ट्रेक

By Admin | Updated: August 1, 2014 11:39 IST2014-08-01T11:39:00+5:302014-08-01T11:39:00+5:30

डोकं ताळ्यावर आणि होश काबूत ठेवून करण्याचं एक सुंदर पावसाळी साहस

Trek | ट्रेक

ट्रेक

>रस्त्यावर चालताना पायांचा होणारा पचाक-पचाक आवाज नकोसा झाला, पाऊस म्हणजे चिखल, रिपरिप, चिकचिकाट असं वाटायला लागलं, पावसाचाच त्रास व्हायला लागला की, खुशाल समजावं आपली सिस्टिम रिस्टार्ट करण्याची वेळ आली आहे ! जे नकोसं वाटतंय त्याचीच मात्रा ‘रिफ्रेश’ होण्यासाठी कामी येणार आहे..
पाऊस येत नाही तोवर तगमग होते आणि आला की, चार दोन दिवसांतच त्याचा त्रास वाटायला लागतो, घर, ऑफिस, शाळा, कॉलेज या सार्‍यामागे धावताना पाऊस वाट अडवून धरतो असंच वाटतं. पण या ‘रुटीन’मधून बाहेर पडायचं ठरवलं की, तोच पाऊस भन्नाट होतो. रोजच्या व्यापात जे हात, पावसाचे काही थेंब आले तरी खिडकी बंद करण्यासाठी सरसावतात पण बाहेर पडलं की हाताच्या ओंजळीत पाऊसधारा घट्ट पकडून ठेवाव्याशा वाटतात. एरवी चिखलातून रस्ता ओलांडतानाही केवढा त्रास, पण तोच चिखल शेतशिवारात, रानावनात तुडवायला मिळणार म्हणून मन उतावीळ व्हायला लागलं की, ही सारी आपल्याला येणार्‍या ट्रेकच्या हाकांची लक्षणं आहेत. 
रुटीन माहोलपासून दूर नेणार्‍या किड्याची मग आपल्यातच वळवळ सुरू होते. मनाच्या गाडीचा एक्सलेटर वेग घेतो आणि मन धावत सुटतं पावसात चिंब भिजण्यासाठी, डोंगरदर्‍यात, एखाद्या ट्रेकच्या दिशेनं..
बेत ठरतात. निरोप पोहचतात आणि आकाराला येते जवळपासच्या एखाद्या डोंगरकड्यावर किंवा धबाबा कोसळणार्‍या धबधब्याच्या सानिध्यात जाण्याची मोहीम.
निसर्गाचं पावसाळी रूप याची देही याची डोळा पाहण्यासारखं सुख नाही. हे सुख मिळवायचं, पावसाची जादुगरी अनुभवायची तर आपल्या आसपासच्या पर्वतरांगांनी धबधब्याकडे जायला हवं.  सबकुछ छोडछाडके निघायचं आणि मनसोक्त डुबायचं, भिजायचं, शेताच्या बांधावरून चालायचं,  झुळूझुळू वाहणार्‍या झर्‍यांचे स्वर कानात साठवायचे, डोंगरांचा हिरवा साज मनभरून बघायचा, या हिरव्या साजातून खळखळून वाहणार्‍या पांढर्‍या शुभ्र प्रपातांना भेट द्यायची, धबाबा कोसळणार्‍या जलधारांना हॅलोऽऽ म्हणायचं, जमलंच तर त्यांना शेकहॅण्ड करायचा,  त्यालाच तर ट्रेक म्हणतात.
पावसाळ्यात या डोंगरांचे, गडकिल्ल्यांचे माथे ढगांच्या मुकुटानं सजतात, त्या ढगातूनच वाट काढत त्यांची सैर करण्यासारखी दुसरी मजा नाही. त्या वाटेवरच मग डोंगरांवरच्या झर्‍यांचे मंजुळ स्वर कानात साठवायचे, त्याचे ताजे जल प्राशन करायचे,  हिरव्या कोवळ्या गवताला स्पर्श करायचा, त्यावर साठणार्‍या मोत्यांची घसरगुंडी एकटक बघायची, हिरव्यांच्या विविध छटा वार्‍यावर कशा डोलतात, तो डौल पहायचा. त्यालाच तर ट्रेक म्हणतात.डोंगरांवरून धावतपळत निघणारे सर्व लहान मोठे प्रवाह एकत्र कुठं भेटतात, एखाद्या तळ्यात की नदीत, की घेतात भली उडी एखाद्या प्रचंड मोठय़ा कड्यावरून, याचा अंदाज घ्यायचा. अशाच एखादा पावसाळा सरल्यावर इथल्या गड-कोटांवर कशा झुंजी झडल्या असतील, कसे बेत आखले गेले असतील,  आपल्या पूर्वजांनी कोणत्या परिस्थितीत परकीय आक्रमकांना तलवारीचं पाणी पाजलं याची कल्पना करून पहायची, गडाच्या देवतेचं पूजन करायचं. 
यालाच तर ट्रेक म्हणतात.
आता या अशा अनेक कारणांपैकी प्रत्येकाचं फेवरिट कारण कदाचित वेगळं असेल पण कारण काही का असेना, पावसाळी ट्रेक तो बनता है. 
मात्र ट्रेकला निघताना आणि ट्रेक करताना काही गोष्टी आपल्याला माहिती असलेल्या बर्‍या, नाहीतर सुखद वाटावळणांवरचं ट्रेक अनेकदा भयाण दुर्दैवी वाटेवर घेऊन जातात. यात चूक ट्रेक करणार्‍याची असते, त्यामुळेच जरा शिकून घ्यायला हवं, निसर्गाचे नियम, त्याच्या अगदी जवळ जाताना.
 
