स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट - खेळाडूंना कायम ‘मैदानावर’ ठेवणारा जवळचा मित्र

By Admin | Updated: May 30, 2014 10:48 IST2014-05-30T10:48:05+5:302014-05-30T10:48:05+5:30

गेम’ सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या जगावर राज्य कसं आणि का केलं, राहुल द्रविडला आजही शाही क्रिकेटचा बादशहा का म्हटलं जातं, विश्‍वनाथन आनंदनं सलगपणे इतकी वर्षं बुद्धिबळाच्या ६४ घरांवर राज्य कसं केलं, सर्वसामान्य घरातल्या सुमा शिरूर आणि अंजली वेदपाठकसारख्या मुलींनी जगावर ‘निशाणा’ कसा साधला?..

Sports Psychologist - The closest friend to always keep players on the 'field' | स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट - खेळाडूंना कायम ‘मैदानावर’ ठेवणारा जवळचा मित्र

स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट - खेळाडूंना कायम ‘मैदानावर’ ठेवणारा जवळचा मित्र

प्रतिस्पर्ध्यांना आधी मनातल्या मनात आणि नंतर मैदानावर चारी मुंड्या चीत करणारा नवा ‘माईंड गेम’
 
सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या जगावर राज्य कसं आणि का केलं, राहुल द्रविडला आजही शाही क्रिकेटचा बादशहा का म्हटलं जातं, विश्‍वनाथन आनंदनं सलगपणे इतकी वर्षं बुद्धिबळाच्या ६४ घरांवर राज्य कसं केलं, सर्वसामान्य घरातल्या सुमा शिरूर आणि अंजली वेदपाठकसारख्या मुलींनी जगावर ‘निशाणा’ कसा साधला?..
या सार्‍याच मंडळींकडे त्या त्या खेळातलं सर्वोच्च नैपुन्य होतं म्हणून? इतरांपेक्षा त्यांनी जास्त सराव केला म्हणून? त्यांचा स्टॅमिना आणि स्ट्रॅटेजी इतरांपेक्षा उत्तम होती म्हणून? त्यांना इतरांपेक्षा चांगले कोच मिळाले किंवा त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाल्या म्हणून?..
यातल्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या किंवा नंतरच्या काळात त्यांनी मिळवल्या किंवा काही गोष्टी तर त्यांना अखेरपर्यंत मिळाल्याच नाहीत. 
उलट परिस्थितीशी झुंजत प्रत्येक वेळी त्यांना संघर्षच करावा लागला.
तरीही आकाशाला हात लावण्याइतकी कामगिरी त्यांनी कशी केली?
याचं एकमेव उत्तर म्हणजे आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च उंची गाठण्यासाठीची त्यांची मेहनत आणि ध्येयवाद तर पराकोटीचा होताच, पण प्रत्यक्ष मैदानात खेळण्याआधी जगभरातल्या आपल्या सर्वच प्रतिस्पध्र्यांना त्यांनी आधी मनातल्या मनात चारी मुंड्या चीत केलं होतं.
