स्वयम आणि सत्यभामा

By Admin | Updated: June 30, 2016 16:45 IST2016-06-30T16:45:23+5:302016-06-30T16:45:23+5:30

इंजिनिअरिंग करणारी तरुण मुलं? नुस्ती प्रोजेक्टच्या मागे न लागता आणि घोकंपट्टी न करता एका ध्येयानं झपाटतात आणि उपग्रह बनवत थेट अंतराळ भरारी घेतात. हे सारं कसं घडतं? त्याची ही गोष्ट...

Self and truthful | स्वयम आणि सत्यभामा

स्वयम आणि सत्यभामा

थ्री इडियट आठवतोय? त्यातला रॅँचो?
पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रत्यक्ष करून पाहण्यावर विश्वास ठेवणारा आणि एक्सलन्सचा पिछा करा, कामयाबी झक मारके पिछे आएगी असं सांगणारा?
- असेच काही रॅँचो सध्या पुण्यात भेटतील आणि काही चेन्नईत.
इंजिनिअरिंगच करतात तेही.
पण नुस्ते घोकत नाहीत, तर इंजिनिअरिंगच्या पलीकडे जाऊन त्यांनी उपग्रह बनवले आणि इस्त्रोनं त्यांचा दर्जा तपासत ते अवकाशातही सोडले.
स्वयम आणि सत्यभामा.
पुण्याच्या सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला स्वयम आणि सत्यभामा युनिव्हर्सिटी, चेन्नई इथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेला सत्यभामा सॅट हे ते दोन उपग्रह. ते अवकाशात झेपावल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या; पण त्यामागच्या जिद्दीच्या कहाण्या मात्र त्या अंतराळ भरारी इतक्याच थरारक आहेत.
त्या फ्लॅशबॅकची एक झलक या अंकात तर आहेच;
पण सत्यभामा सॅटच्या टीममध्ये काम करणारा दुर्ग प्रसाद म्हणतो तसं हे एक मानवी कष्टाचं आणि मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन पूर्ण होणारं स्वप्न आहे. अंतराळात खऱ्या अर्थानं आपलं काम पोहचतं, त्याचा आनंद लाख मोलाचा आहे.
सत्यभामा सॅट ग्रीन हाऊसचा डाटा उपलब्ध करून देणार आहे, तर स्वयम रेडिओसाठी पॉइण्ट टू पॉइण्ट सिग्नल मेसेजिंग करणार आहे.
ज्या मुलांच्या कष्टानं हे स्वप्न साकार झालं ते तरुण मुलांनी केलेलं काहीतरी प्रायोगिक काम असं नाहीये, तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम आहे. आणि त्या नजरेनंच या मेहनतीकडे आणि दर्जाकडेही पाहायला हवं!
स्वयम आणि सत्यभामा यांची ही भरारी अनेक तरुणांच्या मनात कष्टाची, प्रयोगाची आणि कल्पकतेची बीजं पेरत राहील ही आशा आहेच.

- आॅक्सिजन टीम

 

Web Title: Self and truthful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.