ठळक मुद्देआएंगे हम वापस या वळणावर 13 वर्षाचा आयपीएलचा प्रवास कसा येऊन ठेपला?

- मेघना ढोके

‘आएंगे हम वापस! असा नारा देत, रॅप करत यंदाचं म्हणजे आयपीएल 2020 चं अ‍ॅँथेम बीसीसीआयने रिलीज केलं..
जिंदगी के इस खेल में, साथ है हम,
बाट के गम करे, पार इन मुश्किलोंको.
आएंगे हम वापस.
अशा शब्दांत आयपीएलचा आगाझ झाला. कोरोनाकाळात देशाबाहेर दूर यूएईत रंगणार असून दोनच दिवसांवर आता हा बडा खेला येऊन ठेपला आहे. इंडियन प्रीमिअर लिग म्हणा किंवा नाकं मुरडत इंडियन पैसा लिग म्हणा, गोष्ट खरी हीच की आयपीएल हा क्रिकेटचा एक जागतिक सोहळा बनला आहे आणि जगभरातले गुणी खेळाडू तिथं आपलं टॅलेण्ट दाखवू लागले त्याला यंदा 13 वर्षे होतील.
पण ही चर्चा आयपीएलची, क्रिकेटची, खेळाची नाही तर ही आहे आयपीएल अ‍ॅँथेम्सची. दरवर्षी आयपीएलच्या निमित्ताने रिलीज होत असलेल्या गाण्याची आणि त्या गाण्यासह वाजणार्‍या विशिष्ट आयपीएल धूनची.
यंदाचं आयपीएल रिकाम्या स्टेडिअममध्ये होतं आहे, कोरोनाचं सावट आहेच, ‘स्क्रीन बनेगा स्टेडिअम’ म्हणत आयपीएलचा माहौल तयार केला जातोय. अर्थात, या गाण्यावरही शब्द पळवापळवीचे आरोप झाले, वाद झाले, म्हणजे प्रथेप्रमाणे चर्चा व्हावी, मसाला मिळावा असं सगळं यथासांग सुरूही झालं.


मात्र 2008 ते 2020 या 13 वर्षातल्या आयपीएल अ‍ॅँथेम्सवर नजर घाला.
काय दिसतं?
ती फक्त गाणी होती का? तर होतीच, मात्र ती गाणी ते शब्द पॉप्युलर कल्चरमध्ये त्या त्या काळची क्रिकेटपलीकडची गोष्ट सांगतात.
त्या काळच्या तारुण्याची, देशाच्या सामाजिक-राजकीय वास्तवाची, देशाच्या मूडची आणि क्रिकेटच्याच नाही तर लोकभावनेच्याही बदलत्या रंगरूपाची ती गोष्ट आहे.
गाणी, ते शब्द, त्यातली माणसं, व्हिडिओ, नृत्य, माणसांची देहबोली हे सारंच म्हटलं तर ठरवून, विचारपूर्वकच करण्यात आलं होतं, करण्यात येतंही; मात्र तरीही काळाचे काही तुकडे त्यात दिसतील आणि  लक्षात येईल की गेल्या 13 वर्षात क्रिकेटच नाही तर आपलं जगणंही कसं बदललं.
त्या बदललेल्या जगण्याची एक झलक पहात बदलता खेळच नाही तर बदलतं पॉप्युलर कल्चरही समजून घ्यायचं तर हा ऐवज सोबत हवा.
आएंगे हम वापस या वळणावर 13 वर्षाचा आयपीएलचा प्रवास कसा येऊन ठेपला त्याचा हा म्युझिकल प्रवास.

आयपीएल- 1 ( 2008)
ही आयपीएलची सुरुवात होती. धोनीच्या तरुण संघानं नुकताच टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. वीस ओव्हरचं मसाला क्रिकेट आपल्याकडे नुकतंच रुजू लागलं होतं. त्यावेळी हे पहिलं अ‍ॅँथेम आलं. त्याचे शब्दच होते, यह है क्रिकेट धर्मयुद्ध. ए. आर. रेहमानचं संगीत या गाण्याला होतं. त्या गाण्याचे शब्दही पेटून उठावं कुणी असेच होते, आंखे उंची कर देख शिखर, तू लगा दाव, तू लगा पेच, तू लगा तेज, तू लगा दाव.
नव्या जगण्याचा डाव मांडून तेव्हा क्रिकेटच नाही तर देशातलं तारुण्यही सळसळत होतं.

आयपीएल- 2 (2009)
इम्पॉसिबल था, अब नहीं होगा असं म्हणत डिव्हायडेड बाय नेशन, युनायटेड बाय आयपीएल म्हणत देशाच्या एकतेचं एक वेगळं चित्र हे गाणं मांडत होतं. तिकडे रांचीचा धोनी, चेन्नईचा धोनी थला होत व्हिसल पोडू गात होता. आणि एका वेगळ्याच एकीची गोष्ट हे गाणं रंगवत होतं.