ट्रेकला नक्की कुठं जावं?
 
ट्रेक कुठं काढावा किंवा ट्रेकला कुठं जावं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्याचं सरळ सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला झेपेल असं ठिकाण निवडावं. कोकण असो की देश, सह्याद्री असो की, सातपुडा, विंध्याचल तुम्ही जवळचं निसर्गरम्य ठिकाण शोधून बेत पक्का करावा.
गडांवरच्या पावसाळी ट्रेकचा एक फायदा म्हणजे प्रचलित वाटा असल्यामुळे त्याठिकाणी जाणं सोपं ठरतं. गावातून एखादा वाटाड्याही सोबत नेणं सोयीचं ठरतं, अर्थात गडांच्या पायथ्याला शेतीच्या कामांची लगबग सुरू असेल तर सोबत गडावर येणारी मंडळी सहजासहजी भेटत नाहीत, अशावेळेला माहीतगार लोकांकडून वाटाड्यांशी अगोदरच संपर्क साधलेला बरा.
त्यात ट्रेकला जाणारे अनेक ग्रुप असतात त्यांच्यापैकी कुणाकडून माहिती घेणं, त्यांच्यासोबत जाणं हे केव्हाही चांगलंच.
आपल्या नेहमीच्या लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या आसपासच्या ठिकाणांचा शोध घेतला तर काहीतरी नवीन ठिकाण हाती लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या पावसाळ्यात ते शोधा.
ज्यांना साहसी मोहीम करायची आहे, अशांनी मात्र जवळपासच्या एखाद्या किल्ल्यावरच जाऊन यावं.
 
डेंजर? तिकडे जाऊ नका.
 
काही गडांवर पावसाळ्यात जाणं धोकादायकच असतं. पावसाळ्यात अशा गडांवर जाताना अपघात होण्याची शक्यता असते. अशा अपघातांवर कुणाचंही नियंत्रण नसतं, तेव्हा त्यांची नीट माहिती करून घ्यावी. धोकादायक गडांवर भर पावसात जाऊ नये. जसे भांडार दुर्ग, हरिहर गड (नाशिक), हरिश्‍चंद्र गड (नगर), कोकणदिवा (पुणे), चंदेरी (ठाणे), इर्शाळ गड, ढाकचा बहिरी, लिंगाणा, कलावंतिण दुर्ग (रायगड). 
या ठिकाणी ऐन पावसाळ्यात जाऊ नयेत. यासारखी धोकादायक ठिकाणं एकट्या सह्याद्रीत भरपूर आहेत, तेव्हा आपण जात असलेल्या ठिकाणचे धोके ओळखूनच बेत ठरवावे. पाऊस कमी झाल्यावर या गडांवर जाता येऊच शकतं.

Web Title: Trek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.