या रिकामपणाचं करायचं काय?
By Admin | Updated: April 30, 2015 17:28 IST2015-04-30T17:28:55+5:302015-04-30T17:28:55+5:30
रानावावरातली कामं करायची किंवा गावातल्या गावात उचापती करत हिंडत राहायचे. तालुक्याच्या वगैरे जरा ब:या शहरातली पोरं निदान ‘स्पोकन इंग्लिश’ किंवा कॉम्प्युटर वगैरेंची क्लासेस जॉइन करतात. वाचनवेडय़ांसाठी तिथे लहानमोठं एखादं का होईना, ग्रंथालय असतं. पांढरमातीच्या गधडय़ा खेडय़ात असलं काहीच नसतं. मग पोरांनी करायचं काय? याचं उत्तर कसं शोधायचं?

या रिकामपणाचं करायचं काय?
खेडय़ापाडय़ात राहणा-या आणि सुटीत फक्त उखाळ्यापाखाळ्या करणा-या पोरांनी दुसरं करायचं काय?
‘काय मग बंटीशेठ, लागल्या सुट्टय़ा?’
‘लागल्या की !’
‘मग आता काय मामाच्या गावाला जाणार?’
‘मामाच्या गावाला? हे हे हे.’ बंटी खळखळून हसला. ‘लहानंय काय मी आता, सुट्टय़ा लागल्या की मामाच्या गावाला जायला?’
‘मग काय प्लान सुट्टीचे?’
‘प्लान कसले करणार? सकाळ-संध्याकाळ इथंच गावात इकडं-तिकडं करायचं, दुपारी शेतात जायचं.’
‘शेतातली कामं करतोस तू?’
‘न करून सांगतोय कुणाला? दादांच्या किरकिरपेक्षा शेतात जाणं परवडतं. काम असू, नसू.’
‘किरकिर करतात दादा? का?’
‘गावात बोंबलत हिंडू नकोस म्हणतात.’
‘गावाला हिंडायचंच कशाला पण? काही वाचन-लेखन करावं, काही खेळावं.’
‘काय वाचणार इथं आपल्या गावात? रोजच्या पेपराशिवाय आहे काय इथे वाचायला?’
‘तेही खरंच ! बाकीची मुलं काय करतात मग गावातली आपल्या, अशा सुट्टय़ाबिट्टय़ांच्या दिवसात?’
‘तुम्ही करायचा तेच !’ बंटी पुन्हा हसला.
बंटीचं उत्तर ऐकून मी बराचसा ओशाळलो. कॉलेज चालू असताना सुट्टय़ांची परोपरीने वाट बघणारे आम्ही, प्रत्यक्षात सुट्टय़ा लागल्यावर चार-दोन दिवसांतच वैतागून जायचो. कॉलेज चालू असताना जवळपासच्या शहरात असलेल्या कॉलेजला जाऊन येण्यात दिवस सरायचा. सुट्टय़ात अख्खा दिवस भारून टाकणा:या रिकाम्या वेळेचं काय करायचं हेच उमजत नसे. भारतातल्या लाखो दरिद्री खेडय़ांसारखंच आमचं गाव. अर्धी अधिक वस्ती शेतक:यांची, अर्धी अधिक घरे पांढ:या मातीची धाब्याची, पाच-पंचवीस नोकरीवाले, उरलेले याच्या त्याच्या वावरात काहीबाही कामे करणारे. कमीअधिक फरकाने तेव्हा आणि आजही गावाचं हेच चित्र. आम्ही सकाळी उठलो की दणकेबाज न्याहारीबिहारी करून घराबाहेर पडायचो. गावाच्या बाहेरून जाणा:या रस्त्यावर स्टॅण्ड आहे तिथं जाऊन, या हॉटेलसमोर थांब, त्या टपरीसमोर उभा राहा, तिथे कुणाची वादावादी चाललीय, तर त्यात पडून ती मिटव किंवा त्यात तेल ओतून ती भडकाव असले उद्योग करायचो. या चित्रत अजूनही फार काही बदल झालेला असेल असा माझा समज नव्हताच.
पण मी म्हटलं, चालू पिढीपेक्षा पंधरा-वीस वर्षानी का होईना आपण पुराणोच. हल्लीची मुलं स्मार्ट आणि फास्ट असतात, मात्र ‘तुम्ही करायचात तेच आम्ही करतो.’ या उत्तरानं त्याला छेद दिला.
