त्यांच्यासाठी जीव तुटणारच ना.
By Admin | Updated: September 10, 2015 21:34 IST2015-09-10T21:34:16+5:302015-09-10T21:34:16+5:30
उद्या पोळा. जिवाभावाच्या बैलजोडय़ांना सजवून धजवून गोड घास खाऊ घालायचा सण. पण उद्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट आहे, मात्र तरीही खेडय़ापाडय़ातले शिकलेसवरलेले तरुण दोस्त आपल्या मुक्या दोस्ताचा सण गोड व्हावा म्हणून झटताहेत. त्या अनोख्या दोस्तीची ही गोष्ट.

त्यांच्यासाठी जीव तुटणारच ना.
पदवी म्हणजे नोकरीची संधी. शिकल्यासवरल्या मुलांना नको वाटतं मातीत हात घालणं. त्यात यंदाचा दुष्काळ. शेती करणं अवघड झालंय. माणसं शहराकडं पळताहेत. आणि जिथं दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही तिथं जनावरांचं काय होणार म्हणत माणसांना आपल्या गुराढोरांच्या चारापाण्याची काळजी लागून राहिली आहे.
त्यात उद्या पोळा !
दरवर्षी किती आनंद असतो या सणाला. बैलांचे पाय धुवायला का होईना पण पाऊस येतो असा गावखेडय़ात अनेकांचा पक्का विश्वास असतो. पण यंदा पोळ्यावरही दुष्काळाचं सावट आहे.
मात्र ही उदासी झटकून याही वातावरणात काही तरुण शेतकरी भर उन्हात, काळ्याकुट्ट ढेकळात बैलजोडीसोबत राबताहेत. त्यांना जनावरांचाही असा काही लळा की मायेच्या माणसागत जीव लावून ते या मुक्या प्राण्यांसोबत जगताहेत.
क:हाड तालुक्यातील काले गावचा राहुल देसाई हा पदवीधर युवक़ राहुलने 2क्क्3 साली कला शाखेची पदवी घेतली. तत्पूर्वी त्याने रत्नागिरीतील एका महाविद्यालयातून डी.एड. पदवीही ग्रहण केलेली; पण बी.ए., डी.एड. असूनही राहुल सध्या शेती करतोय. स्वत:च्या सहा एकर शेतीत तो घाम गाळतोय. राहुल आठ वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे वडिलोपाजिर्त शेतीची जबाबदारी राहुलची आई सुमन व आजोबा गंगाराम यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यांनी कशीबशी ती जबाबदारी पेलली. राहुल शिकूनसवरून मोठा होईल, कुठेतरी त्याला नोकरी मिळेल अशी आईची अपेक्षा होती; मात्र राहुल शेतीमध्ये रमला. सात एकर बागायत शेतीची जबाबदारी त्याने स्वत:वर घेतली. शेतीत मशागत करायची तर त्यासाठी बैलजोडी हवी. त्यामुळे राहुलने 2क्क्9 साली सांगोला व इस्लामपूर येथून एक बैलजोडी घेतली. या बैलजोडीने त्याचे कुटुंब सावरले. बैलांच्या माध्यमातून राहुलने शिवारात कष्टाचं पीक घेतलं. या बैलजोडीबरोबरच कालांतराने त्याने इतर जनावरेही विकत घेतली. त्यामुळे शेतीच्या जोडीला आता तो दुग्धोत्पादनही घेतोय. शेती करत असताना जनावरांची चांगली जपणूक व्हावी यासाठी तो दररोज धडपडतोय. जनावरांना वेळेत चारा, पाणी देताना व स्वच्छता राखताना त्याला वेळेचंही भान राहत नाही.
कष्टाशिवाय मातीला आणि बैलांशिवाय शेतीला पर्याय नाही. राहुल देसाई ‘लोकमत’शी बोलताना सांगत होता, ‘‘शेती सांभाळून आई आणि आजोबांना जनावरं सांभाळणं शक्य नव्हतं; पण ज्यावेळी मी शेतीत लक्ष घातले त्यावेळी मला जनावरांचं महत्त्व समजलं. बैलजोडीमुळे माङया घराला घरपण मिळालं.’’
खराडेतील सोनाली जाधव हीसुद्धा पदवीधर युवती; पण तिनेही शिवार आपलंसं केलंय. ती म्हणते, ‘‘सुशिक्षित आहे म्हणून काय झालं ? शेती आमची आहे. त्या शेतीत राबणारी बैलजोडीही आमची आहे. मग त्या बैलांची काळजी घेणंही आमचं काम आहे. या बैलजोडीची काळजी घेताना मला कमीपणा वाटायची काय गरज?’’ 2क्14 साली सोनालीने कला शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर इतर कोर्स करून तिला नोकरी मिळवता आली असती. मात्र, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीला शेतीतच रस वाटला. आपल्या आई, वडील व भावांसमवेत तीही शेतात राबते. गरज पडलीच तर स्वत: आपली बैलजोडी घेऊन शेतात जाते.
बैलजोडीविषयी सांगताना सोनाली म्हणते, ‘‘बेंदरादिवशी सजवलेली आमच्या सर्जा- राजाची जोडी गावातल्या इतर बैलजोडींपेक्षा उठून दिसते. रंगीबेरंगी झालर, गोंडे, झूल, बाशिंग, घुंगूरपट्टी आणि नखशिखांत सजवलेली ही जोडी गावातून फिरते त्यावेळी माझा मलाच अभिमान वाटतो. त्यांची सजावट मी स्वत: करते. ती करताना माझं मन आनंदाने भरून येतं. त्यावेळचं त्यांचं रूप खरंच वेगळं असतं. आमच्यासाठी ही जनावरंही आमची जिवाभावाचीच दोस्त आहेत !’’
दुष्काळाच्या, चारा छावण्यांच्या बातम्या येतात; पण स्वत: जेवण्याआधी गुरांचं चारापाणी पाहणा:या, त्यांना औषधपाणी करणा:या खेडय़ापाडय़ातल्या या दोस्तांविषयी कुणी बोलत नाही ! यंदा पाऊस कमी झाला, हातात चणचण असेलच; पण तरीही खेडय़ापाडय़ात आपल्या जनावरांसाठी जीव टाकणारी बरीच तरुण मंडळी भेटतात.
त्यांच्या गावात उद्या पोळा फुटेल, तेव्हा पावसाचीही बरसात झाली, तर भरून पावतील सारेच !