meet Tapasi pannu in Lokmat deepotsav 2019 | तापसी पन्नू का म्हणते, चान्स मिला, तो छोडना नहीं!
तापसी पन्नू का म्हणते, चान्स मिला, तो छोडना नहीं!

ठळक मुद्देआसान तो नही होनेवाला! स्ट्रगल तो होगी. हर किसी की होती है! 

-तापसी पन्नू

साउथच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमावून मी मुंबईत आले ती ‘बाहेरून’! मला कुणी गॉडफादर नव्हता. कुणा एकाचा सल्ला ऐकावा, असं विश्वासाचं माणूस नव्हतं. इंडस्ट्रीत मित्र नव्हते. ‘ओळखी’ महत्त्वाच्या, ‘रेकमेण्डेशन्स’ महत्त्वाची; माझ्याकडे यातलं काहीही नव्हतं. त्यात माझं तोंड फाटकं. फटकळ. माझ्याही नकळत लोक दुखावले गेले. काही चांगले प्रोजेक्ट्स हाती लागता लागता निसटले. खूप चुका केल्या या काळात. घोडचुका.
त्यात बॉलिवूडमध्ये येऊ इच्छिणार्‍या नव्या मुलींकडे जे असावं लागतं, ते माझ्याकडे नव्हतं. इथल्या परिमाणांप्रमाणे मी सुंदर नाही. तो जो एक ‘एक्स फॅक्टर’ लागतो हिरॉईनच्या शरीरात तो माझ्याकडे नाही. मी आपली सरळसोट सरदारनी. नाजूकपणा नाही. व्हल्नरेबल दिसत नाही. या सगळ्यावरून लोकांनी खूप नाकं मुरडली सुरुवातीला.  रडकुंडीला येईतो धडपड केली; पण कुणी मला भीक घातली नाही. 
पण तिरकी आहे ना थोडी मी! तिरकाच विचार करावा आपण; असं ठरवलं आणि जिथे आपल्याला कुणी विचारत नाही त्या जगात पाय ठेवण्याची धडपडच बंद करण्याचा निर्णय घेतला. निर्णय ‘घेतला’ असं म्हणणं थोडं आगाऊपणाचं होईल, कारण त्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता माझ्याकडे.
दिशा बदलली, रस्ता बदलला. माझं सुदैव असं की माझ्यासारखा तिरका विचार करणारे आणखीही लोक यायला लागले होते इंडस्ट्रीत. त्यांनी आपापली धडपड सुरू केली होती. रोमान्स, ड्रामा आणि अ‍ॅक्शन यांच्या रंगीबेरंगी दुनियेच्या पोटातल्या काळ्याकरडय़ा विषयांना हात घालण्याची धडपड सुरू झाली होती. मी या जगाकडे ओढली गेले आणि हलकेहलके मला माझी लय सापडली. 
10 मिनिटांचा होता फक्त  ‘बेबी’तला रोल. फक्त 10 मिनिटं. सगळे म्हणत होते, अक्षय कुमार असताना या सिनेमात तुला 10 मिनिटांत कोण नोटीस करणार?
मी म्हटलं 10 मिनिटं तर 10 मिनिटं! मध्यमवर्गीय माणसासाठी संधी पुनर्‍ पुन्हा येत नाही, चान्स मिला तो छोडना नहीं, हे मला पक्कं माहिती होतं.! त्या 10 मिनिटांनी गोष्टी बदलायला लागल्या आणि मला शबाना भेटली. ‘नाम शबाना’ हा सिनेमा एरव्ही मला कसा मिळाला असता?
‘नाम शबाना’नंतरची माझी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. गोष्ट म्हणजे, मी केलेले सिनेमे, त्यांना मिळालेलं यश, त्यातून बनत गेलेली माझी इमेज हे सगळं तुमच्या साक्षीनंच तर झालं आहे. 
त्या गोष्टीमागची गोष्ट नाही माहिती तुम्हाला, ती सांगते.
