वाट्टेल ते डाऊनलोड करताय? डोकं आहे की डिजिटल कचरापट्टी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 07:00 AM2020-03-19T07:00:00+5:302020-03-19T07:00:09+5:30

एखाद्या कपाटात खूप वेगवेगळ्या वस्तू आपण ठेवतो. हे पण हवं, ते असूच दे, अरे ते तर पाहिजेच, असं करत कोंबून ठेवतो सगळं; पण त्यामुळे वेळेवर काहीच मिळत नाही. उलट कपाट उघडल्यावर कोंबून ठेवलेलं सामान आपल्याच अंगावर धबाधबा कोसळतं. डिजिटल माहितीचा जो साठा आपण करतो, त्याचंही तेच होतं. बाहेरून सतत कोसळणारी माहिती साठवत आपला मेंदू आणि मनही असं हँग होतं.

save your head, its not digital dumping ground! | वाट्टेल ते डाऊनलोड करताय? डोकं आहे की डिजिटल कचरापट्टी?

वाट्टेल ते डाऊनलोड करताय? डोकं आहे की डिजिटल कचरापट्टी?

Next
ठळक मुद्देडोक्यातला आणि स्मार्टफोनमधलाही कचरा वेळीच काढा नाहीतर मेंदू कुजेल!

-प्राची पाठक

जरा कुठं शांत, सुंदर स्पॉट दिसला, आजूबाजूला झाडं दिसली, आडोसा दिसला तर मुलं-मुलं कोपर्‍या कोपर्‍यात जाऊन टिकटॉक व्हिडीओ काढताना दिसतात. 
केलंय नां हे तुम्ही? 
काढलेत नां असे सेल्फी? 
एरव्ही आपल्याला स्वच्छ, सुंदर स्पॉट्स फोटो काढायला हवे असतात. आयतेच तेही. आपण मात्र रस्त्यावर कचरा फेकताना, रस्त्यावर थुंकून घाण करताना मात्र असेच फोटोजेनिक स्पॉट्स आपण कमी करतोय, घाण करतोय, याचं भान मात्र ठेवणार नाही. 
आपला मतलब काय? 
दिसली बरी जागा, काढ तिथे फोटो. काढ टिकटॉक व्हिडीओ. कर ते फॉरवर्ड आणि कर ते व्हायरल. सगळं लक्ष आपला टिकटॉक व्हिडीओ भारी कसा येईल त्यावर. 
कुठल्या अँगलने आपण लै भारी दिसतो? 
सगळा अभ्यास एकदम क्विक.
 भारी मोबाइल आपल्या हातात असतोच. 
नसला, तर त्याचा जणू ध्यास लागलेला असतो. त्यात जास्तीचे मेमरी कार्ड टाकले जातात. सोबत सेल्फी तर असतातच. चांगला नेट स्पीड कोणती कंपनी देते, सगळं ठरतं. फोटो, व्हिडीओ एकमेकांना पाठवले जातात. पन्नास ट्रायल होतात. कित्येक जीबी डेटा तयार होतो. आपण आणखीन तिसर्‍याचे व्हिडीओ, यू-टय़ूब चॅनल फॉलो करत असतो. त्यांच्यासारखं भारी करायचं असतं आपल्याला सगळं. सगळा डेटा हाताशी असावा म्हणून आपण तो डाउनलोड करून ठेवतो. भारंभार गाणी आपल्याला ऐकायची असतात. मित्र-मैत्रिणी आणखीन काही सुचवत असतात. फॉरवर्ड होत होत येणारा माहितीचा धबधबा वेगळाच.
 सगळं मनोरंजन हातातल्या मोबाइलच्या स्क्रीनवर शोधायला लागायचं. त्यात आपला किती वेळ जातोय, त्याचं कोणाला भानच नाही. किती वेबसाइट्सवर आपण कशासाठी आणि का मेंबर होतोय, कधी केलाय विचार?
 किती अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये उगाच येऊन बसलेत? काही हिशेबच नाही. भारंभार हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह घेऊन ठेवायचा. 
कोण सांगतं हे काय भारी बघितलं यार, लगेच ते कॉपी -पेस्ट मारायचं. वेगवेगळ्या साइट्सवरून लेस्टेस्ट सिनेमे डाउनलोड कसे करायचे, हे आपल्याला आपसुख मित्रांकडून कळायला लागतं. जणू स्पर्धा लागलीये, कोणाकडे आधी कोणत्या फिल्म्स आल्या. कोणी सगळ्यात फास्ट असे सिनेमे डाउनलोड केले! 
