what happens when young girls from village falls in love? | पोरी प्रेमात पडतात तेव्हा काय मॅटर होतं?

पोरी प्रेमात पडतात तेव्हा काय मॅटर होतं?

ठळक मुद्देशिकायला पाठवतोय; पण लिमिटमध्ये राहायचं, नाही तर शिक्षण बंद. असा दम मुलींना घरचेच भरतात

-शर्मिष्ठा भोसले

काळ मोबाइलचा असो की पुस्तकात लपवून चिठ्ठय़ा पाठवण्याचा; थरथरत्या हातांनी दिलेला गुलाब वहीत लपवून ठेवण्याचा असो की व्हॉट्सअ‍ॅपवर गुलाबाची इमोजी पाठवण्याचा. कॉलेजचं कॅम्पस कायमच लालगुलाबी असतं. जालीम दुनियाकी नजरोंसे छुपकर प्रेम करणारे तो आणि ती कॅम्पसला नवे नाहीतच.
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, हळुवार, गुलाबी, मोरपंखी वगैरे, पण दुनिया मात्र जालीमच असते कायम. कदाचित महानगरात ती जरा कमी जालीम असेल; पण खुर्द-बुद्रुकसारख्या गाव-खेडय़ात आणि ना धड गाव न धड शहर असल्या निमशहरात मात्र कुणी तो आणि ती दिसली की एकदम गोंधळून जाते. या पोरांना छळू लागतेच.
सुरेखा, मराठवाडय़ातल्या एका लहान गावात बी. ए. करतेय. ती सांगते,   आमच्या गावात आणि कॉलेजातही कुणी मुलगा-मुलगी वही-पुस्तक घ्यायला-द्यायलाही एकमेकांशी बोलली ना, तर त्यांच्या हातून गुन्हा झाल्यासारखं बघतेय त्यांच्याकडं सगळे. आता असं असल्यावर मग उगाच एकमेकांबद्दल वेगळंच काय-काय वाटत राहातंय. मुलं म्हणतेत मुली धोकेबाज असतात, मुली म्हणतेत मुलं आवारा असतेत; पण असं कसं असू शकतंय ना? सगळेच मुलं किंवा सगळ्याच मुली वाईट कशा असतील?   
सुरेखाचा प्रश्न हा आजच्या पिढीतल्या कित्येकांच्या मनात पुनर्‍ पुन्हा येतो आणि तिथंच चकरा मारत राहातो. बिनउत्तराचा.
उमरखेड. विदर्भातलं एक निमशहरी ठिकाण. इथं शिकणारी एक मैत्रीण सांगते, ‘आम्हा मुलींना शिकायला कॉलेजात पाठवतानाच सक्तीची ताकीद दिलेली असते घरून, मुलांशी बोलाल तिथं जाऊन, तर शिक्षण बंद करू.  कॉलेजातही कुणाची तरी पाळत आहे आपल्यावर असंच वाटत राहातं. तशी पाळत खरोखरच असतेच अनेकींवर. आपल्या मुलीचं पाऊल वाकडं पडेल, मग तिला शिक्षण झाल्यावर लग्नाच्या बाजारात काही किंमत राहणार नाही ही आई-वडिलांची भीती यामागे असते; पण मग मुला-मुलींनी एकमेकांशी बोलणं तर काय, एकमेकांकडे पाहूसुद्धा नये असाच तालिबानी पवित्रा योग्य आहे का? बरं पालकच नाही, तर शिक्षकही अनेकदा असंच वागतात. त्यांना वाटतं, मुलं-मुली बोलले एकमेकांशी, मग पुढं गोष्ट गेली, तर उगाच मॅटर  वाढेल. म्हणजे आम्हाला काय समजतच नाही का? त्या एकाच कारणासाठी भेटतो, बोलतो आम्ही असं म्हणायचं असतं सगळ्यांना.’
मैत्रिणीचा वैताग समजू शकत होते मी. मी ही निमशहरात शिकलेली. हे वातावरण अनुभवलेलं. ऑप्शनल विषयाच्या तासाला काल तो एकटाच आला होता म्हणून तिला त्याच्याकडे वही मागायची असते; पण शंभरदा विचार करून, आजूबाजूच्या मैत्रिणींनी अगं बोल की, बोल की, म्हणल्यावर ती नजर चोरत कशीतरी वही मागते. चोरी करत असल्यासारखी आजूबाजूला बघत झटकन वही आत ठेवते, हे बघायला नजर सरावलेली असते सगळ्यांचीच. मात्र तो आणि ती सायकल हातात धरून एकमेकांशी बोलत चाललेत किंवा कॅन्टीनमध्ये दोघंच बसून चहा प्यायलेत हे ऑड  वाटतं कित्येकांना.
आता हेच पाहा ना, जालन्यात तळ्याकाठी फक्त गप्पा मारत बसलेल्या त्या दोघांना त्यांनी गाठलं. तेही तरुणच, त्यांच्याच वयाचे; पण त्यांनी त्या दोघांना जबर मारहाण, शिवीगाळ केली. त्यांचा व्हिडीओ वायरल झाला. सगळे ऑनलाइन-ऑफ लाइन साइड इफेक्ट्स सहन करत त्या जोडप्यानंच शांतपणे एका मंदिरात जाऊन लग्न केलं. अर्थात, असा अ‍ॅण्ड दे लिव्ह्ड हॅप्पीली एवर आफ्टरवाला शेवट सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नाही. 
पण तो तसा येणार नसेल, तर त्याला खेचून आणण्याची परवानगी त्यांना त्यांची परिस्थिती देत नाही. ती धमक हरेकाला दाखवता येत नाही..
