पेप्लम आणि रफल : नवरात्रातले नवे स्टायलिश ट्रेण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 07:20 IST2019-10-03T07:20:00+5:302019-10-03T07:20:02+5:30
यंदा सगळ्या गोष्टी सोप्या करून घेण्याकडे कल आहे. त्यामुळेच तर सध्या चर्चा आहे ती पेप्लम कुर्ती आणि ब्लाउजची.

पेप्लम आणि रफल : नवरात्रातले नवे स्टायलिश ट्रेण्ड
- प्राची साठे
नवरात्रीचे दिवस म्हणजे फॅशनप्रेमींसाठी जगून घ्यावेत असे दिवस. या दिवसांत काय घालावं आणि काय नाही हे नेहमीच्या दांडिया-गरबावाल्यांना सांगण्याची काहीच गरज नाही. मात्र ज्यांना दांडिया खेळायला जायचं नाही; पण तो मूड जगून घ्यायचा आहे, किंवा थेट क्लास-कॉलेज-ऑफिसातून गरबा खेळायला जायचं आहे. त्यांच्यासाठी या काही टिप्स.
तुम्ही जे कपडे दिवसा कॉलेज-ऑफिसला घालू शकतात, तेच घालून गरबा खेळायला जाऊ शकतात अशी काही कॉम्बिनेशन सध्या चर्चेत आहे. कारण मुळात फॅशन हीच इझी गोअर असते. आपण करू तशी छान सजते.
त्यात यंदा सगळ्या गोष्टी सोप्या करून घेण्याकडे कल आहे.
त्यामुळेच तर सध्या चर्चा आहे ती पेप्लम कुर्ती आणि ब्लाउजची.
पेप्लम
पेप्लम म्हणतात अशी ही झालरची कुर्ती आहे. ती स्कर्टवर घालताच येते. जिन्सवर वापरता येते. प्लेन रंगात अत्यंत सोबर दिसते. विशेष म्हणजे या पेप्लम कुर्तीवर साडी नेसण्याचा यंदा ट्रेण्ड आहे. छान मोठी अशी ही कुर्ती. तिला झालर आणि त्यावर मोठ्ठे कानातले आणि मोठी लाल रंगाची टिकली एवढं जरी केलं तरी कुणीही गरबा रेडी दिसू शकतं.
रफल स्लिव्हज
पेप्लमप्रमाणे रफल स्लिव्हजची सध्या फॅशन आहे. रफल म्हणजे झालरीचे कुर्ते, ब्लाउज. अगदी लेहंगा घागर्यावरही या रफल स्लिव्हज कुर्ती छान दिसतात. त्यासोबत ऑक्सडाइजचे मोठ्ठे कानातले, हातात एखादं कडं एवढं जरी असलं तरी लूक पूर्ण होतो.
हायनेक
हायनेक शर्ट घालून कुणी गरबा खेळतं का? पण सध्या हायनेकची फॅशन आहे. ब्लाउज, कुर्ती आणि स्कर्ट असं कॉम्बिनेशन अनेकजणी वापरताना दिसतात.
मल्टिकलर
जे वापरलं ते मल्टिकलर असा नियम केला तरी चालेल इतका रंगीबेरंगी कॉण्ट्रास्ट सध्या ट्रेण्ड आहे. घागरे, स्कर्ट, बांगडय़ा, गळ्यातले हे सारं मल्टिकलर सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे जे वापराल ते कलरफुल एवढं जरी केलं तरी ते छान दिसेल.
केसांत मोठ्ठं फुल
हातभर बांगडय़ा
हा खरं तर रेट्रो म्हणजे सत्तरच्या दशकातला ट्रेण्ड आहे. मात्र मोठ्ठं टपोरं फुल केसात माळणं हा सध्या नवा गर्लीश ट्रेण्ड आहे. त्याला जोड म्हणून हातभर बांगडय़ा घातल्या की झालाच ट्रॅडिशनल लूक तयार!
मोठ्ठी टिकली
टिकली न लावण्याचा ट्रेण्ड जाऊन पुन्हा मोठी ठसठशीत टिकली लावण्याचा सध्या ट्रेण्ड आहे. घागरे, स्कर्ट, साडी यावर ही टिकली छान दिसते. टिकली लावली की कानात मोठ्ठे कानातले, गळ्यात मात्र काही नाही असा हा ट्रेण्ड आहे.