नुस्त्या धाकानं पोरं सुधरत नाहीत, बिघडतात!
By Admin | Updated: October 22, 2015 21:35 IST2015-10-22T21:35:16+5:302015-10-22T21:35:16+5:30
गेल्या आठवडय़ाची गोष्ट. ऑक्सिजनचा ‘तसलं काही’ विशेषांक प्रसिद्ध झाला. तशी आदल्या दिवशी जाहिरातही होती. त्यामुळे तो विषय उद्या वाचायचाच असं मी ठरवलं होतं.

नुस्त्या धाकानं पोरं सुधरत नाहीत, बिघडतात!
गेल्या आठवडय़ाची गोष्ट. ऑक्सिजनचा ‘तसलं काही’ विशेषांक प्रसिद्ध झाला. तशी आदल्या दिवशी जाहिरातही होती. त्यामुळे तो विषय उद्या वाचायचाच असं मी ठरवलं होतं.
पण सकाळी उठून पाहिलं तर काय आमच्या घरात फक्त ‘लोकमत’ आला होता. ऑक्सिजन पुरवणी गायब. आईला विचारलं तर म्हणाली, आज आलीच नाही पुरवणी. पेपरवाल्यानं टाकलीच नसेल.
तसं काही होणार नाही याची मला खात्री होती. माङया बाबांनी सकाळी पेपर वाचताना ती लपवली असणार. आपल्या मुलांनी असलं काही वाचायलाच नको असं म्हणून ती गायब केली असणार हे उघड होतं.
विषय इतका नाजूक होता की, शेजारीपाजारी जाऊन मुद्दाम मागितला असता तो पेपर तर बरीच चर्चा झाली असती.
मग मी गप्पच बसले. म्हटलं ठिके, लपवा पेपर. काही बिघडत नाही.
मी सरळ सायबर कॅफेत गेले. ऑनलाइन जाऊन सगळी पुरवणी, सगळे लेख वाचून काढले.
मला सगळी माहिती उत्तम मिळाली.
खरंतर मी पोर्नसाईट्स पाहत नाही, पण तसल्या क्लिप्स मित्रमैत्रिणी शेअर करतात. फोनवर ते आम्ही पाहतोच.
त्या व्यसनातून बाहेर कसं पडायचं, सारासार विचार कसा करायचा हे सांगणारी पुरवणीच घरच्यांनी गायब केली तर त्यांना कोण समजावत बसणार की, माहिती अशी लपवून आम्हाला काही कळणारच नाही, या भ्रमात राहू नका.
जसं मी ऑनलाइन जाऊन घराबाहेर मला हवं ते वाचू शकते, तसं पाहूही शकते ना?
पण आमच्या घरामधे वातावरण असं सोवळं की, असले विषय बोलायचेही नाहीत.
एकदा मी भाजी घ्यायला गेले. येताना सॅनिटरी नॅपकिन्स त्याच पिशवीत आणले.
तर माङो वडील काय संतापले. मला काही बोलले नाहीत. पण आईला म्हणाले ही भाजी मला खाऊ घालू नको. विटाळ झाला.
आता यावर चिडावं की हसावं की रडावं?
असे किती प्रसंग, किती गोष्टी की ज्यात सतत जाणवतं की आमच्या पालकांना आमचं जग कळत नाही. माहिती नाही.
समजून घ्यायचं नाही. फक्त कण्ट्रोल करायचं आहे. आणि असं कण्ट्रोल करून काहीच त्यांच्या हाती लागणार नाही.
माङया अनेक मैत्रिणी सर्रास बिअर पितात. पण घरी माहिती नाही.
कारण घरचं वातावरण कडक. घरी कळलं तर मारतीलच.
पण त्या धाकानं काही त्यांना दारू पिण्यापासून रोखलेलं नाही. उलट अजून हिरीरीनं त्या सारं काही करतात. आणि आपण किती बंडखोर, किती स्वतंत्र म्हणून मिरवतात.
त्यांना काही सांगावं तर त्या ऐकत नाहीत आणि माङयासारख्याचं घरचे ऐकत नाही.
अतीच समजदार असण्याची किंमत मोजतो आमच्यासारखे!
तर त्या पुरवणीची मी गंमत सांगत होते. मला नंतर कळलं की माङया वडिलांनी ती पुरवणी माङया भावाला एकांतात वाचायला लावली. आणि म्हणाले खबरदार असलं काही पाहत असशील तर?
माझा धाकटा भाऊ, तो अजून दहावीतच आहे. त्याला जे माहितीच नव्हतं ते वडिलांनी आधीच सांगून टाकलं!
सांगा, काय बोलणार?
माझी सगळ्या आईबाबांना एकच विनंती आहे, जमल्यास फक्त आमचं आधी ऐकून घ्या. सल्ले नंतर द्या, आधी माहिती नीट समजून घ्या.
नुस्त्या धाकानं पोरं सुधरत नाहीत,
बिघडण्याचीच शक्यता जास्त!!
- मोहिनी
( मोहिनीचं इमेलनं आलेलं हे पत्र. त्यात तिनं लिहिलंय की, आमच्या घरात मुलींचं इमेल अकाउण्ट असणं हेसुद्धा ‘तसलं काही’ मानलं जातं. माझं मेल अकाउण्ट आहे आणि मला मराठीसुद्धा टाईप करता येतं, हे माङया मैत्रिणींनासुद्धा मी सांगितलेलं नाही.)