जगण्याची माती करणारे दोस्त

By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30

तेरी मेरी यारी, उडत गेली दुनियादारी असं म्हणून जिवाला जीव देणारे मित्रच जिवावर उठू शकतात. गुन्हेगारीच्या दलदलीत लोटून आयुष्याची वाताहतही करु शकतात ! तुमचे मित्र तसे नाहीत ना?

Survival Friends | जगण्याची माती करणारे दोस्त

जगण्याची माती करणारे दोस्त

>मित्राच्याच वडिलांकडे खंडणी मागून त्याचा खून मित्र म्हणवणा-या विशीतल्या मुलांनी अलीकडेच केला. ही घटना अपवाद नाही. दोस्तांना गुन्हेगार बनवणा-या अशा अनेक घटना पोलीस दप्तरी सापडतात.
 
 
डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी, नवीन मोबाइल घेण्यासाठी आणि मौजमजा चंगळीसाठी मित्रचीच हत्त्या झाल्याची एक बातमी.
 फक्त ऐश करायची म्हणून वीस लाखांची खंडणी मिळवण्याच्या प्रयत्नात विशीही न गाठलेल्या दोघा जणांनी मोहितेश बाविस्कर या आपल्याच सतरा वर्षीय मित्रची हत्त्या केल्याची ही नाशकातली अगदी अलीकडची घटना.
 मित्रंनीच दगाफटका केला तर त्यापासून स्वत:ला वाचवायचं कसं, असा प्रश्न उपस्थित करणारी ही घटना. पोटात गोळा आणणारी, जिवाचं पाणी पाणी करणारी !
पण ही घटना काही अपवाद नव्हे. मित्रंनीच घात करण्याच्या अशा अनेक कहाण्या आणि त्यात सर्वस्व गमावून बसलेली अनेक तरुण आयुष्येही आहेत. कुसंगतीतून वाटय़ाला येणारे गुन्हेगारीचे दुष्परिणाम किती भयानक असतात हे आजवर घटनांमधून स्पष्ट झालं आहे. 
अगदी पुण्यातील कुप्रसिद्ध जोशी-अभ्यंकर खून खटल्यातील आरोपी जक्कल आणि चौकडीनेही अशाच प्रकारे आपल्या मित्रंशी जीवघेणो खेळ केले होते. 
‘तुम्ही कसे आहात हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला तुमचे मित्र दाखवा’, असं म्हटलं जातं ते उगीच नाही. कारण आपले मित्र ही आपली एकप्रकारची ओळख असते. आणि त्यात ऐन तारुण्यात तर  जिवाभावाचे सवंगडी म्हणजे बहुतेकांचे वीक पॉइंट्स. सच्च्या मैत्रीची बातच और. अशा दोस्तीचे गोडवेही अभिमानाने गायले जातात. अनेकदा ते सार्थही असतात. रक्ताच्या नात्याइतकेच किंबहुना काही वेळा त्याहीपेक्षा अधिक  उत्कटतेने मैत्रीचं नातं जपलं जातं. अडीअडचणीला, संकटकाळात भावनिक आधार द्यायला मित्रच धावून येतात. पण मित्र म्हणवून घेत प्रत्यक्षात मात्र शत्रूसारखं वागणा:यांचेही अनेक प्रकार असतात हे सर्वानाच उमगत नाही. कुठल्या मित्रत कुठले दुगरुण असतात हे ओळखणं कठीण जातं आणि त्याच्यापासून सावध राहणं किती आवश्यक आहे, हे लक्षात येईर्पयत फारच उशीर झालेला असतो. 
मोहितेशबाबतही असंच झालं. 
त्याच्याच मित्रंनी त्याचं अपहरण करून त्याची हत्त्या केली. त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या वडिलांकडे खंडणी मागितली. मोहितेशच्या शोधासाठी ते निर्विकारपणो पोलिसांसोबतही फिरले. पकडले गेल्यानंतरही त्यांच्या चेह:यावर भीतीचा लवलेश नव्हता. कुठून आलं हे निर्ढावलेपण? 
टीव्हीवरील गुन्हेगारी मालिकांमधून सुचलेली कल्पना त्यांनी अशा पद्धतीने वास्तवात उतरवली की सराईत गुन्हेगारही फिके पडावेत. त्यासाठी त्यांनी थंडपणो आपल्याच निष्पाप मित्रचा बळी घेतला. भौतिक सुखाच्या हव्यासापायी अगदी पोरसवदा मुलंही कुठल्या थराला जाऊ शकतात, हे या घटनेनं दाखवून दिलंय. कुसंगतीचे परिणाम असे दाहक असतात.