आयपीएल- 3 (2010)
सारे जहॉँसे अच्छा ही या गाण्याची थिम होती. आयपीएल भारतात परतलं होतं आणि नव्यानं आपल्या विश्वासार्हतेची पायाभरणी करत होतं. त्या वर्षीचा देशांतर्गत माहौल डल होता आणि म्हणून कदाचित कॅम्पेनही.

आयपीएल- 4 (2011)
दम लगा के मारा रे म्हणत आलेलं हे गाणं. विश्वचषक, देशातली आंदोलनं हे सारं आगेमागे होतंच. मात्र यातलं वैशिष्टय़ म्हणजे पहिल्यांदाच आयपीएल अ‍ॅँथेममध्ये महिला प्रेक्षक अधिक ठळकपणे दिसल्या आणि चाहत्यांचंही रंगरूप बदलताना दिसलं.

आयपीएल- 5 (2012)
ऐसा मौका फिर कहॉँ मिलेगा म्हणत या गाण्यात क्रिकेट कॉमेण्टेटर्सही झळकले. एरव्ही या खेळात क्रिकेटर्स स्टार होते, प्रेक्षकही होते पण कॉमेण्ट्री बॉक्सचं आणि बदलत्या क्रिकेट परिभाषेचं रूप या गाण्यात दिसलं.

आयपीएल- 6 (2013)
हे गाणं बहुदा आयपीएलचं सर्वात गाजलेलं गाणं. जम्पिंग झपॅक, जंपक जंपक म्हणत सारा देश नाचला. त्या गाण्याच्या जाहिरातीत भेटणारी फराह खानही क्रिकेट चाहत्यांना सांगत होती, सिर्फ देखने का नहीं, नाचने का!’ लोकांनी आपल्या हातात मतांची सूत्रं घेतली तो हा काळ.

आयपीएल- 7 (2014)
देशात सत्ताबदल झाला. हिरो असण्याची सारी परिभाषाच या काळानं बदलून टाकली. आयपीएलचं गाणंही बदललं. जरा सिरीअस झालं, मात्र त्यातले शब्द बदलत्या काळाचं वर्णन होतं, आयपीएल इट्स वॉर ऑफ क्रिकेट, इट्स गेम ऑफ हिरो. बदलांचे वारे आणि हिरो वरशिपिंग क्रिकेट फिल्डवरही उतरलीच.

आयपीएल- 8 (2015)
यह है इंडिया का त्योहार म्हणत देशातला उत्साही मूड आणि सेलिब्रेशनचा टोन या आयपीएलनेही कायम ठेवला. क्रिकेटचं युद्ध वर्ष संपता संपता देशाचा सण बनून आलं. आणि मैदानावरचे हिरो जाऊन या गाण्यात पुन्हा कॉमेण्टेटर्स आले, आम आदमीचे प्रतिनिधी.

आयपीएल- 9 (2016)
अच्छे दिनची स्वप्नं स्थिरावली आणि आयपीएलचं थिम सॉँगही हो एक इंडिया हॅपीवाला, प्यारवाला असं म्हणत सब का किस्सा एक हो, खुशियों का हिस्सा एक हो असं सांगत नव्या स्वप्नांची भाषा बोलू लागलं. 

आयपीएल- 10 (2017)
ये दस साल आप के नाम म्हणत आयपीएलच्या दहाव्या वर्षातलं सेलिब्रेशन या गाण्यानं केले. तोवर टी-20 क्रिकेटही रुजलं, भारतीय क्रिकेटपटूंची एक फळी निवृत्त होऊन कोटींच्या रकमा लिलावात घेणारी खेडय़ापाडय़ातली तरुण पिढी तोवर मैदानात दाखल झाली होती.

आयपीएल- 11 (2018)
हे गाणं सांगत होतं की, आयपीएल म्हणजे बेस्ट व्हर्सेस बेस्ट. बाकी सगळे बाद. ये खेल है शेर जवानोंका.
जगातले सगळे सरस इथं खेळतात, असा दावा करणारं हे गाणं. पण ही परिभाषा फार काळ टिकली नाही, कारण प्रस्थापित तेच बेस्ट हे या काळाला पचलं नाही.

आयपीएल-12 (2019)

तुमच्या खेळात आमचा वाटा द्या, अब खेल बोलेगा म्हणत आयपीएलने आपला सूर बदलला आणि गावखेडय़ातल्या टॅलेण्टचीही दखल घेतली तो हा काळ. चलो, कुछ करके दिखाओ, मिलेगा मौका, फिर ना ऐसा म्हणत टॅलेण्ट असेल तर ‘आत’ नसेल तर ‘बाहेर’ मग तुम्ही कुणीही असा काळाचा सूर आयपीएलमध्ये दिसला.आणि समाजातही.

आणि 
आता आयपीएल 2020

कोरोनाच्या उदास, भयंकर काळात जगण्याची इच्छा सांगणारं, आएंगे हम वापस.

 

(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com

Web Title: What do the theme songs of the last 13 years of IPL say? IPL 2020, aayenge hum wapas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.