मन की बात
By Admin | Updated: June 28, 2016 19:07 IST2016-06-28T19:03:25+5:302016-06-28T19:07:37+5:30
ती एकेक अन्नाचा कण गोळा करुन घरी नेते. कधी साखरेचा कण, कधी तांदुळाचा. एक माकड तिला रोज पाहत असतं, शेवटी एक दिवस ते तिला विचारतं की

मन की बात
एक मुंगी.
इवलीशी.
ती एकेक अन्नाचा कण गोळा करुन घरी नेते. कधी साखरेचा कण, कधी तांदुळाचा. एक माकड तिला रोज पाहत असतं, शेवटी एक दिवस ते तिला विचारतं की, तुला कंटाळा नाही का येत, रोज एकेक कण नेतेस? हेलपाटे मारतेस?
अशानं किती जमणार? आणि कसा तुझा पावसाळा निभावणार? आपली इतकी कमी शक्ती, आपलं कसं होणार अशी भीती नाही का वाटत तुला?
मुंगी हसली, म्हणाली, ‘ अरे माझी शक्ती कमी आहे हे मला मान्य. पण माझी जिद्द कमी नाही. मी माझ्यापोटापुरतं कणकण करत जमवते. माझी मी स्वयंनिर्भर आहे. मला कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत. माझ्या कष्टानं माझ्या पाठीचा कणा वाकला तर चालेल, पण कुणाच्या उपकारानं वाकत नाही हे काय कमी आहे?’
माकड म्हणालं, ‘ जग किती बदललं, पिढ्यांपिढ्या तू या जुन्याच गोष्टी काय सांगतेस?’
मुंगी म्हणाली, ‘ जग बदललं, पण मी का बदलू? कष्टांची किंमत ज्या जगात नाही, आपल्या बळावर, नीतीमत्तेनं जगणं जे जग मानत नाही, त्या जगाचा मी भाग नाही. मी मुंगी आहे, मला मुंगीच राहू दे, कारण मुंग्या असं वागतात म्हणून कुणी मदारी त्यांना आपल्या तालावर नाचवू शकत नाही हे लक्षात ठेव!’
-ऊर्जा