वास्तविक किशोरावस्थेत मैत्रीची नशा अधिक गडद असते. दोस्ती, यारी हेच डोक्यात असतं. एकमेकांसाठी काहीही करायची तयारी असते. पण या दोस्तीला विधायक वळण असेल तोवर ठीक. जर दोस्तच गुन्हेगारी मानसिकतेचा असेल तर त्याच्यासोबत निरपराध मैतराची फरफट ही ठरलेलीच. अशी दोस्ती संकटांना आमंत्रण देतेच.
अनेक गुन्हेगारी प्रकरणांत हे ठळकपणो वारंवार दिसतं की, गुन्हेगारी वृत्तीचे मित्र आपल्यासोबत सरळमार्गी मित्रलाही गुन्हेगारीच्या खाते:यात ओढतात. दुराचारी मित्रची संगत बाधतेच. निव्र्यसनी मुलाला त्याचे मित्रच बळेबळे मद्याचे घुटके घ्यायला भाग पाडतात. त्यातलाच हा प्रकार. ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’ म्हणतात ते उगीच नाही. आपल्या जीवनावर, वर्तणुकीवर, विचार, आचार, व्यवहार या सगळ्यांवर संगतीचे इष्ट- अनिष्ट परिणाम होत असतात.
मुकेश राय हाही असाच एक तरुण. भाई म्हणून वावरणा:या आपल्या मित्रचे त्याला फारच अप्रूप. एकदा त्या मित्रचा उधारीवर दिलेल्या रकमेवरून कुणाशी तरी वाद झाला. त्याला जाब विचारून वसुली करण्यासाठी भाई मुकेशलाही सोबत घेऊन गेला. तेथे वादावादी झाली. प्रकरण हातघाईवर गेलं. काही कळायच्या आत भाईने केलेल्या चाकूच्या एकाच वारात कर्जदार गतप्राण झाला. पोलिसांनी चौकशी करून भाईसोबत मुकेश घटनास्थळी होता म्हणून त्यालाही अटक केली. खुनाच्या गुन्ह्यात मुकेश गजाआड झाला. मित्रला साथ देण्यात त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं.
आपले शौक पुरे करण्यासाठी मित्रंच्या नादी लागून आपल्या पित्यालाच लुबाडणारी मुलंही आहेत. असाच एक किस्सा. उधळपट्टीसाठी आपल्या मुलाकडून वारंवार केल्या जाणा:या पैशांच्या मागणीला कंटाळून एका पित्याने मुलाला पैसे देणंच बंद केलं. आता पित्याकडून पैसे उकळायचे कसे, असा प्रश्न मुलाला पडला. अशात त्याचा मित्र नेहमीप्रमाणो मदतीला धावून आला. मुलगा त्या मित्रला घेऊन पित्याकडे गेला. ‘आता मी सुधरायचं ठरवलंय. धंदा सुरू करून मी स्वत:च्या पायावर उभा राहणार आहे. या मित्रसोबत भागीदारीत गारमेंटचा व्यवसाय सुरू करतो’, मुलाने सांगितलं. कधी नव्हे तो मुलगा मार्गावर येतोय म्हणून पिताही आनंदला आणि त्याने भलीमोठी रक्कम भांडवलापोटी मुलाला दिली. ठरल्याप्रमाणो मुलाने मित्रसोबत ती रक्कम बारमध्ये उधळली. आता पुन्हा कसे पैसे उकळायचे, असा प्रश्न त्यांना पडला. दोघांनी कट रचला. काही दिवसांनी पुन्हा त्या मित्रला घेऊन मुलगा पित्याकडे गेला. ‘धंद्यात तोटा झालाय. भागीदार म्हणून काही लाख मित्रला देणं लागतोय. एकदा मला यातून वाचवा’, अशी विनवणी केली. भागीदारानेही रकमेसाठी तगादा लावला. पित्याने याही वेळी भागीदाराला देण्यासाठी मुलाला रक्कम दिली. पित्याची पाठ वळताच मुलाने मित्रसोबत तीही रक्कम वाटून घेतली आणि पुन्हा उधळपट्टी सुरू. 
मित्रंच्या नादी लागून सतरा वर्षाच्या नातवाने दागिन्यांसाठी निर्दयपणो आपल्याच आजीची हत्त्या करण्याचा प्रकार अलीकडेच मुंबईच्या पश्चिम उपनगरात घडला. आपल्याच घरात चोरीपासून खुनार्पयतचे प्रकार टीनएजर्सनी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आपल्या मुलाची संगत कशी आहे, याकडे लक्ष देण्यात पालकही कमी पडत असल्याचं अशा प्रकारातून जाणवतं.
म्हणूनच कितीही जिवाभावाचे मित्र असोत, ते बेकायदा, गुन्हेगारी कामं करत असतील, पैसा उकळत असतील, दादागिरी करत असतील तर वेळीच सावध व्हा! मैत्रीनं जगणं उजळलं पाहिजे. ती मैत्री जर जगण्यालाच काच लावत असेल तर असे मित्र तोडलेले बरे. 
.तेही वेळीच!
 
