ्या लोकांचा पाठिंबा असेल तर गावात काम होऊ शकतं हे सांगितलं. लोकही तयार झाले म्हणून मग आम्ही विहिर बांधून टाकी बांधायचा प्रस्ताव गावासमोर ठेवला. पण त्याला वेळ लागणार होता. पाण्याचा प्रश्न तर आज सोडवणं गरजेचं. म्हणून मग एक सामायिकीची बोअरवेल करायचं ठरलं. आता ते काम पूर्णही झालं. लोकांनीपण खूप साथ दिली कारण तो प्रश्न सगळ्यांचाच होता.
कायदा पाहून काम हे शिबिरातलं तत्व आम्ही रोजगार हमी योजनेसाठीही वापरलं. गावात रोहियोअंतर्गत शोषखड्डे खणायचं काम सुरू झालं. ते काम ज्यांच्याकडे जॉबकार्ड आहे त्यांनाच मिळायला हवं असा आग्रह आम्ही धरला. आणि त्याच लोकांना काम मिळालं.
आपण सुरूवात करू शकतो, आपल्या गावात छोटा का होईना बदल घडू शकतो ही गोष्ट सत्यात उतरताना आज मी पाहतो आहे.
- मुंजाजी साबळे, डोअर, ता. अर्धापूर, नांदेड
---------------------
मतदानापलीकडचा सहभाग कळला.
मी राज्यशास्त्रचा विद्यार्थी, पुण्यात शिकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, पण जे शिकतोय ते मार्कापलीकडे कसं वापरायचं, हे माहिती नव्हतं. कायदा नेमका कसा वापरायचा, त्यातून योग्य आणि पारदर्शी कारभार कसा होऊ शकतो, हेच कुणी शिकवलं नाही.
पण कायदा हे एक शस्त्र आहे, त्याची ताकद मोठी आहे हे जे वाटत होतं, ते या शिबिरात येऊन पक्कं झालं!
बदलाची सुरुवात कुणापासून करायची तर स्वत:पासून करायची, हे पक्कं झालं.
प्रश्न विचारायचे, आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेत नोंदवायचा हे कळलं! नुस्तं मत दिलं म्हणजे काम संपलं असं नव्हे तर आपले लोकप्रतिनिधी त्यांना मिळणा:या निधीपासून त्यांनी करायच्या कामांर्पयत काय काय करतात, यावरही आता लक्ष ठेवायला हवं, असं मला वाटतं! ते ‘लक्ष’ देऊन अधिक परिणामकारक सहभागाचं सूत्र मला या शिबिरात मिळालं.- सौरभ कुंभारे, सांगली