नथीचा नखरा करून पाहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST2018-08-23T03:00:00+5:302018-08-23T03:00:00+5:30
नथ नाकातच घालतात; पण आता नथीचे कानातले, गळ्यातलेही मिळू लागलेत. एक नवीन फॅशन म्हणून.

नथीचा नखरा करून पाहा!
- सारिका पूरकर - गुजराथी
सा-या सख्या-सजणींचा लाडका हसरा-नाचरा र्शावण आलाय. उत्साहाचं उधाणच. सणवार, व्रत-वैकल्यांच्या या महिन्यात नटण्या -मुरडण्याची एकही संधी सोडावीशी वाटत नाही.
श्रावणातील या नटण्याला थोडी लेटेस्टची जोड दिली तर चारचौघीत तुम्ही नुसत्याच उठून दिसणार नाहीत तर तुम्हाला स्वत:लाही काही तरी पारंपरिकच पण तरीही वेगळं, छान घातल्याचा फील येत राहील. त्यासाठी फार काही करायचं नाहीये, खिशाला चाटही द्यायची नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर यंदाच्या श्रावणात तुमचा तोरा काही औरच असेल बरं का ! तर या श्रावणासाठीचा लेटेस्ट फंडा आहे नथ मंगळसूत्र..
एरवी नाकात घालायची नथ आता मंगळसूत्रात घातली जातेय. होय, काळ्या मण्यांच्या दाट सरी व मध्यभागी नथीच्या आकारातील नव्हे तर थेट मोत्याची नथ हीच पेंडंट म्हणून घातलेले हे मंगळसूत्र सध्याचा इन ट्रेण्ड आहे. मराठी वाहिनीवरील मालिकेतल्या एका नायिकेने हा फंडा लोकप्रिय केलाय. ठसठशीत तसेच पारंपरिक लूकबरोबरच हटके लूकही या मंगळसूत्रामुळे येतो, हे मंगळसूत्र लांबीला जास्त नसते. ठुशीच्या लांबीपेक्षा थोडे जास्त लांबीचे असते. तुम्ही याला गळ्याभोवतीदेखील घालू शकता (स्पृहा जोशीने नव्हते का घातले पाणी फाउण्डेशनच्या कार्यक्रमात.) त्यामुळेही ते खुलून दिसते. काठपदराची, प्युअर सिल्कच्या साडीवर हे मंगळसूत्र घातलं की तुमचा नूर खुललाच म्हणून समजा!
नथीच्या मंगळसूत्राबरोबर लिंबोटी माळ, पोहेहार, चपलाहार, एकदाणी यापैकी काहीही घालून तुम्ही श्रावणसाज पूर्ण करू शकता. काळ्या मण्यांच्या दाट सरी नको असतील तर नाजूक काळे मणी व जाणव्यांचे एकेरी मंगळसूत्रही नथ घालून छान दिसते. यामध्ये मात्र नथीचे पेंडंट अगदी नाजूक असते. हे मंगळसूत्र तुम्ही कुर्ती, पंजाबी ड्रेसवर सहज कॅरी करू शकता.
हे झालं लग्न झालेल्यांचं; पण ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठीही बाजारात कलरफुल दो-यात नथ पेंडण्ट मिळतं.
नथीचे कानातलेही आता खूप लोकप्रिय होत आहेत.
अर्थात फार पूर्वीही आली होती ही नथीच्या कानातल्याची फॅशन. स्मिता तळवळकर यांची निर्मिती असलेल्या सवत माझी लाडकी या मराठी चित्रपटात त्यांनी नथीचे कानातले घातले होते !
एकूण काय फॅशनचं चक्र गोल गोल फिरतं, आता त्या चक्रात नथ नव्यानं आली आहे, इतकंच!