ऑनलाइन चॅटिंगची चटक लागते तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 07:35 IST2018-12-27T07:30:21+5:302018-12-27T07:35:01+5:30

ओळखदेख नसणा-या कुणाशीही ऑनलाइन सगळं शेअर करणा-या किशोरवयीन जगात डोकावताना दिसणारं एक चित्र

A story of addiction of online chatting | ऑनलाइन चॅटिंगची चटक लागते तेव्हा

ऑनलाइन चॅटिंगची चटक लागते तेव्हा

- मानसी भागवत 

ई-अँडिक्शनची चर्चा आता सर्रास दिसते. त्यातून सुटायला हवं हे अनेकांना कळतं पण ते जमतंच असं नाही. त्यातही किशोरवयीन मुलं, त्यांचं व्हच्यरुअल जग, त्याचं ई-व्यसन हे सारे चिंतेचे विषय आहेतच.

माझ्याकडे एक आई तिच्या नववीतल्या मुलीला घेऊन आली होती.  आल्या आल्या तिनं सांगायला सुरु वात केली, ही माझी मुलगी मनस्वी हल्ली फोनशिवाय काही दिसतच नाही तिला, सतत फोन फोन आणि नुसता फोन. आमच्या बरोबर तिला कुठे यायचं नसतंच मुळी! मला मान्यही आहे तीचं वयच असं आहे; पण मित्र– -मैत्रिणींबरोबर फिर, मजा कर तर तेपण  नाही. अभ्यासात ती फारशी हुशार नाही, पण पूर्वी डान्स छान करायची म्हणून डान्स क्लासला तरी जायची, हल्ली तेही जात नाही. आम्ही ओरडतो म्हणून चोरून बाथरूममध्ये अंघोळीच्या वेळी फोन नेते आणि तेथे तासन्तास घालवू शकते, आत फोनवरच असते. अभ्यासाला बसते पण मधे मधे फोनवरच असते. रात्रभर जागत बसते आता या वयात ओरडणार तरी किती? काल पूर्ण रात्र जागी होती मी दोनदा चक्कर टाकली. पहाटे कधीतरी तिला झोप लागली, फोन तसाच चालू होता. मी बघितलं तर एक फेक अकाउण्ट फेसबुकवर काढलं आहे. कितीतरी अनोळखी मित्न होते ज्यांच्याशी तिनं खासगी आयुष्य शेअर केलं होतं. ते बघून मला टेन्शन आलं. काही बरं-वाईट होणार तर नाही? अशी काळजी वाटायला लागली म्हणून लगेच आज तुमच्याकडे घेऊन आले.’ त्या अशा प्रचंड चिडल्या होत्या. 

मी त्यांना विचारलं असं तिच्यावर चिडून तिची सवय सुटणार आहे का? त्या काहीच बोलल्या नाहीत.

मग मी मनस्वीला विचारलं, तुला काय वाटत याबद्दल? तर तिने चिडून आईकडे बघितलं. ती काहीच बोलली नाही; पण तिच्या मनावरचं दडपण आणि  आईबद्दलचा राग अगदीच दिसत होता. मी आईला बाहेर बसायला सांगितलं.

मी तिला विचारलं तुला कोणी समजूनच घेत नाही, सगळे तुझ्या विरोधात आहेत, याचा तुला राग आलाय का? आईनं तुझी तक्रार माझ्याकडे केली हे तुला पटलं नाहीये का?
 ती लगेच काही बोलली नाही फक्त माझ्याकडे बघितलं पण तिच्या नजरेतला राग आता थोडा कमी झाला होता. पाच मिनिटांनी म्हणाली आता तुम्ही मला हेच सांगणार ना फोनला हात लावू नकोस, आईनी तो आधीच जप्त केलाय तर मी हात लावायचा प्रश्नच येत नाही. 

मी तिला सांगितलं, मी असं काहीही म्हणणार नाही. सल्ला देणार नाही, रागवत पण नाही. तुला वाटलं तर बोल माझ्याशी. मग तिला सहज विचारलं, जेव्हा तू चॅटिंग करतेस तेव्हा ती व्यक्ती समोर नसते त्यामुळे कसं बोलू, काय बोलू ती काय म्हणेल असं दडपण येत नाही हो ना? त्यात ती अनोळखी असल्यामुळे ती मला चांगलं किंवा वाईट म्हणेल याचंही टेन्शन नसतं. एकदा गप्पा मारायला लागल्यावर रमून जायला होतं. आणि ते किती थ्रिलिंग आहे ना असं कोणाशीतरी बोलणं? ती चटकन म्हणाली- हो मजा येते एकदम. 

आता ती मला तिच्या ऑनलाइन मित्र -मैत्रिणींबद्दल सांगू लागली. त्याबद्दल तिला खूप सांगायचं होतं. त्यावर तिची मैत्रिणींशी होणारी चर्चा, सगळं सगळं सांगू लागली. बरंचंस सांगून झाल्यावर एका मित्नाबद्दल ती सांगत होती तो कसं तिला समजून घेतो. काय खाल्लं-प्यालं यापासून कुठे जाणार, येणार आहे ती आणि तो सगळ एकमेकांना सांगतात असं सांगत होती. सध्या तो तिला म्हणतोय आपण एकदा भेटूया असं.

 मग शांत झाली. मी तिला विचारलं मग काय वाटतं काय करावं? खूप भीती वाटतीय. मी काहीच बोलले नाही. तिनं विचारलं यात फार रिस्क आहे ना? मी विचारलं तुला काय वाटतं? पटकन म्हणाली रिस्क तर आहेच; पण भेटावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय. बघ, पूर्ण विचार करून भेटायचं की नाही, हा निर्णय घे हे माझं मत तिनं मान्य केलं.
 मग आम्ही हे ऑनलाइन चॅटिंग का आवडतंय ते लिहून काढलं, तिनंच लिहून काढलं. मी फक्त व्हीटनेस म्हणून होते. मग तिच्या लक्षात आलं. तिला समजून घेणारं तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारं तिला कोणीतरी हवंय. मग तिच्या ख-या मित्र मैत्रिणींबद्दल चर्चा केली तर लक्षात आलं त्याही अशा अनोळखी लोकांशी ऑनलाइन बोलतात. मग हीच अकाउण्ट नसेल तर तिला त्यांच्यामध्ये अनफिट वाटेल असंही तिला वाटतं होतं. पण आता तिला पटलं अशा व्हच्यरुअल नात्यांमध्ये खूप रिस्क असू शकते. यापासून लांब राहायला पाहिजे. मग ते वेळापत्नक कसं करता येईल, चॅटिंगमध्ये न रमता आपल्या छंदामध्ये कसं रमता येईल, यासगळ्यांवर चर्चा केली. 

आता हे कृतीत आणताना आधार आणि प्रेरणेची तिला गरज होती. जी वेळोवेळी तिला देण्यात आली. पण तिची मानसिक अवस्था, एकटेपणा समजणंही महत्त्वाचं होतं. सर्वात महत्त्वाचं होतं ही सवय सोडायचा निर्णय तिनं स्वत: घेणं. त्यामुळेच पुढचं सगळं सोप्प होत गेलं.
स्वत:चं कुठलंही व्यसन किंवा सवय सोडण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला की आजूबाजूला मदत करणारे अनेकजण भेटतात. आपली तयारी हवी. 



(लेखिका मानसशास्त्रीय समुपदेशक आहेत. )

Web Title: A story of addiction of online chatting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.