भिजल्या प्राजक्ताची शपथ.!

By Admin | Updated: August 1, 2014 11:41 IST2014-08-01T11:41:58+5:302014-08-01T11:41:58+5:30

मी प्रत्येक पावसाळ्यात तुझी वाट पाहतो. जूनच्या काठावर बसून राहतो. मी सगळ्या ढगांना तुझं नाव विचारतो अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठी भांडत राहतो.

Swamiji's sworn oath! | भिजल्या प्राजक्ताची शपथ.!

भिजल्या प्राजक्ताची शपथ.!

मी प्रत्येक पावसाळ्यात तुझी वाट पाहतो. जूनच्या काठावर बसून राहतो. मी सगळ्या ढगांना तुझं नाव विचारतो अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठी भांडत राहतो. मागतो तुझ्या ओल्याचिंब हातांतल्या हिरव्या काकणांचं थोडं हिरवंपण माझ्यासाठी. पण मला दिसतं तुझ्या पूल ओलांडणार्‍या पावलांना मंदिराची ओढ; तुझं नदीच्या पाण्यासारखं खोल मन;  मी काय आणि कसा गाठणार तुला? दुथडी भरून वाहणार्‍या नदीत हेलकावणार्‍या ओंडक्यासारखा मी अन् पहाडावर उगवलेल्या नाजूक पिवळ्या फुलासारखी तू, आणि आता तर आपण एकमेकांचे कोणीच नसतानाही, तो आहेच, जो पूर्वी आपल्यात होता.आपला पाऊस!
कधी तरी दुपारीच काळोखून येते. रानभर नुस्ती कालवाकालव होते अन् जांभळीच्या झाडावर पुन्हा तुझं नाव उमटून जातं. कधी कधी सकाळीच मी नदीकाठच्या करवंदीच्या बेटात; करवंदीचे काटे टोचतात बोटांना अन् रक्तातून तुझी कविता वाहून जाते. एखादा दिवस एवढा उदास का उगवतो याचं उत्तर न विचारताही मिळृून जातं मला! तू मला भर पावसात दिलेल्या प्राजक्ताच्या फुलांची शपथ, मी फुलांचा गंध आणि तुझा सुगंध अजूनही काळजात जपून ठेवला आहे.
आता तुझ्याशिवाय पाऊस. मी डोळे पुसतो माझे अन् खिडकीतून त्याला पाहत राहतो. जुना पाऊस कधी कधी मलाही खूप आठवतो. भर पावसात आपण स्टेशनवर प्यालेला चहा. तुझ्या केसातून ओघळणारं पाणी. आता त्याच आठवणींच्या भरवशावर मी हा पाऊस पाहतोय. तू कुठं का असेना, सुखात आहेस एवढीच गोष्ट पुरेशी आहे मला जगण्यासाठी; पण यापुढचे पावसाळे सोबत जगता येणार नाही हे समजायला वेळ लागतोय मला.
उगाचच कधी कधी खूप पाऊस पडतो आणि उगाचच कधी कधी रडू येते. तू पावसाच्या बरसण्याचं आणि माझ्या रडण्याचं कारण नको विचारूस. तू पावसाच्या वाहण्याला अन् माझ्या रितं होत जाण्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर जमल्यास. तू दुरस्थ झाल्यानंतर आणखी जवळ आलेला पाऊस, आता माझ्यापासून दुरावू नये अशी प्रार्थना मी करतो. तुझ्या बोटांचे ठसे उमटलेल्या छत्रीला तळघरात नेऊन ठेवतो आणि मुसळधार पावसात रस्त्यावर न जाता तळघरालाच तुझी कविता ऐकवतो.!
पुन्हा पुन्हा भेटत राहणारा पाऊस, पुन्हा पुन्हा येणारा तुझ्या आठवांचा पूर; पुन्हा दु:खाच्या होड्या आठवांच्या नदीत, पुन्हा भिजून चिंब होणारे किनारे, मनाच्या काठावरची वाहून जाणारी वाळू, कोसळणारे धीरांचे कडे, पुरांमुळे वाकून गेलेल्या नदीच्या बाभळीसारखे माझे दिवस, पुन्हा जगण्याचा खडक निसरडा, शेवाळलेला! आयुष्याचा तळ उखडलेला, गढुळलेला..! पुन्हा पावसाचं काळजात उतरणं, रक्तात मिसळणं, धमण्यांतून वाहणं. पुन्हा मला गावाबाहेरच्या पुलावर घेऊन जाणं. पुन्हा तुझ्या ओल्या पावलांची मंदिराच्या पायर्‍यांजवळ वाट पाहणं..!
 आपले पावसाळे असं एकमेकांशी अनोळखे होतील असं तुला कधी वाटलं होतं का? पण फक्त एकच सांग, एकदा कोसळायला लागल्यावर न थांबणारा पाऊस, एकदा वाहायला लागल्यावर कुणालाच न जुमानणारी नदी आणि एकदा निरोप दिल्यानंतर एकदाही पाठीमागे वळून न पाहणारी तू..
यापैकी सगळ्यात जास्त काय खरं होतं..!
- अरुण सीताराम तीनगोटे, 
ढाकेफळ, ता. पैठण (औरंगाबाद)

Web Title: Swamiji's sworn oath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.