टॅटू
By Admin | Updated: March 12, 2015 14:49 IST2015-03-12T14:49:48+5:302015-03-12T14:49:48+5:30
जिवंत माणसांच्या अंगावर चित्र काढतात कसं?

टॅटू
>विराट कोहली, शिखर धवन यांच्या अंगावरचे एकदम ‘मॅनली’ टॅटू पाहून तुम्हाला असं वाटत असेल ना, यार आपणही एखादा एकदम ‘कूल’ टॅटू बनवून घ्यावा. तसंही टॅटू बनवणं ही सध्याची सगळ्यात लेटेस्ट फॅशन आहे!
एकदम हॉट!!
टॅटूबद्दल असंच जबरदस्त फॅसिनेशन घेऊन, म्हटलं जाऊन पाहू तरी की हे टॅटू स्टुडिओ असतात तरी कसे? जो टॅटू काढतो तो दिसतो कसा? करतो तरी काय?
म्हणून टॅटू केलेल्या दोस्तांना विचारून एक टॅटू स्टुडिओ शोधून काढला. जरा दबकतच आत गेलो.
पाऊल ठेवलं तर, मंद उजळलेले दिवे. बसायला ऐसपैस सोफे. वातावरण तसं कलरफूल, पण बरंचसं डार्क कलरचं!
आतून भांड्यावर नावं टाकताना येतो, तसा आवाज येत होता. काचेतून हळूच डोकावून पाहिलं तर एका माणसाच्या पाठीवर टॅटू काढण्याचा उद्योग सुरू होता.
टॅटू करणार्याच्या असिस्टण्टनं सांगितलं की, बसा. हे डिझाईन्स पहा. जे आवडलं ते सांगा, ते काढता येईल. किंवा तुमच्या डोक्यात एखादं डिझाईन असलं तर सांगा, तसं आम्ही डिझाईन करून देऊ!
हे भलेभले आल्बम. त्यात टॅटू काढून घेणार्यांची चित्रं. हातावरच्या बोटापासून ते दंडावर, पाठीवर, पोटावर, छातीवर नव्हे सर्व देहावर टॅटू काढलेले अनेक फोटो, अनेक डिझाईन्स त्यात होते. स्टुडिओत अवतीभोवतीही टॅटूंचीच चित्रं.
नजर भिरभिरत होतीच, तेवढय़ात आतला तो भांड्यावर नावं टाकतात तसला आवाज संपला.
मुख्य टॅटू आर्टिस्ट भूपेंद्र बाहेर आला.
मग त्यालाच विचारलं की, टॅटू काढताना नक्की तुम्ही त्या व्यक्तीचा विचार कसा करतात!
तो म्हणाला, ‘सिम्पल आहे. त्या व्यक्तीची गरज काय, त्याला तो टॅटू का काढून हवाय हे आम्ही पहिले समजून घेतो. आमच्या प्रोफेशनमधे बोलण्यापेक्षा ‘ऐकणं’ जास्त महत्त्वाचं आहे. शांतपणे ऐकून घ्यायचं की, समोरचा सांगतोय काय. त्याला टॅटू का काढायचाय, त्याचं प्रोफेशन काय, त्याचं फॅसिनेशन काय, हे तसं सवयीनं चटकन लक्षात येतं. काही लोक हे ठरवून आलेले असतात की अमूक जागेवर अमूक टॅटू काढायचा. काहींच्या डोक्यात कन्फ्यूजन असतं. त्यांचं स्वत:चं ठरलेलं काही नसतं, पण त्यांना आवडतही काही नाही. ते काहीतरी डिझाईन सांगतात, मग त्यात काही सजेस्ट करून, त्या डिझाईनप्रमाणं आम्ही टॅटू काढून देतो.
टॅटू त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला सूट झाला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं! त्याप्रमाणे आम्ही काही गोष्टी त्या व्यक्तीला सुचवतो. त्यांना पटलं तर ठीक, कारण आम्ही म्हणतो तेच करा असा आग्रह करता येत नाही!’
हे टॅटू काढणं हे तसं स्किलचं काम. आपण चित्र काढतो तसं नाही. एखादं चित्र काढलं, नाही जमलं तर पुसलं, केली खाडाखोड असं करून चालत नाही. कारण जिवंत माणसाच्या अंगावर चित्र काढलं जातं. अर्थात कम्प्युटरमुळे आता काम तसं सोपं झालंय. योग्य डिझाईनचं प्रिण्ट काढली आणि तिचा ठसा जिथं टॅटू काढायचा त्या जागेवर घेतला जातो. मग ठशाला काही क्रीम लावून टॅटू काढण्याच्या सुईनं टॅटू काढला जातो. ती सुई शाई असलेल्या मशीनला जोडलेली असते. प्रत्येकासाठी डिस्पोजेबल नवीन सुई वापरणं गरजेचं असतं. स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट.
हे सारे नियम पाळून जिथं टॅटू काढले जातात ते स्टुडिओ त्यातल्या त्यात चांगले म्हणायचे!
पंधरा मिनिटं ते काही तास, इतका वेळ टॅटू काढायला लागतो. डिझाईन जितकी छोटी मोठी त्याप्रमाणं टॅटू काढले जातात.
हे टॅटू काढताना पाहणं, ती बारकीशी का होईना वेदना अनुभवणं हे फार मजेशीर काम असतं!
नव्या कूल फॅशनची ही जिवंत कला, म्हणून थोडी वेगळी म्हणायची!
- चिन्मय लेले
भूपेंद्र धकोलिया. टॅटू आर्टिस्ट आहे.
तो म्हणतो, ‘टॅटू काढण्याचे काही स्पेशल कोर्सेस असतात. पण मी ते केलेले नाहीत, कारण माझी आर्थिक परिस्थितीच नव्हती. मात्र मी आणि माझा भाऊ गोव्याला एका टॅटू स्टुडिओत काम करायचो. तिथंच आम्ही हे काम शिकलो. शिकता शिकता करायलाही लागलो आणि आता स्वतंत्रपणे काम करतो आहे. काम अत्यंत जोखमीचं. हाडामासाच्या माणसांच्या अंगावर आपण चित्र काढतोय, ते पुसता-खोडता येणं अवघड. त्यामुळं अत्यंत जोखमीनं, सरावानं आणि मेहनतीनं जीव ओतून हे काम करावं लागतं. टॅटू काढणं हे पूर्णवेळ प्रोफेशन आहे. मात्र त्यासाठी सतत कष्ट, सतत आपलं नॉलेज वाढवत ठेवणं, उत्तम साधनं वापरणं याला काही पर्याय नाही!