सांगकाम्यांच्या फौजेचा उपयोग शून्य!
By Admin | Updated: March 26, 2015 20:46 IST2015-03-26T20:46:12+5:302015-03-26T20:46:12+5:30
जर्मनीला जाऊन नवी नजर घेऊन आलेल्या एका आयटीआयवाल्या मित्राचा अनुभव सांगकाम्यांच्या फौजेचा उपयोग शून्य!

सांगकाम्यांच्या फौजेचा उपयोग शून्य!
जर्मनीला जाऊन नवी नजर घेऊन आलेल्या एका आयटीआयवाल्या मित्राचा अनुभव सांगकाम्यांच्या फौजेचा उपयोग शून्य!
अविनाश, नाशिक
‘तरुणांना काम, म्हातार्यांना आराम’ असं म्हणणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि त्यात तरुणांसाठी असलेल्या योजनांचा लेख ‘ऑक्सिजन’मध्ये वाचला.
आनंद वाटला की, या देशात सरकार तरुणांचा काही विचार करतं आहे!
पण हा विचार शिक्षणाच्या संदर्भात शाळा-कॉलेजपासून व्हायला हवा.
मी आयटीआय केलं आहे, एका र्जमन कोलॅबरेशन कंपनीत काम करतो.
मला कंपनीनं ट्रेनिंगसाठी र्जमनीला पाठवलं होतं. माझं काम तिथं मला उत्तम जमत होतं; पण दोनच दिवसांत माझ्या लक्षात आलं की, मी सांगकाम्या आहे. म्हणजे कुणी मला काम सांगितलं, एखादा जॉब कशापद्धतीनं करायचा हे दाखवून दिलं की मी तो चांगला करायचो; पण स्वत:हून काम दिसणं, ते करणं, माझं स्किल दाखवणं हे मला काही येतच नव्हतं.
तिथला माझा गाइड जो होता, तो माझ्याच वयाचा. त्यालाही इंग्रजी धड येत नव्हतं, मलाही. पण तुटक्यामुटक्या भाषेत त्यानं मला समजावलं की, ‘तुला जे पटतं-रुचतं ते कर. तुझे विचार मांड, आम्ही करतोय त्याच पद्धतीनं तू काम केलं पाहिजे असं काही नाही, तू तुझ्या पद्धतीनं काम कर! घाबरू नको.’
पहिल्या पाच-सहा दिवसानंतर तो मला जॉब सांगायचा, कसं करू विचारलं की म्हणायचा तू आधी तुला जमेल तसं करून बघ, नाही जमलं तर मी सांगतो!
हा धडा, हे स्किल माझ्यासाठी नवीन होतं. त्यातून मला जो आत्मविश्वास मिळाला तो वेगळा होता. खरं सांगतो, भीती वाटली. खूप भीती वाटली. पण नंतर जमलं!
हे असं स्किलबेस शिक्षण आपलं सरकार शाळेपासून का देत नाही, असा प्रश्न आता मला पडलेला आहे. पण माझ्या अनुभवातून मी सगळ्यांना एकच सांगतो, चुकेल. पण आपलं डोकं वापरून काम करायचं. तरच आपण काहीतरी प्रगती करू शकू!