थिएटर इन द टाइम ऑफ कोरोना - कोरोनाकाळात ऑनलाइन नाटक , ते कसं जमलं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:57 IST2020-07-16T15:48:28+5:302020-07-16T15:57:05+5:30
संकटं असतानाही काहीतरी चांगलं घडत असतंच की, सांगताहेत ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे

थिएटर इन द टाइम ऑफ कोरोना - कोरोनाकाळात ऑनलाइन नाटक , ते कसं जमलं ?
अतुल पेठे - ख्यातनाम नाटककार
कोरोनाकाळात नेट नाटक करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ती प्रत्यक्षात आणण्यातली आव्हानं काय काय होती?
साथीचे रोग, महामारी, या कुठल्याही काळात येतच असतात. महामारी येते तेव्हा ती नुकसान करते. त्यांच्यामुळे बावरून, बिचकून जाण्याची गरज नाही. मात्र काळजी घेणं आवश्यक असतं. ती प्रत्येकाने घेतली पाहिजे. स्वत:चा जीव वाचवून इतरांचेही जीव जमेल तसे जपणं हेही केलं पाहिजे.
दुसरा मुद्दा हा, की या काळातही आपलं मन आनंदी, सृजनशील, प्रफुल्लित राहण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. कारण मन आजारी पडता कामा नये. मी नाटकवाला असल्याने तालमी करणं, प्रयोग करणं, लोकांशी भेटणं-बोलणं हा आयुष्याचा भाग. काही कला एकल असतात. चित्रकला, गायन वगैरे. नाटक मात्र समूहकला आहे. माझं सगळं सुख-दु:ख लोकांसोबत वाटून घ्यायची गेल्या 55 वर्षांची मला सवय आहे. त्यामुळे बरोबर तीन महिन्यांपूर्वी, 27 मार्चला, मी घरातल्या घरात एकेक मिनिटाची तीन नाटकं शूट करून फेसबुकवर टाकली. खरं तर अगदी पहिल्यांदाच हे केलं. तीन छोटय़ा-छोटय़ा नाटकांचं ते एक सूत्र होतं. आपला एक कॅथर्सिस असतो. म्हणजे आपल्याला बरं वाटतं आपण काही केल्यामुळे. त्याला मी नाव दिलं, थिएटर इन द टाइम ऑफ कोरोना.
हे प्री-रेकॉर्डेड होतं. लाइव्ह नव्हतं. नंतर मात्र चंद्रशेखर फणसळकरांच्या ‘परवा आमचा पोपट वारला’चं आम्ही ऑनलाइन नाटय़ अभिवाचन केलं. नाशिकच्या जयेश आपटे या मित्रनं मला ते करण्यासंबंधी विचारलं. आलोक ताrाणकर यांची ‘वायर्ड एक्सप्रेशन्स’ ही कंपनीपण सोबत होती. ऑनलाइन तिकीट विक्री झाली. 59 तिकिटं गेली. घरातच कॅमेरा लावत मी प्रयोग केला. प्रेक्षक आपापल्या घरातच लॅपटॉपसमोर 3-4 जणं बसले तरी 15क्-17क् लोकांनी तो प्रयोग पाहिला. अगदी विदेशातले लोकही यात होते. त्याआधी काही काळापूर्वी ‘टी फॉर थिएटर’ या छोटय़ाशा नाटक कंपनीसाठी एक रेकॉर्डेड प्रयोग करायचा होता. त्यात मी मुकुंद टांकसाळे यांचा ‘कोरोनातील टाळेबंदी’ हा विनोदी लेख वाचला. त्याला सुपरहिट प्रतिसाद मिळाला. 55 हजार लोकांनी तो पाहिला. आजही तो फेसबुकवर उपलब्ध आहे. सध्या सगळं वातावरण इतकं गंभीर आहे, की मला वाटलं, लोकांना जरा हसवलं पाहिजे. यातून मलाही खूप आनंद मिळाला. लोक भरभरून हसले.
देश-विदेशात कोरोनाकाळात असे प्रयोग खूप झालेत. लंडनच्या ग्लोब थिएटरने त्यांची नाटकं ऑनलाइन दाखवायला सुरुवात केली. त्यांनी एक सिरीजच केली. रशियातल्या बोल्शेविक थिएटरने असे प्रयोग केले. भारतात कोलकत्यातल्या विनय शर्मानी असे प्रयोग केले. मुंबईतल्या अतुल कुमार यांनी केले.