आपण त्या स्पर्धेत मागे पडायला नको. मग मित्रांवर शाइन कसं मारणार?
 हे झालं की त्यांनी जे डाउनलोड केलं ते आपण कॉपी- पेस्ट मारून आणायचं. आपण डाउनलोड केलेलं त्यांना द्यायचं. काय तो बंधुभाव! 
आणखीन हार्ड डिस्क भरून ठेवायच्या. घरी वेळ काढून एकेक काहीतरी बघायचं. घरातल्या लोकांना वाटतं, आपला बबडय़ा काहीतरी महत्त्वाचं काम करतोय. बबडय़ा तर टिकटॉक व्हिडीओमधून जमवलेला, सेव्ह केलेला माल परत परत पाहत बसला आहे! वेगवेगळ्या वेब सिरीजच्या जाळ्यात गुरफटला गेला आहे. 
सोशल नेटवर्किगवर कोण कोणाला काय म्हणालं, कोणी कोणते फोटो अपलोड केले, कोणाचं कोणासोबत ‘चक्कर’ सुरू आहे, सगळी माहिती मिनिटामिनिटाला मिळवत बसायचं. इतरांचे स्टेटस अपडेट काय आहेत, त्यावर चर्चा. 
इतर कसे लै भारी आहेत आणि आपण जरा मागेच पडतोय, अशीही एक धावाधाव. 
मग कोणी सांगतात, आमच्या घरात अमुक मोठी बुक शेल्फ आहे. 
झालं. वेगळी स्पर्धा सुरू होते मग. 
कोणाच्या घरात किती जास्त संख्येने पुस्तकं आहेत? आपण त्याच्या पुढेच गेलं पाहिजे. घरात साठवून ठेवलेल्या पुस्तकांच्या संख्येवरून कोणी लै भारी ठरत नसतं. वाचनालयातून एकेक करून पुस्तक आणून पूर्ण लक्ष केंद्रित करून, समजून घेत पुस्तक वाचणं कदाचित त्यातून जास्त फायदेशीर असू शकेल. 
पण, आपलं लक्ष सगळं इतरांवर. कोणाकडे काय आहे आणि किती आहे. माझ्याकडे काय नाही! भिंग लावून, हाताशी असलेला वेळ घालवून सगळं बघत बसायचं. हा आहे ‘फोमो’चा त्रास, जो आपल्या गावीही नाही. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. सगळे खूप भारी काही करताय आणि  मी मात्र त्यात मागे पडतोय, ही सततची भावना. हळूहळू त्यातून स्पर्धा, ईर्षा, भीती, स्ट्रेस, डिप्रेशनकडे वाटचाल होऊ शकते; पण आपल्याला मात्र इतरांचं सगळं भारी आज, आता, ताबडतोब आपल्याही आयुष्यात हवं आहे! 
एखाद्या कपाटात खूप वेगवेगळ्या वस्तू हे पण हवं, ते असूच दे, अरे ते तर पाहिजेच, असं करत कोंबून ठेवल्या तर जेव्हा जे लागेल, ते तर चटकन मिळत नाहीच; पण कपाट उघडल्यावर कोंबून ठेवलेलं सामान आपल्याच अंगावर धबाधबा कोसळण्याची शक्यता जास्त. पुन्हा त्या प्रत्येक सामानाचा नेमका उपयोगदेखील आपल्याला होणार नाही आणि त्याची मजाही कळणार नाही. बाहेरून सतत कोसळणारी माहिती पाहून पाहून आपला मेंदू आणि मनही असं हँग होतं. कचरपट्टीने भरून जातं. जितकी जास्त माहिती त्यात आपण ओतत बसणार, तितकं त्याला फोकस ठेवायला त्रास होणार. नेमक्यावेळी कोणती माहिती वापरावी, ते कळेनासं होणार. आपली सगळी भिंगं इतरांवर लावून ठेवली, तर आपला आजदेखील खराब होणारच. 
सगळं जमा करून ठेवायच्या आपल्या सवयीचाच विचार करायची वेळ आली आहे. बी स्मार्ट टू युज स्मार्टफोन!

( प्राची मानसोपचारतज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

Web Title: save your head, its not digital dumping ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.