‘निर्माण’ उपक्रमात सहभागी व्हायचंय?
By Admin | Updated: July 24, 2014 19:55 IST2014-07-24T19:55:15+5:302014-07-24T19:55:15+5:30
डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा खास तरुण मुलांसाठीचा उपक्रम

‘निर्माण’ उपक्रमात सहभागी व्हायचंय?
>डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा खास तरुण मुलांसाठीचा उपक्रम. २00६ मध्ये त्याची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाची, त्यात काम करणार्या मुलांच्या तळमळीची खूप चर्चाही झाली. पण नुस्ते समाजातील जटिल प्रश्नांची उकल शोधणं एवढंच या अभ्यासाला अभिप्रेत नाही तर त्यासोबतच स्वत:च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन शोधणं, सुयोग्य करिअर निवडता येणं हेही या अभ्यासात अपेक्षित आहे. आपल्या जगण्याचं लक्ष्य काय? आपलं ध्येय काय? आपल्याला आयुष्यात नक्की काय कमवायचंय? आपल्याला सेटल व्हायचं म्हणजे काय करायचंय नक्की आयुष्यात?
या सार्या प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधत जावी या हेतूनं चालणारी निर्माण ही एक शोधप्रक्रियाच आहे.
पण असा स्वत:विषयीचा शोध घ्यायची ताकद आपलं शिक्षण आज कुठं देतं? करिअर आणि पैसा या दावणीला स्वत:ला बांधून घेत मुलं फक्त धावत आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक समृद्ध, समाधान, आनंद देणार्या गोष्टी कशा शोधता येतील याचा शोध निर्माणच्या या उपक्रमात घेण्याचा प्रयत्न केला जातो.
२00६ ते २0१४ या काळात निर्माणच्या याच प्रक्रियेतून ५ बॅच म्हणजेच महाराष्ट्रातील साडेपाचशेहून अधिक मुलं स्वत:ला शोधत गेली. त्यामध्ये तरुण डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शिक्षक, फिल्ममेकर, पत्रकार, शेतकरी, विज्ञान, कला, वाणिज्य शाखांचे पदवीधर आहेत. त्यौपकी १00 पेक्षा अधिक जण आज पूर्णवेळ सामाजिक समस्यांवर काम करत आहेत. दुर्गम भागात जाऊन आपला समाज बदलावा म्हणून प्रयत्न करत आहेत.
स्वत:ला शोधण्याची, वेगळ्या वाटेनं जाऊन पहायची, चाकोरी सोडायची आणि तरीही चाकोरीतल्या प्रश्नांना भिडण्याची तयारी असेल तर ‘निर्माण’ या शोधप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आता उपलब्ध आहे. निर्माणची सहावी बॅच येत्या जानेवारीत सुरू होत आहे. प्रवेश अर्ज आणि त्यानंतर मुलाखती आणि कठोर चाळणीच्या निवड प्रक्रियेतून ज्यांची निवड होईल त्यांना निर्माणच्या उपक्रमात सहभागी व्हायची संधी मिळू शकते.
निर्माणमध्ये सहभागी व्हायचंय?
http://nirman.mkcl.org/ या वेबसाइटवर जाऊन प्रवेश अर्ज डाऊनलोड करता येईल.
तो अर्ज त्वरित भरून या पत्त्यावर किंवा nirmanites@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा.
अंतिम मुदत? - १५ ऑगस्ट २0१४ संपर्क - अमृत बंग - ९४२२५0१४९६
निखिल जोशी - ९४0५७४0३६0