बुद्धिबळाच्या पटावर नवी राणी ठरतेय झोपडपट्टीत राहणारी फिओना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:45 AM2019-11-21T07:45:00+5:302019-11-21T07:45:02+5:30

जेवायची मारामार, केवळ दोन वेळा फुकट जेवायला मिळेल म्हणून तिनं बुद्धिबळ शिकायचं ठरवलं आणि म्हणता म्हणता तिच्या जगण्याची चाल बदलली.

meet Phiona , a Ugandan chess player | बुद्धिबळाच्या पटावर नवी राणी ठरतेय झोपडपट्टीत राहणारी फिओना

बुद्धिबळाच्या पटावर नवी राणी ठरतेय झोपडपट्टीत राहणारी फिओना

Next
ठळक मुद्दे2016 साली तिच्यावर भारतीय वंशाच्या मीरा नायर यांनी एक चित्रपटही काढला, क्वीन ऑफ काटवे.

- शिल्पा दातार-जोशी

अत्यंत मागास देशातल्या एका गरीब वस्तीत राहणारी वडिलांविना पोर.
 पोटासाठी मका विकत वणवण भटकते, एकेदिवशी एका घराच्या फटीतून आत पाहते आणि तिला दिसतो बुद्धिबळाचा खेळ. हा खेळच पुढे तिला नवी ओळख देतो आणि तिची परिस्थितीही बदलवून टाकतो. छोटेखानी झोपडीवजा घरात राहणारी ती हक्काच्या पक्क्या घरात राहू लागते, आपल्या कुटुंबाला झोपडपट्टीतून बाहेर आणते,  देश-परदेशातील वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तिच्या मुलाखतीही घ्यायला येतात. तिच्यावर फिल्म तयार करायला काहीजण पूर्व आफ्रिकेतील युगांडा या मागास देशाची वाट पकडतात. 2012  साली तर ती एका पुस्तकाचा मोठा विषयही ठरली. 2016 साली तिच्यावर भारतीय वंशाच्या मीरा नायर यांनी एक चित्रपटही काढला, क्वीन ऑफ काटवे.
ही मुलगी कोण?
युगांडाची राजधानी कंपालामध्ये काटवे नावाची ही झोपडपट्टी. शहरातल्या आठ मोठय़ा झोपडपट्टय़ांपैकी ही एक. त्या गरीब वस्तीत छोटय़ा घरात तीन बहिणी व आईसह राहणारी ही फिओना. 1996 साली जन्म झालेल्या फिओनाचे वडील ती अवघी तीन वर्षांची असतानाच एचआयव्हीच्या संसर्गाने मृत्युमुखी पडले. वडिलांच्या पाठोपाठ तिची सर्वांत मोठी बहीण ज्युलियाचाही  आकस्मिक मृत्यू झाला. फिओनाच्या आईला तिच्या शाळेची फी व खर्च परवडत नसल्यानं वयाच्या नवव्या वर्षी तिला शाळा सोडावी लागली. जन्मापासून एकेक आघात सहन करणार्‍या या घराला अठरा विसे दारिद्रय़ म्हणजे काय ते वेगळं सांगायची गरज नव्हती. रोज पोटाची खळगी भरण्यासाठी तिला बाहेर पडावं लागायचं. खायला मिळणं मुश्कील, पोटासाठी वणवण. संघर्ष करून रोजचं अन्न मिळवणं ही जगण्यासाठीची गरज होती. त्यासाठी रस्त्यावरून वणवण फिरत ती मका विकत असे. त्यातलाच थोडा मका या कुटुंबाला खायलाही मिळत असे. तिला अक्षरशर्‍ दोन घासांसाठी झगडावं लागत असे. ती म्हणते, अनेक गोष्टी गमावलेली व्यक्ती जगण्यासाठी काहीही करते. 
एकेदिवशी भावाच्या मागून एकेठिकाणी गेल्यावर तिची बुद्धिबळ या खेळाशी ओळख झाली. फिओनाचा भाऊ बुद्धिबळ शिकायला जात असे. स्पोर्ट्स आउटरीच इन्स्टिटय़ूटने चालवलेला बुद्धिबळाचा वर्ग तिला दिसला. त्यानंतर तिनंही उत्सुकता म्हणून रॉबर्ट मुटेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे डावपेच शिकायला सुरु वात केली. तिनं बुद्धिबळ शिकण्यामागंही एक कारण होतं- तू बुद्धिबळ शिकायला आलीस तर तुला रोजचं जेवण मोफत मिळेल, असं तिला सांगण्यात आलं होतं. रोज जेवायला मिळणार ही अशा खरं तर मोठी होती. तिच्या आईला हे कळलं तेव्हा वाटलं, काय हे रिकामटेकडेपणाचे उद्योग. घरात उपासमारी होत असताना कुणी असं तासन्तास खेळत बसतं का? त्यापेक्षा काम केलं तर चार पैसे तरी मिळतील. 
रॉबर्ट हा पेशाने अभियंता होता, तो आवड म्हणून झोपडपट्टीतील मुलांना बुद्धिबळ शिकवायचा. त्याच्या मते, ‘फिओनाला वेळीच योग्य प्रशिक्षक मिळाला असता तर तिनं जागतिक पातळीवर आणखी मोठी झेप घेतली असती.
