अमृता, अनाथांच्या हक्कांच्या लढाईची जिद्दी कहाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:32 AM2018-04-19T08:32:31+5:302018-04-19T08:32:31+5:30

अनाथ मुलांवर होणाऱ्या अन्यायाचे ती एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. तिच्याच प्रयत्नांमुळे मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षण घोषित केले. कोण ती? काय करतेय? का लढतेय?..

story of a girl who fights for orphans | अमृता, अनाथांच्या हक्कांच्या लढाईची जिद्दी कहाणी...

अमृता, अनाथांच्या हक्कांच्या लढाईची जिद्दी कहाणी...

Next


- मनस्विनी प्रभुणे-नायक

संघर्षाची परिसीमा काय असते, हे अमृता करवंदे या बावीस वर्षीय मुलीकडे बघून लक्षात येतं. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या अमृताचा मी खूप शोध घेत होते. कोण आहे ही मुलगी जिच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षण घोषित करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला? अमृताबद्दल अनेक कारणांनी उत्सुकता जागृत झाली. अनाथपणाच्या बोचऱ्या जखमा सोबत घेऊन जगताना फक्त स्वत:चा विचार न करता आपल्यासारख्याच असंख्य अनाथ मुला-मुलींचा विचार करणारी अमृता निश्चितच सामान्य मुलगी नाही. तिचा आजवरचा प्रवासच तिच्या संघर्षाला व्यक्त करतो. गोव्यातून सुरू झालेला अमृताच्या या शोधाला पुण्यात पूर्णविराम मिळाला.
अमृता केवळ पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला गोव्यातील मातृछाया नावाच्या संस्थेत सोडलं. कॅन्सरशी झुंजणारी आई आयुष्यातले शेवटचे क्षण मोजत होती. कर्जबाजारी झालेल्या अमृताच्या वडिलांनी अमृताच्या छोट्या दोन वर्षांच्या भावाला अमितलादेखील मातृछायामध्ये सोडलं. आई-वडील, घरदार असून दोन्ही भावंडं अनाथ झाली. काहीच उमजण्याचं ते वय नव्हतं. आई-वडिलांचा आठवणारा चेहरादेखील कालांतरानं पुसट झाला. पहिली ते सातवीपर्यंतच शिक्षण मातृछायामध्ये राहून झालं. अभ्यासात हुशार असल्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला पुण्यातील सेवासदन संस्थेत पाठवलं. तिथे तिने दहावीपर्यंतच शिक्षण घेतलं. दहावीनंतर तिला परत मातृछायामध्ये यावं लागलं. स्वतंत्र होण्याची, स्वत:च्या पायावर उभं राहण्याची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्याला नेमकं काय करायचंय याचा तिचाच तिला शोध लागत नव्हता. अनाथ आश्रमातील इतर मुलींप्रमाणे तिला जगायचं नव्हतं. आपल्या छोट्या भावाला अनाथ आश्रमाच्या सुरक्षित जगात सोडून अमृता एकटीच पुण्याला आली. हातात पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा मातृछायामध्ये येणाºया आणि एकप्रकारे अमृताचं पालकत्व घेतलेल्या डॉ. अनिता तिळवे यांनी तिला पुण्याला जायला पैसे दिले.

अमृता कधीही विसरणार नाही असे हे सारे क्षण आहेत. पुण्याला आली तर खरं, पण जाणार कुठे? राहण्याचं एकही ठिकाण नव्हतं. कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश जोवर होत नाही तोवर होस्टेलची सोय होत नाही. त्यामुळे होस्टेल मिळणं अवघड होतं. पुणे रेल्वे स्टेशनला उतरल्यावर अख्खी रात्र तिनं रेल्वे स्टेशनवरच काढली. अशातच डायरीच्या कुठल्याशा कोपºयात शाळेतील एका मैत्रिणीचा फोन नंबर सापडला. फोन करताच मैत्रीण तिला न्यायला आली. पुढचे काही दिवस मैत्रिणीकडे काढले. मैत्रिणीच्या वडिलांची चहाची छोटीशी टपरी होती. तिथे त्यांना मदत करून कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल याचंही ती नियोजन करत होती. एका मित्राच्या ओळखीनं पुण्याजवळ अहमदनगरला एका कॉलेजमध्ये तिचा प्रवेश होत होता. परत एकदा सुरक्षित चौकट मोडून अमृता पुणे सोडून नगरला गेली. शिक्षणासाठी कोणतेही कष्ट करायची तिची तयारी होती. नगरमध्येही तिला अनेक पातळीवर कष्ट करावे लागले. कधी कोणाच्या घरची धुणी-भांडी तिनं केली, तर कधी साफसफाईचं काम केलं. कधी मोबाइल सिमकार्ड विक्र ीचं, तर कधी दुकानात सेल्सगर्लच काम केलं. या सगळ्या कामातून ती कॉलेजच्या फीची सोय करत होती. जेवढे कष्ट तिला करावे लागत होते तेवढीच शिकण्याची जिद्द वाढत होती. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होत असताना अमृताला खºया अर्थाने मार्ग सापडला. तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करायचं ठरवलं. त्यासाठी ती नगरहून नाशिकला गेली. पण पुण्यातच परीक्षेची चांगली तयारी होऊ शकते हे लक्षात आल्यावर वर्षभरातच परत पुण्याला आली. पुण्यात छोटी-मोठी कामं करूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.

