meet Tejas shinde, indian rowing team | दुष्काळी गावचा तेजस रोइंग ऑलिम्पिक गाठायचं म्हणतो तेव्हा.
दुष्काळी गावचा तेजस रोइंग ऑलिम्पिक गाठायचं म्हणतो तेव्हा.

 - स्वप्निल शिंदे

सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका. पिण्याच्या पाण्याचे हाल, जनावरांचा चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरच. चार छावण्या उभारल्या की अनेक घरची तरणी पोरं तिथं गायीगुरांसह राहतात. पाण्याचे इतके दुर्भिक्ष तर पोहणे, नौकाविहार हे छंद कुणाला सुचणार. मात्र याच परिसरातल्या  राणंद गावच्या तेजस शिंदे या तरुणानं कोरिया येथे नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत चक्क ‘रोइंग’ या नौका क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
तेजस शिंदेच्या राणंद गावाला दुष्काळ चुकलेला नाही. त्यात घरात कुणी शिकलेलं नाही. त्याचे आईवडील शेतकरी. गावात प्राथमिक शाळा होती, तिथं तो शिकला. मग  माध्यमिक शिक्षण दहीवडी येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. गावातून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत तो दररोज एसटीने प्रवास करायचा. शालेय अभ्यासक्रमात तसा जेमतेमच असलेला तेजस खेळातही फार सहभागी होत नसे. मात्न त्याची उंची चांगली असल्याने तो क्रीडा क्षेत्नामध्ये काहीतरी करू शकतो, असं गावातल्या सैन्य दलात काम करणार्‍या अनिल शिंदे यांना वाटलं. त्यांनी तसं ते तेजसच्या वडिलांना सांगितले. त्यांनी केंद्रीय क्रीडा विभागाच्या बॉइज क्रीडा स्पोर्ट्स कंपनी स्कूल, आर्मी अ‍ॅण्ड साई प्रोजेक्ट या परीक्षेबद्दल माहिती दिली. पण तेजसला या परीक्षेची सविस्तर माहिती नसल्यानं नेमकं काय केलं पाहिजे हे समजलं नाही. त्याने 2006 मध्ये मेडिकल व फिटनेस चाचणी दिली; पण त्यात तो अपयशी ठरला.
नंतर त्यानं पुन्हा जोमाने व्यायाम, योगाभ्यास, पळण्याचा सरावर सुरू केला. पुढच्या वर्षी झालेल्या चाचणीत उत्तीर्ण झाला. इयत्ता नववीत शिकत असताना जानेवारी 2004 मध्ये तो अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर बॉइज स्पोर्ट्स कंपनीचे प्रशिक्षक सुनील काकडे यांनी तेजसला रोइंग या क्रीडा प्रकारात लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी नौका क्रीडा प्रकारात खेळण्याचा निर्णय घेतला. पण तेजस यापूर्वी कधीच नौकेत बसला नव्हता. त्याला पोहता येत असल्याने भीती नव्हती; पण थोडे कुतूहल आणि उत्सुकता होती. 
हळूहळू या क्रीडा प्रकारातील बारकावे शिकत त्याने राज्य, विभाग आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही ठिकाणी अपयश आले; पण त्यानं सराव कायम ठेवला. 2011मध्ये झालेल्या आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्यानंतर त्याला भारतीय सैन्य दलात नोकरी मिळाली. सध्या तो हवालदार या पदावर काम करीत असून, तो नौकानयन प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने देशांतर्गत स्पर्धामध्ये आठ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्यपदके मिळवली आहेत, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये 2011 व 2012 मध्ये आशियाई ज्युनिअर रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अनुक्रमे रौप्य, सुवर्ण आणि 2016 यूएस क्लब नॅशनल रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळवले आहे. याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याला शिवछत्नपती क्र ीडा पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. 
त्याने आशियाई चॅम्पियनमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तो सध्या ज्या लाइट वेट क्र ॉक्सलेस मेन फोर प्रकारात खेळत आहे, तो प्रकार ऑलिम्पिक स्पर्धेमधून काढण्यात आला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तो आता लाइट वेट मेन्स डबल स्कल या इव्हेंटवर तो सराव करीत आहेत. मार्च 2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक पात्नता चाचणीत यश मिळवायचं हेच आता त्याचं पुढचं लक्ष्य आहे.


(स्वप्निल सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)

 

Web Title: meet Tejas shinde, indian rowing team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.