जरासा विचार केल्यावर असं लक्षात आलं की यापेक्षा काही वेगळं आजही गावात असणं शक्य नाही. वेळ घालवायचा म्हटलं तर स्टॅण्ड, तिथली मोडक्या कुडाची किंवा पत्र्याच्या शेडमधली हॉटेलं, पानटप:या किंवा फारच झालं तर सकाळी संध्याकाळी काही खेळण्यासाठी शाळेचं मैदान यापलीकडे दुस:या जागाच नाहीयेत. दहाएक हजार लोकवस्तीच्या या गावात एकसुद्धा ग्रंथालय नाही. हा लेख लिहिण्याचा विचार केला तेव्हा मी मुद्दाम आठ-दहा खेडय़ांतल्या मित्रंना फोन करून ग्रंथालयाबाबत विचारलं. फक्त एका गावात ग्रंथालयाची नुसती पाटी एका खोलीवर लावलेली आहे. आत एकही पुस्तक नाही. अर्थातच हे ग्रंथालय नुसत्या अनुदानापुरते असणार. जरा मोठय़ा लोकवस्तीच्या गावात एखादा व्हिडीओही असतो. आता डीटूएचच्या माध्यमातून घरोघरीच व्हिडीओ अवतरल्यामुळे मूळ व्हिडीओचा धंदा तेजीत चालण्यासाठी करकरीत नव्या मसाला हिंदी फिल्म्स किंवा अधूनमधून ‘तसल्या’ फिल्म्स लावल्या जातात. त्यामुळे उजळ माथ्याने तिथे जाऊन बसण्याची सोय नसते.
मग करायचं काय? तर रानावावरातली कामं करायची किंवा गावातल्या गावात उचापती करत हिंडत राहायचे. तालुक्याच्या वगैरे जरा ब:या शहरातली पोरं निदान ‘स्पोकन इंग्लिश’ किंवा कॉम्प्युटर वगैरेंची क्लासेस जॉइन करतात. वाचनवेडय़ांसाठी तिथे लहानमोठं एखादं का होईना, ग्रंथालय असतं. या पांढरमातीच्या गधडय़ा खेडय़ात असलं काहीच नसतं. मग पोरांनी करायचं काय?
काही ब:या घरची किंवा ज्यांचे आईवडील सुशिक्षित नोकरदार वगैरे असतात अशी किंवा कॉलेजच्या निमित्ताने शहरात राहून ज्यांना नवी क्षितिजे खुणावत असतात अशी काही चार-सहा मुलं कुठून कुठून पुस्तके गोळा करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. बहुतेक वेळा या अभ्यासाला फार काही शिस्त नसते. साइटवरून अभ्यासक्रम घ्यायचा आणि जमेल तसा अभ्यास करत राहायचं. मागच्या जवळजवळ वीस वर्षात गावातली फक्त तीन मुलं स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी झाली. उरलेली बहुसंख्य मुलं बारावीनंतर डी.एड. करतात किंवा पदवी-पदव्युत्तर शिक्षणानंतर बी.एड.ला जातात. डी.एड. झालेल्या मुलांची सीईटी होणार, होणार अशा वषार्नुवर्षे आवया उठत असतात. मध्येच कधीतरी ती होते आणि एखाद-दुसरा पोरगा लागून जातो. बी.एड. करणा:यांचे हाल आणखी वेगळे असतात. त्यांना सेट-नेट व्हावं लागतं. जमल्यास पीएच.डी.ही. तरीही प्राध्यापकी मिळेलच याची अजिबात खात्री नसते. मग स्थानिक गावपुढा:यांकडे अजिजी करून त्याच्या मध्यस्थीने कुणातरी संस्थाचालकाकडे लग्गा लावून खेटे घालत राहायचं. शिक्षकाच्या नोकरीचा भाव किमान दहा लाखांवर आणि प्राध्यापकाच्या पंधरा ते वीस किंवा अधिकही. हे परवडणारे फारच थोडे असतात. गबरगंड बागायतदाराच्या किंवा मुळातच गर्भश्रीमंतांच्या पोरांनाच ते जमू शकतं. बाकीच्यांनी काय करायचे? गावात गटाळ्या मारत हिंडणो एवढाच एक मार्ग त्यांच्यापुढे उरतो. मग ही मुलं या - त्या सभापती, आमदार, खासदाराची कार्यकर्ती होऊन जातात. गावात दहावीर्पयत शाळा असेल तर यातली काही मुलं एकत्र येऊन ‘अमुक ढमुक कोचिंग क्लासेस’ असं भारदस्त नाव देऊन एखाद्या खोलीत शिकवण्या घेतात. या शिकवण्यांची फीज् शहराच्या तुलनेनं फारच कमी म्हणजे फारतर पन्नास ते शंभर रुपये महिना एवढी असते. शिकवण्या घेणा:या या तरुणांना गावात जराशा आदराने ‘सर’ म्हणून हाक मारली जाते एवढाच यात कमाईचा खरा भाग.
