सोशल मीडियाचा उपवास करायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 07:00 IST2019-10-17T07:00:00+5:302019-10-17T07:00:07+5:30
नवरात्रात मी उपवास केला. सोशल मीडियाचा. व्हॉट्सअॅप, फेसबुक सगळं बंद आणि चमत्कारच झाला.

सोशल मीडियाचा उपवास करायचा का?
- विकास बांबल
माझ्यासाठी वर्षभरातील कालचा दिवस सर्वात मोठा दिवस होता.
हो कालचाच.
पण विज्ञान तर सांगते की 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.
मग कालचा म्हणजे 6 ऑक्टोबर हा दिवस सर्वात मोठा कसा काय?
त्याचं कारणही तसंच आहे.
काल वर्षातून एखादा उपवास म्हणून अष्टमीच्या निमित्तानं मौनव्रत केलं. त्यासोबत अतिरेक होत असलेल्या गोष्टींचा, जसं की सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, फेसबुक बंद ठेवून उपवास केला.
आधी दिवस सोशल मीडिया, फोनवर बोलण्यात कसा निघून जायचा काही कळत नव्हतं. सतत व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि फोनवर बोलणं.
पण काल मौन असल्यानं कुणाशी बोलणं नाही. फेसबुक नाही, व्हॉट्सअॅप नाही. त्यामुळे वेळ निघता निघत नव्हता. जणू दिवस मोठा असल्याची जाणीव मला होत होती.
वास्तविक पाहता कालचा दिवस सामान्यच होता. अगदी नेहमीप्रमाणे 24 तासांचा; पण मोठा असल्याची जाणीव मला होत होती. फेसबुक, व्हॉट्सअॅप, फोनवर वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि मग नंतर आपण वेळच मिळत नाही म्हणून दोष देत बसतो.
वेळ हा जास्त किंवा कमी नसतोच. तो जेवढा आहे तेवढाच असतो. मी जन्माला यायच्या अगोदरपासून तो तेवढाच होता आणि पुढेही राहणार.
आपलं वेळेचं नियोजन कुठेतरी चुकतं किंवा कमी पडतं हे त्यामागचं खरं कारण आहे.
पेपर सोडवून आलेल्या परीक्षार्थीला जर आपण विचारले, तर तो सांगतो की वेळ थोडा कमी पडला. पण वेळ हा आधीपासून पूर्वनिर्धारित 3 तासांचा असतो. ज्याची पूर्वकल्पना परिक्षार्थीला आधीच दिलेली असते. म्हणजे वेळ कमी पडला नाही, तर परीक्षार्थीचं नियोजन कमी पडलं.
मीसुद्धा नेहमी वेळ मिळत नाही म्हणून आणलेली पुस्तकं वाचली नाहीत; पण काल तर वेळच वेळ होता. नेहमी वेळ मिळत नाही म्हणून सांगणारा मी, काल वेळ कुठे घालवायचा यावर विचार करत होतो.
मग काय दोन महिन्यांपासून आणलेली पुस्तकं वाचून घेतली, सायकलिंग केली, फोटोग्राफी केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्रामगीतेतून सांगतात,
कमावणे नव्हे श्रीमंती
बचत करणे हीच संपत्ती.
आपण खूप पैसा कमावत असलो तरी श्रीमंत होत नाही जोवर आपण बचत वाढवत नाही. संपत्ती त्यांचीच तयार होते जो बचत करतो. जशी पैशांची बचत तशीच वेळेची बचत. आणि वेळ खर्ची पाडण्यात सध्या सोशल मीडियाचा मोठा आणि वायफळ वाटा आहे तो आपल्याला कमी करता आला पाहिजे. ज्या गोष्टींचा अतिरेक होत आहे त्यांना नियंत्रित करता आलं पाहिजे.
मी बरेच असे महाभाग पाहिले जे आधी गोष्टी शौक म्हणून करतात, पण सतत केल्याने त्या गोष्टींचा अतिरेक होऊन व्यसनं जडतात.
उपवास म्हणजे मनेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची क्रि या.
आता तर मनुष्य मोबाइल वापरतो की मोबाइल मनुष्याला वापरतो काही कळतच नाही.
सध्या सोशल मीडियाचा अतिरेक वाढत आहे म्हणून हा अतिरेक टाळण्यासाठी, माझा पबजी होऊ नये म्हणून मौनव्रताबरोबर सोशल मीडियाचादेखील उपवास केला.
ज्यामुळे काल वेळच वेळ उपलब्ध झाला आणि ज्याला वेळेची बचत करता आली त्याच्याकरता प्रत्येक दिवस मोठा, पुरेसा ठरतो ही अनुभूतीपण आली.
मी केला तसा प्रयोग जमल्यास करून पाहा.