कोणताही खेळ असो, प्रत्यक्ष मैदानात खेळण्याआधी तो मनातल्या मनात खेळला गेलेला असतो. मनातल्या या खेळात जर त्यांनी प्रतिस्पध्र्यावर मात केलेली असेल, त्यांना हरवण्याचा आत्मविश्‍वास त्यांनी प्राप्त केलेला असेल, तर प्रत्यक्ष मैदानातही तेच चित्र दिसण्याची शक्यता मोठी असते.  आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असताना तर ही गोष्ट खूपच महत्त्वाची असते. या पातळीवर खेळत असताना प्रत्येक जणच उत्कृष्ट खेळाडू असतो. प्रत्येकाचीच मेहनत आणि सराव टोकाचा असतो. पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आणि अगदी दहाव्या-पंधराव्या-विसाव्या क्रमांकाचा खेळाडू यांच्यातही फारसं अंतर नसतंच. हे सारे खेळाडू जवळजवळ सारख्याच दर्जाचे असतात. त्यांच्यात फरक असतो तो फक्त एवढाच, की जागतिक पातळीवर आणि सवोच्च स्थानावर टिकून राहण्यासाठीची त्यांची मानसिक मेहनत अधिक तयारीची असते. त्याबळावरच ते तिथे टिकून राहतात. तरीही जगातला कोणताही खेळाडू घेतला तरी त्याच्या आयुष्यात बॅड पॅच येतातच, नकोशा वाटणार्‍या एका अंधार्‍या दरीतून कधीतरी त्यांनाही प्रवास करावा लागतोच, त्यांचाही आत्मविश्‍वास कधी कधी ढासळतो, कामगिरी खालावते, जगातला सर्वोच्च समजला जाणारा हा खेळाडू इतक्या बालीश चुका कशा काय करू शकतो असा प्रश्नही काही वेळा निर्माण होतो, पण केवळ मनोबलावर या बॅड पॅचमधूनही ते बाहेर येतात आणि जागतिक पातळीवर पुन्हा पूर्वीसारखेच तळपायला लागतात. ज्यांना हे जमत नाही, ते एखादवेळी त्या सर्वोच्च स्थानापर्यंत जातातही, पण तिथे टिकून राहणं त्यांना जमत नाही. एका रात्रीतून मिळालेलं हे तख्त त्यांच्यासाठीही मग केवळ स्वप्नच ठरतं.
आपल्याला ‘अजिंक्य’ ठरवणारा हा ‘माईंड गेम’ दुदैवानं आजही आपल्याकडे अनेकांना माहीत नाही. ना खेळाडूंना, ना कोचना, ना पालकांना. सरकारी पातळीवर तर बर्‍याचदा नन्नाचा पाढा. त्यामुळे कठोर सराव, कोच आणि सोयी-सुविधा याच गोष्टींवर केवळ भर दिला जातो.  अलीकडच्या काळात ‘माईंड गेम’चं हे महत्त्व आपल्यालाही कळायला लागलेलं असलं तरी अजूनही त्याबाबत बरीच उदासीनता आहे. खेळाडूला अखंडपणे मैदानात आणि वेगवेगळ्या स्पर्धांत ‘खेळता’ ठेऊ शकणारे तज्ञ ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट्स’ अजूनही तसे दुर्मिळच आहेत. 
 
