खणाचे काठ पैठणीचा थाट

By Admin | Updated: March 20, 2015 15:33 IST2015-03-20T15:33:13+5:302015-03-20T15:33:13+5:30

मराठमोळी एक खूण म्हणजे ‘खण’. खणाच्या साड्या, परकर-पोलका आपण पूर्वीपासून वापरात आहेत. आता मात्र तरुण मुलींवर पुन्हा एकदा या खणानं आणि त्यातल्या रंगांनी गारुड केलं आहे.

Pethaani Thaa | खणाचे काठ पैठणीचा थाट

खणाचे काठ पैठणीचा थाट

>खणाच्या रंगांना लाभणार्‍या नव्या झळाळीची गंमत
 
मराठमोळी एक खूण म्हणजे ‘खण’. खणाच्या साड्या, परकर-पोलका आपण पूर्वीपासून वापरात आहेत. 
आता मात्र तरुण मुलींवर पुन्हा एकदा या खणानं आणि त्यातल्या रंगांनी गारुड केलं आहे.
त्यातही कॉटनच्या लाल, हिंरव्या, पिवळ्या रंगातील खणाच्या साड्या सध्या ‘इन’ आहेत. या साड्यांपासून ड्रेस, कुर्ता करण्याचीही अनेकींची धडपड असते. साडी आणून आपल्याला हवा तसा कुर्ता शिवला जातो. एखाद्या नवरीला लग्नासाठी खणाचीच नऊवारी साडी हवी असते. आणि मग त्यातही प्रयोग करता येतात. खणाचे काठ नऊवारीला जोडल्यास एक वेगळाच खास लूक येऊ शकतो. 
खणाची पॅण्ट किंवा स्कर्टही तयार करता येतो. अनेकजणी तसा प्रयोग करून ते व्हायब्रण्ट कलर्स मस्त अंगावर मिरवतातही. माझ्याच एका नवीन कलेक्शनमध्ये मी खणापासून गळ्यातला हार तयार करून पाहिला आहे. तोही अत्यंत सुंदर दिसतो. खणाची चप्पल, पर्स, बॅग या  रंगबिरंगी गोष्टीही सध्या तरुण मुलींमधे लोकप्रिय आहेतच. 
मुख्य म्हणजे आपण जोपर्यंत काही हटके शोधत नाही तोपर्यंत लोकांना ते मिळत नाही. पैठणी साड्यांचंच उदाहरण घ्या. पैठणी साड्यांमध्ये मोराच्या डिझाइनला फार महत्त्व आहे. प्रत्येक साडीची शान ही त्याचा पदर असते. मग काही साड्यांमध्ये पदरात खण लावल्यास त्याचा लूक आणखी आकर्षक होतो. तसेच पैठणी साडीचा काठ घेऊन दुसर्‍या एका साडीवर पदरावर मोर, जरीचे डिझाइन केल्याने हटके साडी तयार होते.
पूर्वी पारंपरिक वेशभूषेत महिला गळ्यात चिंचपेटी, बोरमाळ, मोठ्ठे हार, कानात मोत्याच्या कुड्या, हातात पाटल्या, बांगड्या, तोडे, बाजूबंद, नथ, अंगठी, कमरपट्टा, पायातील जोडवी असे दागिने परिधान करायच्या. हल्ली सोनं महाग झाल्यानं बर्‍याचदा यातही पर्यायी दागिने घालण्याची प्रथा आली आहे. जुन्या पद्धती जसच्या तशा न येता त्यातील महत्त्वाचे एलिमेंट वापरून पुन्हा नवीन प्रकार तयार केले जात आहेत. 
त्यातही सध्या खास आहेत त्या खणाच्या चपल्या. त्या नऊवारी साड्यांवर किंवा लेगिन्स-कुर्ता यावर उठून दिसतात. फॅशन म्हणून हल्ली या चपला वापरल्या जातात.
खणाच्या बॉर्डर आपल्या वेगवेगळ्या साड्यांवर लावल्यास मस्त फेस्टिव्ह लूक येतो. खणांचे वनपीस ड्रेस, स्कर्टही एक नवा लूक देतात. याशिवाय खणांच्या ओढण्या, स्कार्फ, पर्स या गोष्टीही अप्रूपाच्या ठरत आहेत.
एक वेगळा लूक हवा म्हणून हे सारं ट्राय करून पाहणार्‍यांची संख्या वाढते आहे.
 
 
मराठमोळं ‘इन’ काय?
 
१) लग्नसमारंभात नऊवारी साडी सध्या एकदम लोकप्रिय.
२) नथ, मोत्याचे दागिने एकदम कूल.
३) एक ग्रॅम सोन्यात पारंपरिक दागिन्यांची चलती. चंद्रहार, कर्णफुलं, बकुळफुलांपासून मोहनमाळ आणि कोल्हापुरी साज एकदम हॉट.
४) खणाची हौस तर बॅगा ते चपला सर्वत्र सरसकट दिसते.
 
 
मराठमोळे तरुणही 
फॅशनेबल 
 
१) सध्या तरुण मुलांमधे सर्वत्र एक फॅशन भयंकर लोकप्रिय आहे. कानात भिकबाळी घालणं. त्यासाठी कान टोचून चांदी-सोन्याच्या तारेत कानात मोती लटकवले जात आहेत. 
२) कानात बाळ्या घालण्याचा जुनाच ट्रेण्ड आता नव्यानं आलाय.
३) आणि सगळ्यात पॉप्युलर आहेत त्या कोल्हापुरी चपला. कुर्ता-पायजमा-चपला सोबर सिंपल लूक तयार.
 
- अदिती मोघे फॅशन डिझायनर  

Web Title: Pethaani Thaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.