मनोरंजनाला पर्सनल टच

By Admin | Updated: July 14, 2016 23:14 IST2016-07-14T23:14:34+5:302016-07-14T23:14:34+5:30

इंटरनेटच्या मदतीनं कधीही पाहता येणारं, आवडतं तेच निवडण्याचं स्वातंत्र्य देणारं नव्यानं आकारास येत असलेलं एक नवीनच जग, जे टीव्हीची मक्तेदारीच मोडीत काढत आहे!

Personal touch to entertainment | मनोरंजनाला पर्सनल टच

मनोरंजनाला पर्सनल टच

>-  मुक्ता चैतन्य
 
आपल्याला हवं तेव्हा,
आवडत्या विषयाच्या,
तरुण, समकालीन आणि तरीही
अत्यंत मनोरंजक, आपल्याच
भाषेत अनुभव मांडणा:या सिरिअल्स पाहायच्या
तर टीव्ही हा पर्यायच आता उरलेला नाही.
मनोरंजन अत्यंत ‘व्यक्तिगत’ बनवणारा
आता एक नवीनच प्रकार
इंटरनेटवरून मोबाइल/कॉम्प्युटरवरही पोहचतो आहे,
त्याचं नाव वेब सिरिअल!
 
इंटरनेटच्या मदतीनं कधीही पाहता येणारं, आवडतं तेच निवडण्याचं स्वातंत्र्य देणारं नव्यानं आकारास येत असलेलं एक नवीनच जग, जे टीव्हीची मक्तेदारीच मोडीत काढत आहे!
 