संधी कुठे?
या क्षेत्रात दोन महत्त्वाचे पर्याय आहेत. युनिव्हर्सिटी लेव्हलला तुम्हाला सायकॉलॉजी हा विषय विद्यार्थ्यांना शिकवू शकता किंवा वैयक्तिक पातळीवर खेळाडूंना थेट मार्गदर्शन करू शकता. खेळाडूंना थेट मार्गदर्शन करणं हा पर्याय केव्हाही फायदेशीर, पण त्यासंदर्भातलं आपलं शिक्षण झालेलं असणं, ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट’ची डिग्री, मास्टर्स डिग्री आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही स्वत:च जर उत्तम खेळाडू असाल तर सोने पे सुहागा!
‘स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट म्हणून करिअर करताना प्रत्येक खेळाच्या खेळाडूंसाठी ‘मेंटॉर’ म्हणून काम करता येईल किंवा ज्या खेळांची आपल्याला आवड आहे केवळ त्याच खेळाडूंसाठी म्हणूनही काम करता येईल. याशिवाय टीम स्पोट्स, ग्रुपसाठी किंवा वैयक्तिक खेळालाही प्राधान्य देता येऊ शकेल. ?
 
स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्टचं काम
खेळाडू जरी उत्तम असला तरी प्रत्येक खेळाडूच्या आपापल्या पातळीवर अनेक मानसिक समस्या असतात. त्या समस्या कायम त्याच्या डोक्यात घोळत असतात आणि त्यांनी तो अस्वस्थही असतो. अर्थातच त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. प्रत्येक खेळाडू कायम पहिल्याच क्रमांकावर राहील आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक गेम तो जिंकेलच असं शक्य नसतं. कारण प्रत्येक जण त्याच इराद्यानं खेळत असतो. 
एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर खेळाडूपुढे अनेक दडपणं असततात. ही दडपणं कशी हाताळायची, खालावलेली कामगिरी सुधारून पुन्हा ‘बाऊन्स बॅक’ कसं करायचं, न झेपणारी स्वप्नं आणि अपेक्षांचं गाठोडं बाजूला ठेऊन रिअँलिस्टिक आणि साध्य होऊ शकणारे ‘गोल्स’ स्वत:पुढे कसे ठेवायचे, कॉन्सन्ट्रेशन कसं कायम राखायचं आणि कॉन्फिडन्स कसा नेहमीच हाय ठेवायचा, ध्येयापासून स्वत:ला कसं ढळू द्यायचं नाही, कठोर सरावातून रोज घाम गाळताना कुठल्याही आव्हानासाठी स्वत:ला मानसिकदृष्ट्या कसं तयार ठेवायचं, फार ‘इमोशनल’ न होता, भावनांवर कंट्रोल कसा ठेवायचा, टेन्शन्स आणि चिंता यांना फार जवळ येऊ न देता फोकस नेमका कशावर ठेवायचा, खेळाडूला मोटिव्हेट कसं करायचं आणि त्याचा परफॉर्मन्स वाढता कसा ठेवायचा. यासारख्या अनेक गोष्टींवर स्पोर्ट्स सायकॉलिजिस्टला लक्ष ठेवावं लागतं आणि खेळाडूंकडून तशी कामगिरी करवून घ्यावी लागते. 
 
 
भारतातले करिअर ऑप्शन्स
‘स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट्स’ची संख्या भारतात अक्षरश: हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे, त्यामुळेच या क्षेत्रात शिरकाव करण्यास खूप मोठी संधी आहे. शिवाय विविध खेळांच्या प्रती भारताचा दृष्टिकोनही आता खूपच सकारात्मक होतो आहे, विविध खेळांत भारतीय खेळाडू प्रगती करताना दिसताहेत, स्वत: खेळाडू, पालक, कोचेस, सरकारी अधिकारी यांनाही या क्षेत्राचं महत्त्व समजून चुकलं आहे आणि या क्षेत्राला दिवसेंदिवस सुगीचे दिवस येताहेत. 
या क्षेत्रात करिअर करणार्‍यांना वेगवेगळ्या सरकारी, खासगी संस्थांमध्ये शिकवण्याची संधी आहे. निरनिराळे क्लब, संस्था, स्पोर्ट्स अकॅडेमी यांच्याशी त्यांना जोडून घेता येईल आणि खेळाडूंनाही वैयक्तिक मार्गदर्शन करता येईल. स्पोर्ट्सकडे करिअर म्हणून पाहणार्‍यांची आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्टचं मार्गदर्शन घेणार्‍यांची संख्याही भारतात अत्यंत वेगानं वाढते आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी स्वत:ची कन्सल्टन्सी उघडणं हादेखील अत्यंत चांगला पर्याय सध्या उपलब्ध आहे. 
 
पात्रता आणि कालावधी
स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या संदर्भात आपल्याकडे फॉर्मल कोर्सेस फारसे कुठे उपलब्ध नाहीत, ही गोष्ट खरी असली तरी या क्षेत्रात आपल्याला आपलं करिअर सुरू करता येऊ शकतं.
ज्यांना यात करिअर करायचंय त्यांनी सायकॉलॉजीच्या कुठल्या तरी एका शाखेत पदवी घेतलेली असावी. त्यानंतर परदेशातून त्यांना स्पोर्ट्स सायकॉलॉजीची मास्टर्स डिग्री घेता येऊ शकते. किंवा बारावी झाल्यानंतर थेट परदेशातूनच त्यांना ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजी’ची पदवी घेता येऊ शकते. 

 

Web Title: Sports Psychologist - The closest friend to always keep players on the 'field'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.