भटकायची 3 सूत्रं
By Admin | Updated: October 15, 2015 17:59 IST2015-10-15T17:59:36+5:302015-10-15T17:59:36+5:30
जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार? एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही. मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?

भटकायची 3 सूत्रं
>
जग पाहण्याची, रुटीन तोडण्याची, प्रवास करायची इच्छा तर आहे, पण कसं जाणार?
एकतर जायचं कसं हे माहिती नाही, त्यात पैसे नाही. ट्रॅव्हल कंपन्या दारात उभं करणार नाही.
मग प्रवास करणार कसा? आणि तो नाहीच केला तर अनुभवाची पोतडी भरणार कशी?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तरुणपणी प्रवास करून मनमुक्त भटकंती नाही केली, तर म्हातारपणी देवदर्शनाच्या तीर्थयात्र करून तरी काय उपयोग?
त्यामुळे नवीन जग, नवीन माणसं, भाषा, संस्कृती याचं शिक्षण घ्यायचं तर हिंमत करून घराबाहेर पडायला हवं.
एकटय़ानं जायची हिंमत नसेल तर दोघातिघांनी मिळून जावं.
पण घ्यावाच हा अनुभव एकदा.
पण कसा? त्यासाठीच ही तीन अगदी सोपी सूत्र.
1) प्रवास करायला पैसे नाही तर हिंमत लागते. थोडं डेअरिंग करावं लागतं.
दोन वेळच्या जेवणापुरते आणि साधं एसटीचं तिकिटं काढता येईल एवढे पैसे हवेत.
फार जग पहायला नाही जाता आलं तरी आपलं शहर, आपल्या जिल्ह्यातली, आसपासची खास गावं तरी पहायला हवीत.
मिळेल ते खायचं, मिळेल तिथे रहायचं. त्यातल्या त्यात काळजी घ्यायची ती आपल्या सुरक्षेची. त्यामुळे मुक्काम करायचा असेल तर सुरुवातीला तरी जागा आणि माणसं माहितीची हवी. एवढी तयार केली तरी प्रवासाला निघता येतं.
2) आपण पर्यटक नाही. त्यामुळे जास्त सामान नको. खरेदी नको. मिनरल वॉटर नको, हॉटेलात रहायची सोय नको. त्यापेक्षा आपण जाऊ तिथलं लोकल फूड खावं. मंदिरं, दर्गा, इथले प्रसाद पोटभर खायचे आणि हवंतसं शक्यतो पायी भटकायचं. हा नियम. पायी भटकूनच माणसं भेटतात. ओळखी होतात.
3) सगळ्यात महत्त्वाचं. प्रवास आपल्याला शिकवतो, अनुभव देतो. चांगले अनुभव येतात तसे वाईटही येऊ शकतात. पण माणसं आणि जग समजून घ्यायच्या या कार्यशाळेत आपण पुन्हा पुन्हा जात रहायचं.
होमवर्क म्हणून निदान तुमचं शहर तरी पाहून या. ते तरी पुरतं पायाखालचं आहे का, आपल्या विचारा स्वत:ला!