नेयमार रिअल स्टार
By Admin | Updated: June 13, 2014 09:42 IST2014-06-13T09:42:38+5:302014-06-13T09:42:38+5:30
नेयमार दा सिल्वा सॅण्टोस ज्युनिअर. हे त्याचं खरंतर नाव. पण आज सारं जग त्याला नेयमार म्हणूनच ओळखतं आहे.

नेयमार रिअल स्टार
>नेयमार दा सिल्वा सॅण्टोस ज्युनिअर.
हे त्याचं खरंतर नाव. पण आज सारं जग त्याला नेयमार म्हणूनच ओळखतं आहे. खरंतर नेयमार हे त्याच्या वडिलांचं नाव. ते स्वत:ही उत्कृष्ट फुटबॉल खेळायचे. वडिलांचं स्वप्न आणि नाव पुढे घेऊन जायचं या भावनेनं नेयमारनं त्यांचंच नाव लावायला सुरुवात केली.
नेयमार मूळचा ब्राझीलचाच. सारं जग आज ब्राझीलमधलं अस्वस्थ तारुण्य पाहतंय त्या तारुण्याचाच एक प्रतिनिधी म्हणजे हा नेयमार.
नेयमारचं फुटबॉलमधलं प्रावीण्य तो जेमतेम दहा-अकरा वर्षांचा होता तेव्हापासूनच लक्षात येत गेलं. वयाच्या चौदाव्या वर्षी तो पहिल्यांदा स्पेनला गेला. रिअल माद्रीद या जगप्रसिद्ध क्लबच्या यूथ टीमकडून तो खेळत होता. पटापट यशाच्या शिड्या चढत गेला. तो जेमतेम पंधरा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या कमाईतून कुटुंबाचं पहिलं घर झालं.
त्याची संपत्ती इतकी झपाट्यानं वाढली की, आजच्या घडीला तो जगातला सातव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे.
वयाच्या विसाव्या वर्षीच त्यानं १00 प्रोफेशनल गोल करण्याचा विक्रम केलाय, विशेष म्हणजे शंभरावा गोल त्यानं त्याच्या वाढदिवशीच ठोकला होता.
कमी वयात बरंच काही करण्याचा विक्रम करण्यात त्याचा हातखंडा. वयाच्या १९ व्याच वर्षी नेयमार बाप बनला. एवढय़ा लहान वयात मूल? जगाला प्रश्न पडला होता पण नेयमारनं आपण बाप झाल्याचं मान्य केलं आणि आपल्या गर्लफ्रेण्डशी (म्हणजेच त्या बाळाच्या आईशी) लग्न करत असल्याचं जाहीरही करून टाकलं.
खरंतर नेयमारही स्पेनकडूनच खेळायचा; पण ब्राझीलच्या सॅण्टोस क्लबनं त्यानं आपल्याकडून खेळावं यासाठी उत्तम पैसे मोजले. आणि नेयमार ब्राझीलकडूनच खेळत राहिला.
आजच्या घडीला तो ब्राझीलमधल्या ‘टाईम्स’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारा एकमेव खेळाडू आहे. ज्या ब्राझीलचा पेले त्याच ब्राझीलचा नेयमार, पण जी संधी पेलेला मिळाली नाही ती नेयमारना मिळाली.
नेयमारच्या संदर्भात वादही बरेच झाले. पेले आणि रोमारिओ यासारख्या दिग्गज खेळाडूंनी नेयमार ब्राझील संघाबाहेर रहावा म्हणून एकेकाळी खूप प्रयत्न केले, असे आरोपही ब्राझीलमध्ये झाले. त्याच्या फॅन्सनं त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
मात्र या सार्यातून नेयमार तावूनसुलाखून निघत जगभरात फुटबॉलपटू म्हणून झळकला. काही बड्या युरोपिअन क्लबकडून तो खेळणार, त्यासाठी त्यानं कैक कोटी युरोपची डील केली, अशा बर्याच चर्चा होत्या. त्याच काळात नेयमार इंग्रजी शिकत होता त्यामुळे त्या चर्चा वाढल्या.
आजही नेयमारला इंग्रजी येत नाही, स्पॅनिशही तो तोडकंमोडकंच बोलतो. मात्र कुठल्याच गोष्टी त्याच्या यशातल्या अडसर ठरल्या नाहीत.
आजही ब्राझीलमधला सगळ्यात लोकप्रिय फुटबॉलपटू म्हणून त्याची ओळख आहे कारण तो उघडपणे ब्राझीलमधल्या रस्त्यावर उतरलेल्या मुलांचं सर्मथन करतो आहे. तो म्हणतो, ‘तरुण मुलांच्या मनात आक्रोश आहेच, या देशात विकासाचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न जर तारुण्य शांतपणे, हिंसा न करता मांडत असेल तर त्याचा विरोध सरकार का करतंय? फुटबॉल मोठा आहेच, पण त्याहून महत्त्वाचे आहेत इथल्या माणसांचे प्रश्न हे जगाला कळले पाहिजे.’
आपली इमेज पणाला लावत अशी सरकारविरोधी भूमिका घेणारा नेयमार म्हणूनच ब्राझीलियन्सना रिअल स्टार वाटतोय.