असं असलं तरी ‘नजरे मिली दिल धडका’ ही आपसूक केमिकल रिअ‍ॅक्शन व्हायची थांबते थोडीच? गावातल्या कोरडय़ा विहिरीजवळ, पाणंद ओलांडताना, मारु तीच्या देवळाला जाताना, सकाळची एसटी पकडून तालुक्याच्या गावात कॉलेजला जाताना दोघं एकमेकांना कळत-नकळत टिपतात. चोरटी नजरानजर, कारण-विनाकारण बोलणं, एसटी रस्त्यावरचे खड्डे चुकवत असताना झालेले ओझरते स्पर्श असं सगळं सुरू होतं. 
  अशीच एक लव्हस्टोरी होती कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका तालुक्याच्या गावी शिकणार्‍या दोघांची. सहाएक महिने कुणाला काही न कळता गोष्टी सुरू होत्या. एकदा गावातल्या वेशीपासून पुढं रस्ताभर दिसेल त्या भिंतींवर या दोघांची नावं रात्रीत कुणीतरी लिहून ठेवली होती. दुसर्‍या दिवशी गावभर हेच प्रकरण चर्चेला. तिच्या वडिलांनी त्याला मारहाण केली. मुलीला घरी बसवलं. पुढच्या चारच महिन्यात तिच्या डोक्यावर बळजबरी अक्षता पडल्या.. 
बहुतेक प्रकरणांचा दि एण्ड असाच ट्रॅजेडीवाला. गावाकडच्या गोष्टीत  संत्याला त्याची सुरकी मिळते, हे स्वप्न म्हणूनच वेब सिरीजच्या विश्वात खूप हिट्स मिळवणारं ठरत असावं. 
   अध्र्यातच मरून गेलेल्या लवस्टोरीजच्या कथा मग वर्षानुवर्षे गावात आणि कॉलेजच्या कट्टय़ावर चघळल्या जातात; पण प्रेमाबाबत असणारं कुतूहल मात्र काही कमी होत नाही. 
   मुला-मुलींमध्ये मोकळा संवाद व्हावा, खुली मैत्री व्हावी म्हणून महाविद्यालयात काही उपक्र म, कार्यशाळा झाल्या पाहिजेत. आपण कितीही रोखलं तरी त्यांचं कुतूहल कुठल्या न कुठल्या मार्गाने वाट शोधणारच. आज तर प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. अगदी लहान गावातही हेच चित्र आहे. नुकत्याच प्राध्यापक म्हणून रु जू झालेल्या शिरूर ताजबंद गावच्या मनीषा शेळके म्हणतात, बारावीच्या वर्गात रिप्रॉडक्शनचा धडा शिकवत असताना अनेकदा सगळ्या मुली वर्गातून गायब असतात. फक्त मुलंच वर्गात बसून ऐकतात. यावर उत्तर शोधण्याची गरज शिक्षणव्यवस्थेला का वाटत नाही, असा त्यांचा सवाल आहे.  
   ये इश्क नही आसान, बस इतना समझ लिजे 
  इक आग का दरिया है और डुबके जाना है 
   आग का दरिया पार करत इश्काची परीक्षा पास होणारेही असतातच की. ते दोघं मग गाव-खेडय़ात पुढच्या कित्येक पिढय़ा दंतकथा बनून राहतात. माझी एक मैत्रीण. चित्रकलेत मास्टर्स करायला जिल्ह्याच्या गावी राहिली. आपल्या मैत्रिणीसोबत रूम करून राहायची. कॉलेजातलाच चित्रकार मित्र तिला आवडला. दोघांनी कुणालाच न सांगता मंदिरात लग्न केलं. दोन वर्ष हे सीक्रेट दोघांचे चार-दोन मित्र सोडले तर कुणालाच माहीत नव्हतं. दोघांनी शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली तसं हिनं गावाकडं घरी जात सांगितलं. एकच गहजब उडाला; पण तिचे वडील समजूतदार होते. बायकोला म्हणाले,  व्हायची गोष्ट होऊन गेली. आता काय उपयोग गाव डोक्यावर घेऊन? त्यांनी त्या दोघांचं लग्न पुन्हा वाजतगाजत लावून दिलं. अर्थात, हा मुलगा योगायोगानं जातीतलाच होता. 
जातीबाहेरचा असता तर.? 
या प्रश्नाचं उत्तर तर अवघडच आहे. 
त्या अवघड वाटांवर चालणारेही आहेतच. मात्र जे तिथवर जात नाही, त्यांच्याही आयुष्यात घिशापिठय़ा चारोळ्या, फिल्मी शायर्‍या वहीच्या मागच्या पानांवर लिहिल्या जातात. वह्या-पुस्तकातून हळुवार पत्रं एक्सचेंज होतात, खच्चून भरलेल्या काळी-पिवळी किंवा टमटममध्ये अल्ताफ राजा गात असतो, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..  
तेवढय़ात कुणीतरी ‘तो’ कुण्या ‘ती’कडे बघते. हसते.. लाजते आणि नजर दुसरीकडे वळवते.. 

(शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: what happens when young girls from village falls in love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.