इतके देखणे रंग आहेत जगण्यात, मग विखाराचा रंग का भरलाय सध्या सगळीकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 07:30 IST2020-03-12T07:30:00+5:302020-03-12T07:30:02+5:30
सगळ्या गोष्टींकडे, घटनांकडे, का माणसांकडे संशयाने बघितलं जातंय. असं ठोस काळं-पांढरं काहीच, कधीच नसतं. त्यासोबत करडय़ा रंगाच्या अनेक छटा असतात हे का विसरतोय आपण? सगळ्या रंगांना सोबत घेऊन चालणारा संयमाचा शुभ्र रंग आपल्या जगण्यात आपण उतरवायचा का पुन्हा या रंगोत्सवात?

इतके देखणे रंग आहेत जगण्यात, मग विखाराचा रंग का भरलाय सध्या सगळीकडे?
- स्मिता पाटील
दोस्त,
तुमसा कोई प्यारा, कोई रंगीन नही है,
क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नही है!
तू खूप हवाहवासा आहेस.
तुझ्यावर प्रेम करणं हे अत्यंत स्वाभाविक आहे.
मी जेव्हा तुझा विचार करते ना, तेव्हा तुझी कितीतरी वेगवेगळी रूपं डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागतात!
हातावर एखादं सुंदर फुलपाखरू अलगद येऊन बसावं आणि ते उडून गेल्यावर त्याच्या पंखांचे सुरेख रंग तळहातावर रेखले जावेत, तसं तुझं आयुष्यात येणं!
कळण्या- नकळण्याच्या वयाच्या सीमारेषेवर तुझा स्पर्श जगण्याला होतो आणि मनाच्या गाभार्यात अनेक भावना दरवळायला लागतात.
तुझ्या येण्यानं जगणं फुलायला लागतं.
एक अनामिक हुरहूर जाणवायला लागते.
स्वप्नांचं गाव खुणावायला लागतं.
हर तरफ बस एक रंगीनसा समा छा जाता है!
तुझ्या रस्त्यावरचं वळण धोक्याचं असलं तरी ते मोहक आहे.
किती रंग घेऊन येतोस तू प्रत्येकासाठी!
त्या रंगीन टप्प्याचं तर नाव आहे तारुण्य.
तारु ण्य!
तू आहेस विलक्षण लोभस!
तुझं अस्तित्व इतकं देखणं कसं असा जेव्हा मी विचार करते ना तेव्हा लक्षात येतं की अनेक रंग घेऊन येणारं तरु णपण असंच लोभस असलं पाहिजे ना!
तुझ्या असण्यानं आयुष्याला अर्थ येतो.
मग जगण्याचे सूर गवसतात, आयुष्य प्रवाही होतं आणि त्याचबरोबर अर्थपूर्ण होतं. यासाठी मनाची कवाडं मात्न उघडी ठेवायला हवी असतात. तू येतोसच एका वळणावर! या वळणावर किती काळ चालत राहायचं हा चॉइस मात्न ज्यानं त्यानं आणि जिनं तिनंही घ्यायचा असतो.
तुझा एक रंग प्रेमाचा.
मनानं अनेक नात्यांचे रंग जपलेले असतात; पण अचानक एक दिवस माणसांच्या गर्दीत कुणीतरी एक माणूस जाम आवडायला लागतं. त्या माणसाला सतत बघावंसं, भेटावंसं वाटायला लागतं. ‘कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना’ अशी अवस्था होते. मनात सतत त्या माणसाचाच विचार. मग त्या माणसाला काय आवडेल, काय आवडणार नाही याचा विचार करून वागणं होतं.
प्रेमाच्या आकाशाचं निळंशार गाणं मनात घुमायला लागतं आणि मन एकदम तरल, हळूवार होतं.
सगळं जगच बदलून जातं, कमालीचं सुंदर वाटायला लागतं.
या प्रेमाच्या गुलाबी रंगाची जादू एकदम भारी असते.
ती नव्यानं जगण्याच्या प्रेमात पडायला लावते.
तू जेव्हा नव्यानं आयुष्यात आला होतास ना तेव्हाची एक आठवण! एका प्रवासात मध्ये एक जंगल पार करून पुढे जायचं होतं.
हळूहळू घरं बाजूला पडत गेली आणि काळोख पसरला. काय वाटलं माहिती नाही; पण मध्येच गाडी थांबवून आम्ही सगळे खाली उतरलो. आजूबाजूला गूढ मिट्ट काळोख होता.
त्या अंधारात एक मस्त शांतता होती. आणि अचानक समोर एक झाड दिसलं, काजव्यांनी लखलखलेलं. काळ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर ते चांदण्यांनी लगडलेलं झाड पाहून दिलको एक सुकूनसा महसूस हुआ!