काय त्या सिरिअल्स? काय त्यांचे ते चावून चोथा झालेले विषय? ऊठसूट सासू आणि सुनेच्या कागाळ्या, नाहीतर अचकट-विचकट चेहरे करणारे खलनायक आणि सात्त्विकतेच्या पाकात बुडवून काढलेल्या नायिका!! 
सगळाच कंटाळवाणा गोलमाल!!
हे असले विचार अधून-मधून तुमच्या मनात येतात का? 
येत असतील तर त्यात काहीही नवीन नाहीये. कारण असला विचार मनात येणा:यांची संख्या आता पुष्कळ आहे. हिंदी काय किंवा मराठी काय मालिकांच्या दुनियेत जे काही दाखवलं जातं ते इतकं कंटाळवाणं आणि गुळगुळीत आहे की उत्सुकतेपोटी कमी आणि दुसरं काहीच बरं बघायला नाही म्हणून टीव्ही मालिका बघितल्या जातात. संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी दिवसभराचा शीण घालवायचा असतो, डोक्याला फार ताण नको असतो, आणि कुठेतरी जाऊन काहीतरी मनोरंजनात्मक बघण्याचा उत्साह जवळपास नसतो. अशावेळी सोफ्यावर लोळत पडलेलं असताना किंवा स्वयंपाक करत बघता येईल असं काहीतरी हवं असतं. दुसरं काहीच नसल्यानं मग मोठा प्रेक्षक वर्ग या मालिका पाहण्याकडे झुकतो.
पण आता मालिकांच्या या एकसुरी मक्तेदारीला आता ‘वेब सिरिअल्स’ नावाच्या अत्याधुनिक प्रकाराला तोंड द्यावं लागतं आहे. 
स्मार्टफोन हाताशी आल्यानंतर जे अनेक बदल आपल्या जीवनशैलीत, वर्तणुकीत झाले तसंच आपल्या मनोरंजनाच्या साधनांमध्ये आणि त्याच्या वापरामध्येही मोठे बदल होऊ लागले आहेत. यू-टय़ुब, हॉटस्टार, टीव्हीएफप्ले सारख्या इंटरनेटवरच्या साइट्समुळे दृक्श्रव्य मनोरंजनाच्या प्रकारात अनेक प्रयोग सुरू झाले. सुरुवातीला विविध सिनेमातील प्रसिद्ध सिन्सच्या क्लिप्स उपलब्ध करून देण्यापासून अगदी लहानशा कथा सादर करण्यापर्यंत अनेक गोष्टींच्या शक्यता तयार झाल्या.  स्टॅण्डप कॉमेडी हा प्रकारही ‘वेब चॅनल्स’च्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्ध झाला.
 इतके दिवस घरात ज्याचा रुबाब त्याच्या आवडीचं टीव्हीवर पाहायचं असं एक समीकरण होतं. टीव्हीच्या रिमोटवर ज्याची कुणाची मक्तेदारी असेल त्याच्या आवडीनिवडी सा:या घराला स्वीकाराव्या लागतात. ही मक्तेदारीही आता या ‘वेब चॅनल्स’मुळे जवळपास संपुष्टात आली, येते आहे.
आज आपल्याकडे बहुतेक सगळ्या भारतीय भाषांमध्ये ‘वेब सिरिअल्स’ बनतात. हिंदीमध्ये सध्या पर्मनंट रूममेट्स, हैपीटू बी सिंगल, पिचर्स, गर्ल इन द सिटी, मेन्स वर्ल्ड, बॅड इंडिअन्स, लेडीज रूम अशा काही भन्नाट सिरियल्स चालू आहेत. या सगळ्या सिरिअल्स सास-बहूच्या टिपिकल ड्रामा पलीकडच्या आहेत. मराठीत तयार होणा:या वेबमालिकासुद्धा सध्या मराठीत दाखवल्या जाणा:या त्याच त्या टिपिकल मालिकांच्या रटाळ गोष्टींपलीकडच्या दिसतात. माणसांचं खरं जगणं आणि मनोरंजन यांच सुंदर ब्लेंड यात दिसतो. 
या क्षेत्रत सुरु वातीला अनोळखी चेहरे आणि जबरदस्त विषय असं कॉम्बिनेशन होतं. पण आता याही क्षेत्रत टीव्हीवरच्या अनेक सेलिब्रिटीजनी प्रवेश केला आहे. एमटीव्हीवरच्या रोडीज या सुपरहिट रिअॅलिटी शोमधला रघु राम नवी कोरी ‘वेब सिरियल’ घेऊन आला आहे. तिचं नाव 'A.I.SHA My Virtual Girlfriend'. वरुण सोबती आणि सुरभी ज्योती यांची एक नवी वेब सिरिअल येऊ घातली आहे. इतरही अनेक वेब सिरिअल्समध्ये टीव्ही आणि चित्रपटातले कलाकार झळकू लागले आहेत.
या पुढचा जमाना ‘वेब’चा आहे हे नक्की!! 
टीव्हीवर 1क् वर्षांपूर्वी जशा मालिका,  जे विषय दिसायचे, तेच अजूनही सुरू आहेत. फक्त टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे अधिक सुंदर स्वरूपात ते सादर होते. 
वेब सिरिअल्सची दुनिया मात्र निराळी आणि अधिक ताजी आहे. शिवाय, या सिरिअल्स इंटरनेटसारख्या नव्या माध्यमात प्रसारित होत असल्यामुळे त्यांच्यावर ‘सांस्कृतिक पोलिसी खाक्या’ फारसा नाहीये. त्यामुळे जगण्यातले, नाजूक-अवघड-बोल्ड विषयही सहजतेने हाताळले जात आहेत. त्यामुळेही कदाचित या ‘पर्सनलाईज्ड’ मनोरंजनाला मिळणारा प्रतिसाद  प्रचंड वेगानं वाढतो आहे. टीव्हीचा प्रेक्षक हळूहळू ‘वेब मालिकां’कडे वळतो आहे. अर्थातच, यात तरुणांची संख्या प्रचंड आहे. टीव्हीचा प्रेक्षक आणि वेबचा प्रेक्षक अशी सरळ सरळ विभागणी येत्या काळात दिसायला लागेल, असं हे चित्र आहे.
 
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 

Web Title: Personal touch to entertainment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.