टीमवर्क! हार्मोन्सचं टीमवर्क, तंदुरुस्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 08:45 IST2018-02-07T15:48:20+5:302018-02-08T08:45:05+5:30
मानवी शरीरातील सर्व अवयव तसे स्वतंत्र काम करतात. एकमेकांच्या कामात लुडबूड करत नाही; पण असतं ते टीमवर्कच.

टीमवर्क! हार्मोन्सचं टीमवर्क, तंदुरुस्तीचा संदेश
- डॉ. यशपाल गोगटे
मानवी शरीरातील सर्व अवयव तसे स्वतंत्र काम करतात. एकमेकांच्या कामात लुडबूड करत नाही; पण असतं ते टीमवर्कच. परस्परांवर काम अवलंबूनही असतं. टीमनं उत्तम काम करताना एकमेकांशी चांगला संवादही हवा. त्यासाठी माध्यम हवं. ते माध्यमही उत्तम हवं नाहीतर कम्युनिकेशनचे प्रश्न निर्माण होऊन कामावर परिणाम होतो. हे सारं जसं आपण अवतीभोवती पाहतो तेच आपल्या शरीर नावाच्या टीममध्येही चालतं. आणि अवयवांना संदेश पोहोचवण्याचं काम हे रासायनिक घटक करतात. तेच हार्मोन्स. ते मूलभूत संदेश वाहकाचं काम करतात. शरीरात एकोपा कायम ठेवतात.
तो एकोपा कायम ठेवायचा तर हार्मोन्सचं काम चांगलं व्हायला हवं. त्यांची निर्मिती विशिष्ट ग्रंथींमध्ये होते. त्यांना अंर्तस्त्रावी ग्रंथी म्हणतात. शरीराची वाढ, विकास व चयापचय करणं हे त्यांचं काम. त्यासाठी हार्मोन्सची रक्तामध्ये असलेली ठरावीक मात्रा अतिशय महत्त्वाची ठरते. ते बिघडलं की आजार अटळ. शरीराचं विपरीत वर्तनही अटळ. आता हे हार्मोन्स किती आहेत, त्यांची संख्या किती हे मोजावं लागतं. हार्मोन्सचं रक्तामधील प्रमाण विशिष्ट असतं हे जरी खरं असलं तरी आजाराचं निदान केवळ संख्याशास्त्रावर आधारित नसतं. गुणात्मक तपासणीही करावी लागते. म्हणून तज्ज्ञ डॉक्टर अनेकदा रक्त चाचण्या करण्याचा सल्ला देतात. रिपोर्ट आल्यानंतर विशिष्ट हार्मोन्सचं प्रमाण बघून त्याचा आजाराशी असलेला संबंध काय, याचा अभ्यास करतात. मग आजाराचं निदान होतं.
आजकाल होतं काय तरुण वयात केवळ जाहिरातींना भुलून झटकेपट उपचार करून घेण्याचा कल दिसतो. त्यातून काहीजण स्वत:च रक्ताच्या चाचण्याही करुन घेतात. त्यानं घोळ वाढतो. मात्र काही हार्मोनल घोळ आहे अशी शंका असेल तर योग्य डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानं हार्मोन्सची केलेली तपासणी स्वस्त व श्रेयस्कर ठरते.
हार्मोन्सची रक्त चाचणी कधी? कशी?
हार्मोन्सच्या चाचण्या योग्य लॅबमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. संबंधित अवयवातील हार्मोन्सचे प्रमाण मोजण्यासाठी त्यानुसार लाळ, रक्त, किंवा मूत्र याची तपासणी करावी लागते. रक्तामधील वेगवेगळे घटक जसे की सिरम व प्लास्मा यामध्येही मोजमाप होत असते. त्यामुळे रक्त तपासणीच्या आधी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करायला हवे. रक्त तपासणी करताना वेळेचं पालन करणंही महत्त्वाचं असतं. हार्मोन्सचे प्रमाण जैविक घड्याळानुसार सक्रिय असतं. उदाहरणार्थ- पुरु षार्थाचे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन हे रक्तामध्ये सकाळी उठल्यानंतर ७ च्या सुमारास सर्वात सक्रिय असतं. त्यामुळे वेळा पाळणं महत्त्वाचं.