wanna change the system, be in the system! | आता आम्ही कायतरी करणारच असं म्हणता? मग म्हटलं ह्ये सांगून जावं..
आता आम्ही कायतरी करणारच असं म्हणता? मग म्हटलं ह्ये सांगून जावं..

- मिलिंद थत्ते

 जिंदगी वसूल सदर लिहिता लिहिता अनेक ई-मेल्स आल्या. वाचून उत्साह आला. आता आम्ही कायतरी करणारच - असं काहीजण म्हणाले, तर काहींनी लिहिले - आम्ही सुरुवात केलीय, पण कधीमधी अडखळतोय. माहिती अधिकाराबाबत प्रश्न आले, ग्रामपंचायतीबाबतच्या तक्रारी आल्या - असे विषय चर्चेत आले. एक अधूनमधून डोकावणारा प्रश्न होता - हे सगळं कुटं शिकाया भेटतं? 
आज या सदराचा शेवट करताना म्हटलं ह्ये सांगून जावं.. हे सगळं शिकवणारा एकच शिक्षक आहे. 
‘अनुभव’ त्याचं नाव. 
हा विचित्न शिक्षक आहे. आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो. आम्ही जेव्हा वयम् या चळवळीची सुरुवात केली, तेव्हा आम्हालाही यातलं काही कळत नव्हतं. लोकशाही नेमकी चालते कशी? आणि  आपण साध्यासुध्या लोकांनी कुठलीही सत्ता हातात नसताना ही लोकशाही चालवायची कशी? हे आम्हालाही सुधरत नव्हतं; पण प्रयोग करत करत चुकत-माकत आम्ही शिकलो. 
काय शिकलो?
* हेच की, आपल्याला बोचणारा, भेडसावणारा एक छोटासा प्रश्न घ्यायचा, अन्  तो सोडवण्यासाठी मिळेल त्या कायदेशीर मार्गाने झगडत राहायचं. जो प्रश्न किंवा जी समस्या आपल्याला अस्वस्थ करत नाही, त्यावर आपण लढू शकत नाही. 
* हेच की - प्रत्येकालाच अभिमान / अहंकार असतो. आपल्याला आहे तसा समोरच्यालाही आहे. म्हणून सरकारी कर्मचारी / अधिकारी यांच्याशी बोलताना राग आला तरी त्यांचा वैयक्तिक अपमान करायचा नाही. आपण सभ्य आहोत, सभ्यपणे शांतपणे बोलायचं. आपला मुद्दा, आपले हक्क सोडायचे नाहीत; पण भाषा सभ्यतेचीच हवी.
* हेच की - वैयक्तिक लाभासाठी भांडण्यात सामथ्र्य नसतं. गावाच्या फायद्यासाठी, अनेकांच्या लाभासाठी लढण्यात ताकद असते. एकत्न येण्याची सवय लागणं हा लोकशाही लढय़ाचा पहिला फायदा आहे.
* हेच की - जसे आपण तसेच शासन! सामान्य नागरिकांत जसे चांगले-वाईट लोक असतात, तसेच शासनात असतात. सगळेच भ्रष्ट आहेत, जो तो खायच्या मागे असतो,  - असली सरसकट विधाने करू नयेत. कारण ‘सगळंच वाईट’ असं कधीच नसतं!
* वयम् चळवळीत किती जातीतले युवक-युवती सहभागी आहेत सांगता येणार नाही, कारण ते आम्ही कधीच पाहिलेलं नाही. अनेकांची आडनावं माहीत नसतात आम्हाला, कारण त्याच्याशी घेणंदेणंच नाही आपल्याला! भारतीय नागरिक म्हणूनच आम्ही एकमेकांची साथ देतो. आम्ही कायदा शिकण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतो. त्यातच नागरिकत्व म्हणजे काय, ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ म्हणजे नेमकं काय, गाव हा स्वराज्याचा पाया कसा? हेही सारे शिकतो आणि प्रत्यक्षातही आणतो. 
पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील दोनशेहून अधिक गावांत वयम् चळवळीचे युवक गट कार्यरत आहेत. रोजगार हमी कायदा वापरून 13000 मजुरांना त्यांच्याच गावातल्या युवकांनी काम मिळवून दिले. स्थलांतर थांबवले. 500 छोटय़ा शेतकर्‍यांना पाण्याची सोय करून दिली. 1600हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना वनहक्क मिळवून दिले. 47 गावांच्या ग्रामसभांनी आपापला निधी मिळवला व अडलेली शासकीय कामे मार्गी लावून दाखवली. 12 गावांत सामूहिक निर्णय आणि श्रमदानाची रीत पडली. शासन आणि नागरिक यांच्यात समानतेचं नातं रूळतं आहे.
असं घडू शकतं आणि हे घडवण्याची ताकद आपल्यासारख्या सामान्य माणसात असतेच हा वयम् चळवळीचा विश्वास आहे.
 

Web Title: wanna change the system, be in the system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.