- प्रगती जाधव-पाटील
दुष्काळी भागातलं स्थळ आलं तर आधी त्याला प्राधान्य देईन, असं सांगणारी नगाबाई. मोठा भाऊ सैन्यात जाणार, मग घरी आईबापाकडं बघायला कोण नाय म्हणून मी गावातच राहीन, असं सांगणारा सुदर्शन. मळणी यंत्रात बोट सापडल्यामुळे सैन्यात जायला स्वतर् अनफिट असला तरीही इतरांना प्रेरणा देणारा हणमंत.हे भारीच पोरं रखरखत्या उन्हात भेटले. दुष्काळ.. कोरड.. कडाक्याचं ऊन.. कठीण परिस्थिती हे असले शब्द आम्हाला हरवू शकत नाहीत. निसर्गानं या मातीत जन्माला घातलंय आणि तितक्याच कणखरपणानं आम्हाला जगण्याचं बळपण दिलंय. आम्ही जे आहोत, जसे आहोत त्यात खुश आहोत.. लोकांची किव करणारी नजर आणि उपकार करण्याची भाषा आम्हाला बोचते. निसर्गाच्या कोपातून बाहेर पडण्यासाठी आम्ही परस्परांची मदत घेतोय. तेच आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. तुमच्यासाठी ही उन्हात रखरखणारी छावणी असेल; पण आम्ही या पसरलेल्या छावणीत जिवाची मुंबई करतोय. नो टेन्शनवाली..!असं हे पोरं बोलतात आणि आपण काय ऐकतोय यावर कानांचा विश्वासच बसत नाही.सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात 19 चारा छावण्या अस्तित्वात आहेत. यात साधारण तीस हजार जनावरे आणि 7 हजार नागरिक विविध ठिकाणांहून येऊन राहत आहेत. यात सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचाही यात समावेश आहे. जानेवारी महिन्यात सातार्यातील पहिली चारा छावणी 120 एकर क्षेत्रात म्हसवड येथे सुरू करण्यात आली. बस स्टॅण्ड परिसरात या विषयीची माहितीही देण्यात आली होती. ठिकठिकाणी मिळालेल्या माहितीचा प्रचार आणि प्रसार होऊन या छावणीत जनावरं आणि अनोळखी माणसं एकत्र येऊ लागली. आणि नात्यागोत्याची असल्यासारखी एकमेकांसह राहू लागली.गेल्या चार महिन्यांपासून आपल्या मावशीबरोबर छावणीत आलेल्या नगाबाई भिवाजी जिमल ही गावची पोरगी वयापेक्षा अधिक परिपक्व वाटली. लग्नानंतर नांदायला जायचं म्हटलं तर सुकाळ का दुष्काळ कोणता भाग निवडणार यावर म्हणते, ‘आमीच आमच्या भागाला नावं ठेवली तर आमच्या भावंडांची लग्न कशी व्हायची. दुष्काळी भागात नको म्हणून आमच्या घरात सुना कशा यायच्या? इतल्या पोरांना पोरी कोण देणार? आम्हीच आमचा भाग नाकारून नाय चालणार. आहो मोकळ्या वातावरणात रहायचं जे सुख आम्ही इथं घेतो ते मोठय़ा शहरात पर्यटनाच्या नावाखाली विकत घ्यावं लागतं. हा दोन-चार महिने जातात त्रासाचे; पण आयुष्य समदं सरळ पण नाय चालत ना?’नगाबाई छावणीत आल्यापासून इथं असणार्यांची गाडी शिकली, आता घरातून काही आणायचं असेल तर ती गाडीवर स्वतर् जाऊन आणते.***बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. त्याला खूप शिकायचं आहे. उन्हाळ्याच्या सुटीत त्याला कौशल्य व्यवसाय शिकायचं होतं; पण त्याची छावणीत डय़ूटी लागली आणि तो इथंच राहू लागला. आपल्या वयाच्या सवंगडय़ांबरोबर धम्माल मस्ती करणं, छावणीलगत असलेल्या मैदानावर व्यायाम करणं हे त्याचं काम. म्हणाला, हे पण कौशल्य शिक्षणच चाललंय की माझं! काही त्रागा नाही की चिडचिड नाही. ***
( प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)