गावातल्या काही हॉटेलांच्या दारात कॅरमचे किंवा हल्ली गावोगावी आमदार-खासदार निधीतून सांस्कृतिक सभागृहं बांधलेली असतात, तिथे, ओसाड पडू घातलेल्या ग्रामदैवताच्या देवळात पत्त्यांचे फड भरतात, तिथे कोंडाळे करून अनेक जण बसलेले असतात. दहा-वीस रुपये औटिंगने दुपारभर खेळत राहतात. काहीजण दिवसभर सगळ्याच फडात टाइमपास करून जेवायच्या वेळेला घरी येऊन पुन्हा इकडे तिकडे टाइमपास करण्याच्या डय़ूटीवर रुजू होतात. काहीजण संध्याकाळी शाळेत किंवा आणखी तशाच कुठल्या पटांगणावर व्हॉलीबॉल खेळतात. तो खेळ बघत पाच-पंचवीसजण तिथे बसून राहतात. इतर ‘क्रीडा’ प्रकारांमध्ये मोबाइलवर गेम्स खेळणं हा प्रकारही हल्ली जोमात असतो. काही मुलं पोलीस किंवा मिलिटरीत भरती होण्यासाठी प्रय} करत असतात. ही मुले सकाळी-संध्याकाळी धावायला, व्यायाम करायला गावाबाहेर डांबरी सडकेवर जमतात. बकाल शहरीकरणाच्या सुजकट वाटेवरून प्रवास करत असलेल्या गावात हल्ली व्यायामासाठी तालमी वगैरे उरलेल्याच नाहीत. यातलाही एखाद-दुसरा मुलगा पोलिसात भरती होऊन जातो. बाकीची मुलं कंडक्टरच्याही परीक्षा देण्याचे प्रय} करून दमल्यावर चार दोन वर्षांत पुन्हा गावरहाटीतल्या ठरलेल्या खुंटय़ावर येऊन उभी राहतात.
शिक्षकांची किंवा तशाच सुस्थितीतल्या काहींची मेडिकल-इंजिनिअरिंग वगैरे करणारी मुले सोडली तर बहुसंख्य गावांतल्या बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी करणा:या बहुसंख्य तरुण मुलांची ही अवस्था असते. यातले काही कंपन्यांमध्ये काहीबाही जॉब शोधत पुण्या-मुंबईकडे जातात. उरलेले रात्री उशिरार्पयत बाजाराच्या पटांगणावर, कुणाच्या कट्टय़ावर, ओटय़ावर गटागटाने बसून गावातल्या उखाळ्यापाखाळ्या, गावठी राजकारण किंवा क्वचित कुणा पोरीबाळींबद्दल काही चावटसावट बोलत बसतात.
प्रत्येक गावात हे चित्र इतक्याच काळ्या रंगाचं असेल असं नाही, पण पोरांना उजळ दिशांचं भान देणारी अशी गावं संख्येनं नजरेत भरण्याइतकीही नाहीत, हा यातला सर्वात दुर्दैवी भाग आहे. बहुतेक खेडय़ांमध्ये आलेला प्रत्येक दिवस उगवला तसाच संपतो. पुन्हा दुसरा दिवस मागच्या पानावरून पुढे चालू होतो. जागतिकीकरणाच्या आणि दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत चाललेल्या बाजारीकरणाच्या या काळात ऐन उमेदीचे दिवस असं बसून खाण्यात व्यर्थ घालवणं या मुलांच्याच नव्हे, तर तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणा:या एकूणच देशाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
कुणा भाग्यविधात्याची वाट पाहत न बसता ‘या रिकामपणाचं करायचं काय ?’ याचं उत्तर आता या मुलांनीच शोधायला हवंय !
बालाजी सुतार,
अंबाजोगाई