अमृताने नुकत्याच पी.एस.आय./ एस.टी.आय./ ए.एस.ओ. या एकत्रित परीक्षा दिल्या. त्यात ओपन महिला (आरक्षित) पी.एस.आय. या परीक्षेचा कट आॅफ ३५ टक्के होता अणि अमृताला ३९ टक्के मिळाले होते. म्हणजे कट आॅफपेक्षा ४ टक्के जास्तच होते; पण अमृताकडे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे तिला नापास म्हणून घोषित करण्यात आलं. नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे अमृताला जनरल गटात टाकण्यात आलं होतं अणि जनरल गटाचा कट आॅफ ४६ टक्के होता. अमृताला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त होता. ज्यांचं वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी आहे त्यांची नॉन क्रीमी लेअर गटात गणना होते. इथे अमृताचं उत्पन्न वर्षाला एक लाखसुद्धा भरत नव्हतं; पण तिच्याकडे याचं कोणतंच प्रमाणपत्र नव्हतं. आई-वडील नसल्यामुळे तिच्याकडे कोणत्याच उत्पन्नाचा दाखला नव्हता. अनाथ आश्रमाकडून तिच्या जन्माबाबतची जी काही माहिती मिळाली तेवढीच तिच्या जवळ होती. परिणामी तिला क्र ीमी लेअर गटात टाकण्यात आलं. एकप्रकारे हा तिच्यावर अन्यायच होता. पुण्याच्या कलेक्टरकडे ती दाद मागायला गेली. पण, कलेक्टर महाशयांनी तिचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं नाही. महिला व बाल कल्याण अधिकाºयांकडे गेली, तिथेही अशीच निराशा हाती लागली.

यावेळी मात्र अमृता एकटी नव्हती. आता तिच्याबरोबर लढणाºया मित्रांचा ग्रुप होता, जे तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शनही करत होते. प्रवीण, राहुल, पूजा आणि कमलनारायण या तिच्या मित्रमंडळींनी अनाथ मुलांना घटनेत कोणकोणते अधिकार दिले आहेत याचा अभ्यास केला. यात त्यांच्या लक्षात आलं की अनाथ मुलांना आरक्षण मिळावं अशी यापूर्वीदेखील अनेकदा मागणी झाली आहे; पण भारतात कोणत्याही राज्यात याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. याच काळात अमृता अणि तिच्या या मित्रमंडळींची महाराष्ट्रच्या मुखमंत्र्यांचे सल्लागार श्रीकांत भारतीय यांची भेट झाली. अमृताच्याबाबत झालेला अन्याय त्यांच्या कानावर घातला. श्रीकांत भारतीय यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अमृताची भेट घडवून आणली. अनाथ मुलं नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र कुठून आणणार? जिथे त्यांना आपल्या आई-वडिलांचा आतापता नसतो तिथे ते जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला कसा आणणार? दोन भिन्न परिस्थितीतील विद्यार्थ्यांची बरोबरी कशी होऊ शकते? त्यांना समान पातळीवर कसं बसवलं जाऊ शकतं? याबाबतही अमृताने देवेंद्र फडणवीस यांना जाणीव करून दिली. या भेटीनंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षण घोषित केलं. हे फक्त आणि फक्त अमृतामुळे शक्य झालं.
अनाथ मुलांवर होणाºया अन्यायाचे अमृता हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. कदाचित अमृता ही एकमेव मुलगी आहे जी स्पर्धा परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आणि तिथून निराश होऊन मागे न फिरता होणाºया अन्यायाला वाचा फोडली. अमृताचे हे सगळे प्रयत्न फक्त तिच्यासाठी नाहीत, तर प्रत्येक अनाथ मुलासाठी आहे. अमृतामुळे आरक्षणाची घोषणा झाली हे समजताच तिला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या आॅफर्स येऊ लागल्या. आमच्या क्लासची विद्यार्थिनी आहेस अशी जाहिरात कर, त्याबदल्यात तुला आम्ही पैसे देतो, तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलतो असे म्हणणारेही काही क्लासचालक निघाले. या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत अमृताने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे. स्पर्धा परीक्षा पास होणं हेच तिचं अंतिम उद्दिष्ट आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: story of a girl who fights for orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.