उडो जी भरके.

By Admin | Updated: May 1, 2014 14:54 IST2014-05-01T14:44:44+5:302014-05-01T14:54:52+5:30

आपल्याला पाखरासारखं उडता येतं. आपण उडू शकतो, वार्‍याचा हात धरून, त्याच्यावर स्वार होत या डोंगरावरून त्या डोंगरावर उडत उडत जाऊ शकतो.पाखरू होतं आपलं.

Udo G Fry | उडो जी भरके.

उडो जी भरके.

 पॅराग्लायडिंग / पॅरासेलिंग 

आपल्याला पाखरासारखं उडता येतं. आपण उडू शकतो, वार्‍याचा हात धरून, त्याच्यावर स्वार होत या डोंगरावरून त्या डोंगरावर उडत उडत जाऊ शकतो.पाखरू होतं आपलं.छोटंसं पाखरू. उडू म्हणता धडधडतंच छातीत.पोटात खड्डा पडतोच.पण एकदा घेतली हवेत भरारी की वाटतं उतरूच नये खाली. उडत जावं. दूर. खूप दूर. पहात रहावा नजर जाईल तिथपर्यंतचा धरणीवरचा पसारा.
पण असं खरंच होऊ शकतं?
का नाही? ज्यांना उडावंसं वाटतं, त्यांनी उडून का पाहू नये? 
आपणही एकदा घेऊनच पहावा तो अनुभव. त्याला ‘बर्ड आय व्ह्यू’ म्हणतात तो नजारा एकदा तरी डोळ्यात साठवावाच.
आपणच आपापलं उडत जावं पाखरासारखं, तरंगावं हवेत घारीसारखं, विहार करावा गरुडासारखा.
असं आत्यंतिक ‘रोमॅण्टिक’ तरीही धाडसी, डेअरिंगबाज फिलिंग असेल मनात आणि ते फिलिंग थ्रिलच्या तडक्यासह अनुभवायचं असेल तर एकदा तरी पॅराग्लायडिंग किंवा पॅरासेलिंग करून पहावं.
पॅराग्लायडिंग म्हणजे पठारावरून पळत जात, डोंगरउतारावरून योग्य वेगात धावत हवेत झेपावणं आणि पॅराशूटच्या सहाय्यानं उडत, तरंगत प्रवास करावा.
पॅरासेलिंगही असंच पण फक्त हवेत झेपवण्याचा प्रवास जहाजावरून होतो. चहूबाजूला पाणी आणि एका मोटारसारशी बांधलेल्या आपल्या दोर्‍या सुटतात आणि आपण हवेत झेपावतो.
एकदा झेपावलं की उडायला लागायचं, ते उडणं ‘जगून’ घ्यायचं.