एक म्हणजे माझ्या या छोटय़ा प्रवासानं मला फटके दिले आणि भानावर आणलं. मी परफेक्ट नाही, मी माणूस आहे आणि माझ्या हातून चुका होतात; हे मान्य करण्याचा मोकळेपणा मला शिकवला. ‘मी सुंदर नाही’ हे मान्य करण्यानं किती हायसं, मोकळं वाटतं; हे मला पहिल्यांदा कळलं. तिथं माझा मूर्ख झगडा संपला. उलट मी सुंदर नसून चारचौघींसारखी दिसते हीच माझी ‘स्ट्रेंग्थ’ बनू शकते हे लवकरच मला कळलं. आणि मी या ‘स्ट्रेंग्थ’चा वापर करायलाही शिकले.
मी मुंबईत आले, तेव्हा माझ्याकडे  ‘ओळखी’ नव्हत्या. ही इंडस्ट्री कशी चालते, हे माहिती नव्हतं. अशा एकटय़ादुकटय़ा माणसांशी फार क्रूरपणे वागतं हे जग. एकतर संधी नाही. ती मिळाली तर अपयशाला माफी नाही. एकदा अपयशाचा शिक्का लागला की करिअर्स संपतात इथं. फार रडले सुरुवातीला. जोरात ओरडावं, किंचाळावं असेही प्रसंग आले. ‘का आलो आपण इथे?’- असा प्रश्न पडून हतबल, असाहाय्य वाटलं. मग विचार केला, हे असं सगळं असणार याचा अंदाज असूनही आपणच आलो ना इथं? मग असं कुढत राहून काय होणार? जे आहे ते आहे. त्याच्या भोवतीनंच आपण आपली काहीतरी स्ट्रॅटेजी आखली पाहिजे.. नाहीतर नुसतं रडून-भांडून कोण विचारणार आपल्याला?
बॉलिवूडमध्ये भाईभतिजेगिरी आहे, ती असणार.. ज्यांच्याकडे विशिष्ट आडनावं आहेत त्यांना काम मिळणार.. जे अमुकतमुक कॅम्पमधले आहेत. त्यांचा आधी विचार होणार हे सत्य आहे. त्याच्याशी लढत बसणं, त्यावरून कुढत बसणं हे वार्‍याशी भांडायला जाण्यासारखं आहे, ही अक्कल मला थोडी उशिरा आली; पण आली! आणि हेही कळलं की, या ‘नेपोटिझम’च्या विशिष्ट वर्तुळापलीकडेही इंडस्ट्री आहे. तिथं मला जागा असू शकते. तिथं मला प्राधान्य मिळू शकतं.
- आणि अक्कल आल्यावर तसा अनुभवही आलाच!
या इंडस्ट्रीनं खूप शिकवलंय मला.
मुख्य म्हणजे माझ्या आत खदखदणार्‍या रागाला नीट वळण देण्याचे तरीके शिकवले हळूहळू! हा व्यवसाय मी स्वखुशीनं निवडला आहे. या खेळाचे नियम वेगळे आहेत म्हणून रडत बसण्यात काय हशील आहे? त्यापेक्षा जे आहे त्यातून वाट काढण्याचा, आपल्यासाठी वाट नसेल, तर ती तयार करण्याचा मार्ग निवडावा, हे उत्तम!
- मी तेच तर करते आहे सध्या!
आणि या प्रवासात स्वतर्‍शी प्रामाणिक असणं, चुका कबूल करणं, एखादी गोष्ट येत/जमत नसेल, तर मुकाट ती शिकून घेणं हे बेस्ट! माझ्याबाबतीत हल्लीच मला एक चांगली गोष्ट लक्षात आलीये र्‍ आय नो दॅट आय डोण्ट नो! एकदा हे मान्य केलं, की सोपं होतं सगळं. आता माझ्या मनावर ताण नाही. मी हलका श्वास घेऊ शकते. हा हलका मोकळेपणा फार महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, व्यक्ती म्हणून आणि अ‍ॅक्टर म्हणूनही!
आसान तो नही होनेवाला! स्ट्रगल तो होगी. हर किसी की होती है! 
**

( ‘लोकमत दीपोत्सव’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या विस्तृत लेखातील संपादित अंश.)


 

Web Title: meet Tapasi pannu in Lokmat deepotsav 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.