खरं सांगायचं तर हे नाटक नाही होऊ शकत याची आम्हालाही कल्पना आहे. कारण शेवटी नाटकाला जिवंत प्रेक्षक लागतात; पण संकटकाळात काय करायचं, तर त्यातल्या त्यात जे करू शकतो ते अशी माझी थिअरी आहे. दुधाची तहान ताकावर असं हे आहे. याला मी काही फार मोठं कलात्मक मूल्य जोडत नाही. जीवनमूल्य जोडतो. ही मजा आहे.
* यातून पैसे मिळतील असं वाटतं?
- माझं पोट नाटकावर अवलंबून नाही. स्वत:च्या खिशातले पैसे घातून मी नाटक करतो. अनेकदा लोकही मदत करतात. बक्षिसं मिळतात. ते रहाटगाडगं चालू राहातं. आताच्या ऑनलाइन प्रयोगात मात्र पन्नास-साठ तिकिटं विकली गेल्यामुळे करायचा खर्च काहीच नव्हता. जमा झालेली छोटीशी रक्कम तिघांमध्ये वाटून घेतली. शिवाय माङया लेखकाला मला थोडेतरी पैसे देता आले. तसं तर पैसे मिळवणं हा हेतूच नव्हता. लोकांनाही 180 रुपयात तिघा-चौघांना नाटक पाहता आलं.
* या सगळ्या काळाकडे, त्यातल्या मानवी वर्तनाकडे कलावंत म्हणून तुम्ही कसं बघता?
- विधायक सकारात्मक गोष्टी पाहण्याचा माझा पिंड आहे. हरेक संकट म्हणजे मी संधी मानतो. नाटकाच्या एका प्रयोगाला लाइटवाला आला नाही तर मी लाइट्स केले. कधी संगीत देणारा आला नाही तर संगीत दिलं. कसं आहे, दुष्काळ येणं वाईटच असतं; पण त्या दुष्काळानंच तुकाराम महाराजांसारखा महाकवी घडवला. एक ङोन कथा आहे. एका ङोन साधुपुरुषाच्या पाठीमागे वाघ लागतो. पळता-पळता तो दरीत पडतो आणि एका झाडाला लटकतो. वर जावं तर वाघ आणि खाली दरी. त्यात त्याला झाडाला एक लालचुटुक फळ लागलेलं दिसतं. तो म्हणतो, ‘अरे वा, फळ खाऊ या की! क्या बात है!’
आणि मजेत फळ मटकावतो. म्हणजे असं, की संकटं असतानाही काहीतरी चांगलं घडत असतंच की..
काहीवेळा निसर्ग तुमची परीक्षा घेतो. त्याला वेगवेगळी परिस्थितीही कारणीभूत असते. आपण असे आहोत, आपल्याला कधीही मृत्यू येऊ शकतो, या सत्याचं खणखणीत भान या काळात अनेकांना आलं.
एरव्हीच्या आपल्या जगण्यात संयम नावाची गोष्टच संपलीय. यानिमित्ताने तो येईल कदाचित. आपल्या जगण्यात कठोरपणो काही बदल घडवून आणणं हे आता केलंच पाहिजे. माणसात आलेली क्रूरता, श्रेष्ठत्वाची भावना जरा निवळेल या कालखंडात अशी आशा वाटते. आपल्या सगळ्यांचीच भावनिक-शारीरिक ताकद आजमावून पाहणारा हा कालखंड आहे. त्यामुळे मी स्वत:ला सांगतो, मोठं संकट आलं की मोठं काम हाती घ्यायचं. अजून असं वाटतं, की फक्त आपल्यापुरतं बघणं हे वाईट आहे. आपल्या देशातल्या आरोग्यव्यवस्था काय आहेत, सामाजिक वातावरण काय आहे हे यानिमित्ताने दिसलं. हादरवून टाकणा:या वास्तवाच्या दर्शनानंतर मी हे नक्की म्हणू शकतो, की नाटक, कला जगण्यासाठी आवश्यक आहेच; पण सामान्य लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न सोडवले जाणं अधिक महत्त्वाचं बनलंय.
मुलाखत आणि शब्दांकन- शर्मिष्ठा भोसले