काय वाटतं, लोक इण्टरव्ह्यू नेमका कशासाठी घेतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 07:00 AM2019-12-05T07:00:00+5:302019-12-05T07:00:02+5:30

मुलाखतीला तुम्ही जाता तेव्हा नेमका काय विचार करता? मुळात मुलाखत म्हणजे नेमकं काय असतं, या प्रश्नांची उत्तरं शोधा, मग नोकरी कुठं जात नाही!

What do you think, why do people take the interview exactly? | काय वाटतं, लोक इण्टरव्ह्यू नेमका कशासाठी घेतात?

काय वाटतं, लोक इण्टरव्ह्यू नेमका कशासाठी घेतात?

Next
ठळक मुद्देकंपनी तुमची मुलाखत घेणार, त्यांना नेमकं काय हव्ांय, ते तुम्हाला कळलंय का?

- डॉ. भूषण केळकर

मागील 2-3 लेखांना तुम्हा वाचकांचा खूपच छान प्रतिसाद ई-मेल्सवर मिळतोय. त्यात बर्‍याच ई-मेल्समध्ये विचारणा झाली आहे की (इंटरव्ह्यू) मुलाखतीचे तंत्र व त्यातील काही ठळकपणे लक्षात ठेवण्यासारख्या बाबी काय असाव्यात याचे विवेचन करू. त्यामुळे आजचा हा लेखनप्रपंच.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मुळात मुलाखत का असते?’ हे समजावून घेणं. हा मंत्र समजला की मग तंत्र समजण्यात अडचण येणार नाही. केवळ भारतच नव्हे तर अमेरिका आणि जगभर हजारो मुलाखती घेतल्यानंतर मी जे शिकलो; जे पाहिलं ते मी तुमच्या समोर, तुमच्या विचारार्थ ठेवतो आहे.
जर ‘स्कॉलर’ मुला-मुलींनाच जॉब द्यायचा असेल तर कंपन्या मुळात मुलाखत घेणारच नाहीत! प्रत्येक कॉलेजमध्ये असणारे सर्वाधिक टक्के मिळालेले विद्यार्थी-विद्यार्थिनींची यादी मागवून सरळ ऑफर लेटर देतील! पण असं होत नाही; याचं कारण ‘पुस्तकी’ आणि ‘परीक्षातंत्राच्या’ ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची अशी व्यक्तिमत्त्वाची परीक्षा कंपन्यांना घ्यायची असते. तुम्ही पुस्तकी पांडित्याबरोबर चार लोकांमध्ये मिळून-मिसळून काम करू शकता की नाही हे तपासणं फार महत्त्वाचं आहे. त्यात सॉफ्ट स्किल्स फारच महत्त्वाची आहेत!
दुसरा मंत्र म्हणजे तुम्ही स्वतर्‍ला नीट सादर करू शकता का? इंग्रजीत याला स्वतर्‍ला नीट प्रेझेंट करणं किंवा मार्केट करणं असंही म्हणतात. तुम्ही स्वतर्‍ला नीट ओळखता का, हा प्रश्नसुद्धा म्हणूनच महत्त्वाचा. त्यासाठी आपण आधीच्या लेखात सॉट, सॉफ, सायकोमेट्री, जोहादी विंडो व अन्य काही तंत्रं बघितली.
तिसरा मंत्र म्हणजे जे/जी लोकं/कंपनी तुमची मुलाखत घेणार, त्यांना नेमकं काय हव्ांय, ते तुम्हाला कळलंय का?
हे तीन मंत्र लक्षात आले तर बरेचसे प्रश्न सुटू शकतात. 
एक उदाहरण देतो.
कॉलेजमधली एक मुलगी मी वर्ग सुरू व्हायच्या आधी धावत-पळत आली. म्हणाली, ‘सर, एक प्रख्यात कंपनीसाठी शेवटच्या 5 लोकांमध्ये माझी निवड झाली आहे; पण मुलाखतीनंतर ते फक्त 1 निवडणार आहेत आणि 14 लाखांचे पॅकेज आहे!’
 मी म्हणालो की फारच छान, पण तुझ्या चेहर्‍यावर घाम आणि मूर्तिमंत भीती व काळजी आणि आठय़ा का आहेत? तेव्हा ती म्हणाली की जी 5 मुलं निवडली गेली आहेत त्यात मला एकटीलाच 66 टक्के आहेत व बाकी चौघेही 70 टक्केच्या वर आहेत, माझं काही खरं नाही!
मी तिला म्हणालो, ‘बाकीचे 70+ टक्के व तू 66 टक्के असे कंपनीला माहिती असूनही कंपनीने तुला का बोलावलं, याचा विचार केला आहेस का? त्यांना तुझ्या रेझ्युमेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी वेगळेपण जाणवलंय, त्यावर फोकस कर व उत्साहीपणे मुलाखत दे! मी तुझा मॉक इंटरव्ह्यू घेतलाय, तू उत्तम आहेस! 
त्या मुलीने दुसर्‍या दिवशी छान पेढे दिले! पूर्ण कॉलेजात तिला एकटीला तो 14 लाखांचा जॉब मिळाला.
तिचं एक्स्ट्रा करिक्युलर, मैत्रीपूर्ण बोलणं आणि शिकण्याची ऊर्मी हे मुलाखतीत तिने उत्तम सादर केलं आणि तिला जॉब मिळाला! मी तिच्या घेतलेल्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये मला हे सर्व जाणवलेलं होतंच; त्याची फक्त मी तिला आठवण करून दिली!
ही गोष्ट सांगण्याची दोन कारणं. 
पहिलं हे माझ्यादेखत 3 वर्षापूर्वी घडलंय, सांगोवांगी नाही!
 दुसरं हे तत्त्व तुम्हालाही तंतोतंत लागू होतं.
 मुलाखत उत्तम होण्यासाठी वरील तीन मंत्रांचा समुच्चय तुम्हीसुद्धा लक्षात ठेवावा हे दुसरं कारण!
ही यंत्रणा समजावून घेतल्यावर पुढील भागात आपण काही तांत्रिक बाबींचा ऊहापोह करू!

Web Title: What do you think, why do people take the interview exactly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.