- रवींद्र राऊळ
 
( लेखक ‘गुन्हे’ विषयातील तज्ज्ञ असून, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे मुख्य वार्ताहर आहेत.)
 
 
ब्लॅकमेलिंगचे बळी
 
गुन्हेगार आपल्याच आजूबाजूला एखाद्या श्वापदासारखे दबा धरून बसलेले असतात. मैत्रीचा आव आणत, मैत्रीच्या नावाखाली जवळीक साधत सावजाची इत्थंभूत माहिती गोळा करणं त्यांना सोपं जातं. अशा मित्रच्या स्वभावातील सूक्ष्म बदल, असाधारणपणा वेळीच लक्षात येणं आवश्यक असतं. ती धोक्याची घंटा असते. ती ऐकू येताच त्या व्यक्तीपासून दूर राहणं सोयीचं असतं. पण दुर्दैवाने ते अनेकांना ओळखू येत नाहीत. कधी भिडस्तपणा आड येतो, तर कधी मित्रतील स्वामित्वाची भावना म्हणजेच पङोसिव्हनेस किंवा परपीडनाची विकृती म्हणजेच सॅडिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर ओळखता येत नाही. मग आपल्या मैत्रीची जाणीव करून देत लहानमोठय़ा मागण्या केल्या जातात. पुढे होणा:या शोषणाचीच ही सुरुवात असते. मात्र दोस्तीच्या नावाखाली मागण्या पूर्ण केल्या की त्यात भर पडत जाते. कधी दोस्तीत उघड केलेल्या आपल्या गुपितांचा आधार घेत ब्लॅकमेल केलं जातं. 
 
