ऑलिम्पिकवेडे
By Admin | Updated: August 4, 2016 17:20 IST2016-08-04T17:20:28+5:302016-08-04T17:20:28+5:30
मानवी ईर्षा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, गुणवत्ता, अव्वल सरसता आणि खिलाडू वृत्तीसह हार-जीत पत्करत संघर्ष करण्याच्या एका अखंड ऊर्जास्त्रोताचं नाव आहे ऑलिम्पिक!

ऑलिम्पिकवेडे
>- ऑक्सिजन टीम
ते निघालेत, नव्या जगाचा भाग व्हायला,
नवा अनुभव जगायला
आणि अस्सल, अव्वल खेळ पहायला,
त्यांना म्हणतात व्हॉलेण्टिअर्स.
प्रवास, खेळ आणि
थरार यांचं वेड असणारी
ही माणसं नक्की करतात काय?
याचा एक शोध,
आज सुरू होणाऱ्या
ऑॅलिम्पिकच्या निमित्तानं!
ऑलिम्पिक. म्हणजे केवळ क्रीडा सामन्यांचं एक निमित्त नव्हे! मानवी ईर्षा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, गुणवत्ता, अव्वल सरसता आणि खिलाडू वृत्तीसह हार-जीत पत्करत संघर्ष करण्याच्या एका अखंड ऊर्जास्त्रोताचं नाव आहे ऑलिम्पिक! या ‘ऑलिम्पिक’साठी पात्र ठरणं हेच केवढं मोठं यश आणि त्यातही तिथं पदक पटकावणं आणि तांब्यापासून ते सुवर्णापर्यंत वाटचाल करणं हे तर देशाच्या सन्मानात आपल्या प्रयत्नांची एक अमूल्य ओंजळ वाहण्यासारखंच! आजपासून हा सन्मानाचा जागर सुरू होईल, आणि जगभरातील खेळाडू आपली सर्वोच्च गुणवत्ता आणि मेहनत पणाला लावून यशासाठी जिवाचं रान करतील! हरएक सेकंद त्यांची परीक्षा पाहील आणि तेही साऱ्या जगाला पुरून उरत आपलं अव्वल असणं साबीत करतील! त्या खेळाडूंच्या परिश्रमाला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीसह मानसिक-शारीरिक बलाला एक कडक सलामच करायला हवा! मात्र जे खेळाडू नाहीत, जे कुठलाच खेळ खेळत नाहीत त्यांचं काय?
त्यांना गुणवत्ता जागरात काहीच स्थान नाही का? तर आहे, नव्या काळात तेही आहे! खेळाडू परफॉर्म करत असताना दुसरीकडे नियोजन ते सुविधा पुरवणं या टप्प्यात केवळ नवा अनुभव जगण्याचं पॅशन म्हणून या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणारेही आहेत.. जगभरात असे वेडे आहेत जे स्वत:चे पैसे खर्च करून येतात, आपापलं काम चोख करतात आणि आपण सर्वोत्कृष्ट दर्जाचा खेळ अनुभवला याचं समाधान घेऊन परतात...