मी ट्रेकिंगला जायचो. हिमालयातही बरेच ट्रेक केले. त्या ट्रेकच्या काळातच मी हिमालयात हे पॅराग्लायडिंग पहिल्यांदा बघितलं. पहिला विचार हाच मनात आला की, हे आपल्याला करता येईल का? पण शिकण्याची काही सोय इकडे नव्हतीच. तिथे एका ग्लायडर मित्राशी दोस्ती झाली, त्याच्याकडे शिकायला सुरुवात केली. त्याला घेऊन मी महाराष्ट्रात आलो. मला आपल्याकडचे गडकिल्ले पाठ होते. त्याच्याकडे ग्लायडिंगचा अनुभव होता. त्याला आपल्या वातावरणात, किल्ल्यांवर ग्लायडिंगचा अनुभव मिळाला आणि मला त्याच्याकडून शिकता आलं.
ग्लायडिंगमधलं थ्रील स्वस्थ बसू देत नव्हतंच. मग मी हिमालयाच्या पर्वतरांगामधूनही ग्लायडिंग केलं. हिमाचल प्रदेशातल्या कांगा व्हॅलीतून मी ग्लायडिंगला सुरुवात केली. ५00 मीटरवरून उडायचो. म्हणजे साधारण १६00 फूट उंचीवरून. तो सगळा प्रवासच थरारक होता. जमिनीवर उतरायचंच नाही, सगळा प्रवास उडत, या डोंगरावरून त्या डोंगरावर असा सात दिवस प्रवास केला. रोज सुमारे ५0 किलोमीटर अंतर मी पार करत असे. डोंगरावर उतरलं की कॅम्पिंग करायचं. तिथंच रहायचं. पाणी शोधायचं. काटक्याकुटक्या जमवायच्या आणि स्वत:साठी काहीतरी शिजवून खायचं. पाठीवर तसंही फार सामानसुमान घेऊन उडता येत नाहीच. न्युडल्स किंवा पाणी घालून दोन मिन्टात शिजेल असं काहीतरी शिजवायचं आणि खायचं. बरोबर माझे काही ग्लायडर मित्रही होते. पण नियम असा की ज्यानं त्यानं स्वत:चं जेवण बनवायचं, तेवढंच खायचं. सात दिवस एकट्याला पुरेल एवढाच शिधा सोबत घ्यायचा. कुणाला काही द्यायचं नाही, कमीत कमी सामानात जगायचं तर असं करावंच लागतं. 
सातव्या दिवशी जमिनीवर लॅण्ड केलं तेव्हा मी ३00 किलोमीटर प्रवास केलेला होता.
हा अनुभवच अत्यंत थ्रिलिंग असतो, आपण पक्ष्यासारखं एकटंच आपल्याला हव्या त्या दिशेनं उडू शकतो. वाटलं तर मस्त हवेत तरंगू शकतो. कितीतरी वेळ खालचा नजारा पाहू शकतो यापेक्षा वेगळा आनंद, वेगळं थ्रील काय सांगणार?
मी तर नेहमी एकच म्हणतो, ज्याला आपण उडावं असं वाटतं त्यानं एकदा तरी उडून पहायलाच हवं. कुणी म्हणेल विमानात बसलो की उडतोच ना आपण?
ते उडणं ‘आपलं’ नसतं, विमान उतरतं किंवा हवेत झेपावतं तेव्हाही खिडकीतून चतकोर नजारा दिसतो.
खरी मज्जा असते ती पक्ष्यासारखं तरंगण्यात, एकाचवेळी समोरचे नयनरम्य दृश्य नजरेत साठवण्यात.
हा खरंखुरं उडण्याचा अनुभव पॅराग्लायडिंग/ पॅरासेलिंग देतं. पण उडल्याशिवाय कसा कळणार ‘उडण्या’चा खरा आनंद?
तेव्हा उडा.! 

खर्च किती?
मुळातच हा खेळ तसा थोडा महागडा आहे. 
त्याचं मुख्य कारण असं की, त्यासाठी लागणारी साधनं, उपकरणं आयात करावी लागतात. चार दिवसाचं प्रशिक्षण आणि ग्लायडिंग यासाठी १४ हजार रुपये खर्च येतो.

काय करावं / टाळावं?

१) खरंतर जो कुणी धडधाकट आहे, तो कुणीही पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग करू शकतो.

२) ४५ किलो वजनाच्या व्यक्तीपासून ११0 किलो वजनाच्या व्यक्तीपर्यंत (म्हणजे स्त्री-पुरुष दोघंही) कुणीही हवेत मस्त विहार करूच शकतो.

३) अट एकच, हार्टचा काही त्रास नसावा. पाठदुखीचा त्रास किंवा गुडघेदुखीचा प्रचंड त्रास नसावा. हा त्रास असणार्‍यांनी मात्र सहसा पॅराग्लायडिंग टाळावंच.

४) शक्यतो उत्तम प्रशिक्षण देणार्‍या संस्था, ट्रेनरच्या देखरेखीतच प्रशिक्षण घेऊन पॅराग्लायडिंग करावं.

- संजय पेंडूरकर ( इंडस् पॅराग्लायडिंग या संस्थेचे संचालक आणि पॅराग्लायडिंग प्रशिक्षक )

Web Title: Udo G Fry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.