गुन्हेगारीचा फ्रेण्डली गंडा
* पोलीस अधिका:यांच्या अनुभवानुसार एकलकोंडय़ा गुन्हेगारांचं प्रमाण बरंच कमी असतं, तर वाईट संगतीने गुन्हेगारीकडे झुकणा:या गुन्हेगारांचं प्रमाण भरमसाठ आहे. कुणा ना कुणा मित्रचा गंडा बांधून गुन्हेगारीचे धडे गिरवणारे अधिक आहेत. कधी हे साथीदार शाळा-कॉलेजात भेटतात, कधी नाक्यावर, कट्टय़ावर, तर कधी थेट तुरुंगातच गुन्हेगारीची दीक्षा देतात. 
* गुन्हेगार म्हणून कुणीच जन्माला येत नसतो. आजूबाजूची परिस्थिती गुन्हेगार जन्माला घालते, असं समाज शास्त्रज्ञांचं मत. अगदी यालाच अनुसरून वाहनचोरी, दरोडे, लूटमार, अफरातफर, फसवणूक अशा गुन्ह्यांमधील आरोपी सुरुवातीला आपल्या तथाकथित मित्रंच्या नादी लागूनच या गुन्ह्यांकडे वळतात, असा पोलिसांचा अनुभव. गँगवारमध्ये उतरलेले तरुण कुणा ना कुणा दोस्ताचा हात धरूनच त्यात उतरलेले असतात. रफटफ वागणं, हिरव्या नोटा, बेपर्वाईने जगणं याचं आकर्षण असतं. तशा पद्धतीने जगणा:या मित्रंसोबत त्याची ङिांग अधिकच चढत जाते. घरातून झालेले संस्कारही त्यापुढे ठिसूळ ठरतात.
*  ‘तेरी मेरी यारी’ म्हणत कॉलेजांमध्ये एकमेकांसाठी जमके हाणामा:याही केल्या जातात. टाळकी फुटतात. चुकीच्या कृत्यांनाही समरसून साथ दिली जाते. त्यातून काही अघटित घडलं की पुढे होणारी फरफट काही केल्या टळत नाही. 
* गुन्हेगार एकटय़ाने गुन्हा करण्याऐवजी आपल्याला साथीदार सापडतात का, या शोधात असतो. सर्वच बाबतीत ते त्याला सोयीचं असतं. मैत्रीच्या गोंडस नावाखाली अशा साथीदारांची जमवाजमव केली जाते. संघटित गुन्हेगारीत अशा ‘मित्रं’चाच भरणा असल्याचं पाहावयास मिळतं. एकमेका साह्य करू, अवघे धरू कुपंथ असाच हा मामला.   
 * सिगारेट ओढायला लावणारे, बिअरपासून ड्रग्ज घेण्याचा आग्रह करणारे, मुलींची छेडछाड करण्यास प्रवृत्त करणारे, तसं न केल्यास बावळट, नामर्द म्हणून हिणवणारे खरंच आपले मित्र आहेत का, असा प्रश्न स्वत:लाच पडला तर वेळीच सावध होता येतं.
* मित्रच्या कच्छपी लागून अजाणतेपणी गुन्हेगारीत गोवली गेलेली मुलंही पोलीस ठाण्याच्या कोठडय़ांमध्ये पाहावयास मिळतात. 
 
 
तसल्या दोस्तांच्या नादी लागलाय?
 
 
दोस्ती म्हटलं की
सारं थोर्थोरच आठवतं?
जिवाला जीव देणारी
मैत्री जगणं समृद्ध करते
यात काही शंकाच नाही.
पण काही दोस्त असे नसतात.
ते आपल्याच दोस्तांना
गुन्ह्यांच्या, व्यसनांच्या दलदलीत ढकलतात,
जीवही घ्यायला भाग पाडतात.
मुलींची छेड काढायला
आणि त्यांना ब्लॅकमेल करायलाही शिकवतात.
घरचे अनेकदा सांगतात की,
तुझी संगत चांगली नाही,
ती सोड !
पण जो दोस्त घरच्यांना आवडत नाही,
तोच सगळ्यात जवळचा
असा एक अनेकांचा ठाम समज असतो !
पण आपले दोस्त खरंच असा विश्वास ठेवायला लायक
आहेत का?
हे कधी तुम्ही तपासून पाहिलं आहे का?
की हे दोस्त खरंच तुमचं जगणं नासवताहेत?
त्यांच्या नादी लागून तुम्ही जगण्यालाच फास लावताय?
तपासलंय कधी?
आणि
तुमचा तसा काही अनुभव आहे,
दोस्तांनीच छळल्याचा?
व्यसन करायला लावण्याचा,
बळे बळे दारू पाजण्याचा,
चोरी करायला,
खोटं बोलायला लावण्याचा,
घरून पैसे आण म्हणून आग्रहाचा,
लोकांना शेंडय़ा लावत फसवण्याचा,
आणि गुन्हे करायला लावण्याचाही,
काही नाही होत यार,
कर डेरिंग, मर्द बन
म्हणत भरीस पाडण्याचा?
- असेल तर नक्की लिहा.
आणि सांगा, की या सा-या 
दलदलीतून तुम्ही कसे बाहेर पडलात?
की फसलात आणि हरलातही?
तुमचा अनुभव महत्त्वाचा,
तो इतरांना सावध करू शकेल !
पत्रवर नाव लिहा असा आग्रह नाही.
तेव्हा करायचंच असेल तर करा मन मोकळं.
पत्ता?- नेहमीचाच. शेवटच्या पानावर, तळाशी.
अंतिम मुदत- 15 नोव्हेंबर 2016
पाकिटावर - दोस्तीचे गुन्हेगार असा उल्लेख करायला विसरु नका.

Web Title: Survival Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.