तरुण शेतकर्याला भेटा ना कधीतरी!
By Admin | Updated: December 5, 2014 11:59 IST2014-12-05T11:59:02+5:302014-12-05T11:59:02+5:30
तरुण शेतकर्याला भेटा ना कधीतरी!

तरुण शेतकर्याला भेटा ना कधीतरी!
मी एक तरुण शेतकरी आहे. आता शेतकरी आहे असं वाचून कुणालाही वाटेल की, असेल कुणीतरी रिकामटेकडा, अशिक्षित तरुण. नोकरी मिळाली नाही म्हणून बसला असेल घरी! तर हे साफ खोटं. मला काही जमत नाही म्हणून मी शेती करतोय असं नाही, तर आपण शेतकरी व्हायचं, हेच आपलं करिअर असं ठरवून मी शेतकरी झालो. मी एम. ए. इंग्रजी आहे. ( म्हणजे मला इंग्रजी लिहिता-बोलता-वाचता येतं.)
अनेकांनी मला सांगितलं की, शेती सोडून दे, शहरात काहीतरी काम बघ. काही नाही तर जवळच्या एमआयडीसीत नोकरी कर. निदान दर महिन्याला पगार तरी मिळेल. शेती करणं आता परवडणारं नाही, शेतीत काहीच राम नाही. पण मी मात्र अशा लोकांना स्पष्टच सांगतो की, मला शेती परवडते आणि आवडतेही. कारण मी शेतीकडे पूर्णत: व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतो. आणि म्हणूनच दरमहा पगार घेणार्यांपेक्षा मी चार पैसे जास्तच कमावतो.
काहीजण असंही म्हणतात की, शेतीत फार कष्ट करावे लागतात. पण आज कष्ट कुठं करावे लागत नाहीत. योग्य नियोजन, हवामानाचा अंदाज घेऊन पीक पेरणी केली, आधुनिक साधनांचा वापर आणि स्वत: पुढाकार घेऊन काम केलं तर कंपनीत काम करणार्या कामगारापेक्षा मी कितीतरी जास्त कमवू शकतो.
मी दिवसाला जास्तीत जास्त शेतात सहा तास काम करतो, तेवढंही निगुतीचं काम पुरे होतं. म्हणजे माझ्याकडे वेळही आहे, मानसिक समाधानही. आणि थोडाबहुत पैसाही. मग शेतकरी असण्याचा अभिमान वाटणार नाही तर काय? मुळात कमीपणा वाटण्याचं कारणच काय?
मी या माझ्या व्यवसायात उत्तम प्रगती करत राहीन, असा मला विश्वासही वाटतो. त्यामुळे शेतकर्याला काही भवितव्य नाही, तरुणांना शेतीविषयी काही प्रेम नाही असं म्हणणार्यांना आजचा माझ्या सारखा तरुण शेतकरी माहितीच नाही!
- बाळासाहेब सदाशिव खोत
रणदिवेवाडी, कागल