सोबत माझा सखा होता. मी त्याचा हात घट्ट धरला फक्त. आजही जेव्हा जेव्हा ती आनंदाच्या रंगानं निर्शब्द झालेली रात्न आठवते तेव्हा कितीतरी वेळ कसलाच संवाद नकोसा वाटतो. मौनाची भाषा कधीकधी जास्त बोलकी असते ना!
तुझ्या अनेक रंगांपैकी बेभान होण्याचा एक रंगपण मला खूप महत्त्वाचा वाटतो.
तू जेव्हा आयुष्यात येतोस तेव्हा कुठलीही गोष्ट बेभानपणे करावीशी वाटते. जे काही होईल ते चांगलंच होईल, असा विश्वास मेंदू देत असतो. असं वेडेपण आवश्यकही असतं अनेक सृजनशील निर्मितींसाठी.
जे जे काही नवीन निर्माण झालेलं आहे ते ते बेभान होऊन, झपाटून जाऊन काम केल्यामुळे झालंय.
सृजनाच्या अनेक हिरव्या वाटा तुझ्या बेभानपणामुळे तयार होतात आणि मग या वाटांवर पुढच्या पिढीच्या तरु णपणाला सहज चालता येतं. यापासून प्रेरणा घेऊन नव्यानव्या वाटापण शोधता येतात.
तू आणखी सोबत घेऊन येतोस, अफाट ऊर्जेचा सोनसळी पिवळा रंग.
ही ऊर्जा हाती घेतलेलं काम नेटाने पूर्ण करण्यासाठी मदत करते. कामात आलेल्या अडचणीच्या पहाडांना दूर सारत यशाच्या शिखराकडे हसत हसत हीच तर नेत असते. मग हे पहाड नैसर्गिक अडचणींचे असोत वा माणसांमधल्या कधीमधी उफाळून वर येणार्या सैतानांनी निर्माण केलेले असोत वा संघर्षाचे असोत. तुझ्यासोबत हातात हात घालून आलेली ऊर्जा अशी नितांत सुंदर असते. तिची आश्वासक सोबत नक्कीच भुरळ पाडणारी असते.
तुझं येणं अन् स्वातंत्र्य भावनेच्या रंगाचं मनात ठाम होत जाणं सोबतच होतं.
आपल्या मनासारखं, आपल्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य मला मिळायला पाहिजे असं वाटून मन अनेकदा बंडखोर होतं, पेटून उठतं. कोणत्याही चांगल्या बदलांसाठी हे पेटून उठणं चांगलं असतंच. मात्न स्वातंत्र्यासोबत जबाबदारीपण येतेच सोबत हे विसरायला नकोय.
स्वतर्चं ‘मी’पण जपण्याबरोबरच दुसर्याच्या मताचा आदर असणं, दुसर्याच्या अस्तित्वाचा सन्मान करणं हेही तितकंच आवश्यक आणि महत्त्वाचं आहे.
शांतता आणि सलोख्याचा निळा- पांढरा रंग हा
विखाराच्या- आक्र मकतेच्या लाल- केशरी-हिरव्या रंगांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.
स्री-पुरुष, उच्च-नीच, जात-धर्म, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा या भेदांच्या रंगापेक्षा समतेचा रंग जास्त आश्वासक आणि पुढच्या वाटचालीसाठी प्रेरक आहे. म्हणून तुझ्यासोबत या सकारात्मक भावनांचा रंग आला तर मानवतेला जास्त आवडेल असं वाटतं.
पण, मला खरंच सांग, सध्या सगळीकडे आलेला विखाराचा रंग तुला अस्वस्थ करतोय का रे?
सगळ्या गोष्टींकडे, घटनांकडे, माणसांकडे संशयाने बघितलं जातंय. असं ठोस काळं-पांढरं काहीच, कधीच नसतं.
त्यासोबत करडय़ा रंगाच्या अनेक छटा असतात हे का कुणी लक्षात घेत नाहीये, म्हणून मन बैचेन होतंय.
संयमाचा शुभ्र रंग तुझ्यासोबत सतत असणं सध्याच्या काळात खूपच महत्त्वाचं आहे.
माणसांच्या मनातल्या अनेक सकारात्मक सुरेख रंगांची उधळण आवतीभोवती झाली तर तुझ्या अस्तित्वाला खर्या अर्थाने झळाळी येईल.
तारु ण्या, तू घेऊन येतोस तुझ्यासोबत रंगीबेरंगी इंद्रधनुष्य!
तू असतोस म्हणून अर्थ आहे, सृजन आहे, ऊर्जा आहे, प्रेम आहे.
या आणि इतर अनेक आश्वासक रंगांची सोबत नेहमी कर असं मागणं रंगाच्या महोत्सवानिमिइ मागतेय.
देशील न तुझे रंग आम्हाला?
( स्मिता मुक्त पत्रकार आहे.)