सॉक्रेटिसची ट्रिपल फिल्टर टेस्ट
By Admin | Updated: April 12, 2017 14:49 IST2017-04-12T14:49:34+5:302017-04-12T14:49:34+5:30
सत्यता, चांगुलपणा आणि उपयोगिता.. प्रसिद्ध तत्वतेता सॉक्रेटिसकडे एकदा एक जण आला आणि त्याला सांगू लागला...

सॉक्रेटिसची ट्रिपल फिल्टर टेस्ट
सत्यता, चांगुलपणा आणि उपयोगिता.. प्रसिद्ध तत्वतेता सॉक्रेटिसकडे एकदा एक जण आला आणि त्याला सांगू लागला, ‘तुम्हाला माहित आहे का तुमच्या जिगरी दोस्ताबद्दल आज मी काय ऐकलंय ते?’ एक मिनिट थांब’, सॉक्रेटिस म्हणाला, तू जे काही मला सांगणार आहेस त्यापूर्वी मी एक छोटीशी टेस्ट घेऊ इच्छितो, ट्रीपल फिल्टर टेस्ट. माझ्या मित्राबद्दल आणि तेही मला माहीत नसलेली अशी गोष्ट तू मला सांगतो आहेस. तुझा हेतू कदाचित चांगलाही असेल, पण ते शब्द आपण अगोदर गाळून घेऊ, म्हणजे चांगलं तेवढंच आपल्या पदरात पडेल. पहिल्या चाचणीचं नाव आहे सत्य. सॉक्रेटिसनं त्या गृहस्थाला विचारलं, तू जे काही मला सांगणार आहेस ते सत्य आहे याची शंभर टक्के खात्री तुला आहे का?’ नाही. खरं तर माझ्या फक्त ते कानावर आलं आणि... ‘ठीक आहे. म्हणजे तू जे काही सांगतोयस ते केवळ ऐकीव आहे आणि त्यातली सत्यता तुला घाऊक नाही. आता आपण दुसरी चाचणी घेऊ. या चाचणीचं नाव आहे चांगुलपणा. माझ्या मित्राबद्दल जी गोष्ट तू सांगू पाहातोय ती चांगली आहे का?’- सॉक्रेटिसनं विचारलं. ‘नाही. उलट मी तर..’ - त्या गृहस्थाचे पुढचे शब्द तोंडातच अडकले. ‘पुढे जायचं की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याकडे आणखी एक चाचणी आहे. ‘उपयोगिता’. मला सांग, माझ्या मित्राविषयी तुू जे काही सांगू पाहातोय त्याचा मला काही उपयोग होणार आहे का?’-सॉक्रेटिसनं त्याला विचारलं. ‘नाही, खात्रीनं नाही’, तत्परतेनं तो गृहस्थ उतरला. ‘दोस्ता, माझ्या मित्राबद्दल तू जे काही सांगणार आहेस त्याच्या सत्यतेबद्दल तुला स्वत:लाच खात्री नाही. ते चांगलं तर नाहीच आणि काही उपयोगाचंही नाही, मग तू ते मला कशासाठी सांगतोहेस? कृपा करुन तुझी ही कहाणी तुझ्याकडेच ठेव!’
- आॅक्सिजन टीम