आश्चर्य म्हणजे जेवायला मिळतं म्हणून निवडलेला हा बुद्धिबळाचा खेळ तिनं इतक्या झटकन आत्मसात केला की तिला शिकवणारे प्रशिक्षकही चकित झाले. अल्पावधीतच तिनं स्थानिक विजेता सोडून या खेळात सर्वाना हरवलं. पटावरील सोंगटय़ा जणू तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या. काही लोकांना आपल्या कलागुणांना पुढं नेण्यासाठी फार झगडावं लागत नाही; पण काहींना मात्र फार संघर्ष करावा लागतो. रोजचं आयुष्यच संघर्ष असलेल्या लोकांसाठी तर ते कठीणच! बुद्धिबळासारखा खेळ भरल्या पोटी खेळणं, जिंकणं हे रिकाम्या पोटी खेळण्या-जिंकण्यापेक्षा वेगळं असतं. तिला आता पोटासाठी संघर्ष करावा लागत नव्हता तर जिंकण्यासाठी करावा लागत होता.
त्यानंतर बुद्धिबळाच्या खेळाच्या आधाराने ती पुन्हा शाळेत जाऊ लागली व तिनं 2010 साली शाळेची परीक्षाही दिली. त्यानंतर कंपालातल्या युनिव्हर्सल ज्युनिअर स्कूलमध्ये ती जाऊ लागली. तसंच नंतरचं शिक्षण तिनं सेंट मुगा व्होकेशनल स्कूलमधून पूर्ण केलं. किशोरवयात असताना तिनं खेळात इतकं  कौशल्य प्राप्त केलं की तिनं युगांडा देशाचं प्रतिनिधित्व करायला सुरु वात केली. बुद्धिबळ आता तिची गरिबी दूर करणार होतं, तिच्या उदरनिर्वाहाचा भाग झालं होतं. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षांपर्यंत तिनं अनेक स्पर्धा जिंकल्या. अनेक पारितोषिकं मिळवली. डोक्यावर छप्पर नसलेल्या आपल्या आई, बहीण व भावाला तिला छोटं का होईना पण सुरक्षित ठिकाणी आपल्या हक्काचं घर मिळवून द्यायचं होतं. तिच्या आयुष्यावर आधारित लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून तिला इतकं मानधन मिळालं की त्यातून तिनं तिच्या आईला घर बांधून दिलं. 
त्यानंतर तिनं 2017 साली अमेरिकेतील वॉशिंग्टनमधल्या नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती मिळवली. ही शिष्यवृत्ती तिला फक्त शिक्षणासाठी मिळाली होती, युगांडा ते अमेरिका हा प्रवास आणि तिथला राहण्याचा खर्च तिलाच करावा लागणार होता. त्यासाठी तिनं अनेकांकडे आर्थिक साहाय्य मागितलं, पैसे मिळवण्यासाठी ती ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ही झाली. बुद्धिबळातले डावपेच आखता आखता समाजशास्त्रात भरीव योगदान देण्याचा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. प्रगत देशात शिकण्याची संधी मिळाली आणि तिनं त्याचं सोनं केलं. एखादीनं आपला मागास देश, गरिबी याच्यापेक्षा प्रगत देशातलं वास्तव्य निवडलं असतं; पण फिओनानं तसं केलं नाही. यशाची हवा तिच्या डोक्यात गेली नाही. शिक्षण झाल्यानंतर ती घरी परत आली. युगांडातील झोपडपट्टय़ांमधील मुलांसाठी काम करायला सुरु वात केली. 
ती म्हणते, ‘गरिबीचे, शिक्षणाच्या अभावाचे चटके मीही सहन केलेत. कितीतरी मुलांमध्ये दडलेले गुण त्यांच्या परिस्थितीमुळे दिसत नाहीत. योग्य वेळी योग्य संधी न मिळाल्यास ही मुलं आयुष्यभर त्याच गरिबीत व अज्ञानात पिचतात. अशांसाठी मला काम करायचंय. तुम्हाला माहीत तरी आहे का, आयुष्य किती कठीण असतं ते.?’
खरंय तिचं, वयाची उणीपुरी 23 वर्षे तिची, पण जगण्याची लढाई मोठी आहे. 
तिनं रशियामध्ये झालेल्या 39 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी युगांडाचं नेतृत्व केलं. तिची थक्क करणारी खेळी पाहून जागतिक कीर्तीच्या स्तंभलेखकानंही तिची दखल घेतली होती. तिनं 2012 साली युगांडामधील ज्युनिअर विमेन्स चेस चॅम्पियनशिप तीन वेळा जिंकली. एकेक करत युगांडाच्या बुद्धिबळाच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन नेत्रदीपक कामगिरी करणारी फिओना ही पहिली महिला खेळाडू ठरली. त्यानंतर तिनं 41व्या आणि 42व्या ऑलिम्पियाड स्पर्धेतही युगांडाचं प्रतिनिधित्व केलं.  
फिओनाचं आता ग्रँडमास्टर होण्याचं स्वप्न आहे. अर्थात तिची वाट खडतर आहे; पण  इथवर आली तर पुढंही जात रहायचं असं मनाशी तिनं ठरवलं असेलच!


( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 

Web Title: meet Phiona , a Ugandan chess player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.