झोझिबिनी : कोण म्हणतं ती सुंदर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 04:23 PM2019-12-12T16:23:12+5:302019-12-12T16:26:36+5:30

‘ही’ जगतसुंदरी? मिस युनिव्हर्स? - असं कौतुकानं, आश्चर्यानं किंवा हेटाळणीनंही म्हणणारे काही कमी नाहीत. आफ्रिकन सौंदर्यवती मिस युनिव्हर्स ठरली याचा आनंदच आहे. मात्र अजून किती काळ तरुणींना हे रंगाचं अग्निदिव्य करतच राहावं लागणार आहे?

meet miss universe zozibini Tunzi & change your perception about beauty! | झोझिबिनी : कोण म्हणतं ती सुंदर नाही?

झोझिबिनी : कोण म्हणतं ती सुंदर नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देकोण म्हणतं, ती सुंदर नाही? आपण सुंदर नाही?

-शिल्पा दातार-जोशी

‘आपण तरुण मुलींनी शिकावीच अशी सर्वात महत्त्वाची गोष्ट आज  कोणती आहे?’
म्हटलं तर अत्यंत साधासा प्रश्न. सहज-सोपा. तसा घिसापिटाच; पण त्या प्रश्नाचं उत्तर मिस युनिव्हर्स किताबाच्या जवळ घेऊन जाणारं होतं.
मेक्सिको, कोलंबिया, पोर्तो रिको, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांतल्या ब्यूटी क्वीन्सनी पहिल्या पाचांत स्थान मिळविलं होतं. बाकीच्या चौघींनीही उत्तरं दिलीच. मात्र दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी मात्र अगदी सहज आणि नेमक्या शब्दांत म्हणाली, ‘तरुणींना नेतृत्वगुण शिकणं ही आजच्या काळातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं मला वाटतं. गेली कितीतरी वर्षे तरुण मुली आणि स्रिया त्यापासून लांब आहेत. याचा अर्थ तरुणींनाच नेतृत्वगुण नको होते असं नव्हतं तर समाजानं स्रियांना लावलेल्या विशिष्ट ‘लेबल’मुळे आमच्यात ही उणीव आहे असं वाटायला लागलं. मला वाटतं की तरुणी जगात शक्तिशाली  असून, आपल्याला सर्व प्रकारच्या संधी मिळायला हव्यात. त्यामुळे शिकायचंच असेल तर आजच्या तरुणींनी हे नेतृत्वगुण शिकायला हवेत. समाजात स्वतर्‍ची स्पेस निर्माण करण्यासारखं आणि त्यासाठी दृढनिश्चय करण्यासारखं महत्त्वाचं दुसरं काहीही नाही!’
झोझिबिनी टुंझी. मिस दक्षिण आफ्रिका. वय वर्षे 26. साध्यासोप्या प्रश्नाचं म्हटलं तर अत्यंत साधंसोपं मात्र वास्तववादी उत्तर तिनं दिलं आणि मिस युनिव्हर्स हा किताब मुकुट होऊन तिच्या डोक्यावर स्थिरावला. गोर्‍या-घार्‍या, सोनेरी केसांच्या, उंच मुलींच्या गर्दीत ही ‘डार्क’ रंगाची मुलगी जगतसुंदरी झाली याविषयी मग कौतुकंही तुम्ही भरपूर ऐकली असतील. मात्र त्या चर्चेपुरतीच झोझिबिनी मर्यादित नाही. लैंगिक अत्याचाराविरुद्ध तिनं सोशल मीडियात जबरदस्त कॅम्पेन उघडली होती. आपण जशा आहोत तशा सुंदर आहोत हे ती ठामपणे वारंवार सांगत राहिली. नेतृत्वगुण शिकण्यासह स्वतर्‍वर प्रेम करायलाही बायकांनी शिकावं हे ती वारंवार सांगत राहिली. कणखरपणा, स्वतर्‍ची स्पेस जपण्याइतका सेल्फ एस्टीम मुलींमध्ये हवाच हे तत्त्वज्ञान सांगणारी झोझिबिनी वर्णभेदाविरोधातही अप्रत्यक्षपणे आवाज उठवत असते.
आणि त्या सार्‍याच्या पोटात असतं तिचं शिक्षण आणि शिक्षणाचे तिच्यावर झालेले संस्कार. फिलिस्वानाडापू आणि  लुन्गीसा तुन्झी यांची ही लेक. तीन बहिणींपैकी मधली. तिची आई शाळेत मुख्याध्यापक, तर वडील शिक्षण अधिकारी. त्यामुळे शिक्षण महत्त्वाचं हे सूत्र त्याही पालकांनी मुलांसाठी मनापासून जगलं.  
पुढं जनसंपर्कातली पदवी, मॉडेलिंग, मग मिस दक्षिण आफ्रिका ते मिस युनिव्हर्स असा प्रवास तिनं केला. मिस दक्षिण आफ्रिका विजयानंतर तिला मोठय़ा रकमेसह एक नवीन कार आणि  जोहान्सबर्गजवळील सँडटोन इथं आलिशान घर मिळालं. 
आता ती न्यू यॉर्कच्या दिशेनं निघाली आहे.
तिची गोष्ट आजवरच्या जगतसुंदरींसारखीच होईल किंवा होणारही नाही कदाचित.
पण तिनं मिस युनिव्हर्स होणंच इतकं बोलकं आणि स्पष्ट आहे की अनेकांच्या नजरा बदलतील अशी किमान आशा तरी आहेच..

**********************

अ ब्लॅक गर्ल?


एव्हाना तुम्हीही तिचा फोटो पाहिलाच असेल आणि अजिबात कबूल करणार नसलात तरी ‘ही’ जगतसुंदरी?
 मिस युनिव्हर्स? 
- असं मनात सरावानं येऊनही गेलं असणार?
 काहींना टिंगल करावीशी वाटली असेल, की काय जमाना आलाय  आजकाल कुणालाही सुंदर म्हणतात. त्यांनी तशी ती सोशल मीडियात जाहीरपणे केलीही असेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर मिम्स तरी फिरवले असतील.
तसं पाहिलं तर आपल्याच काय, पण जगभरातल्या कुठल्याच देशात, कुठल्याच समाजात ही घटना किंवा ही मतं काही अपवाद नव्हेत.
झोझिबिनीचा चेहरा पाहिल्यावर अनेक मुलींनाही क्षणभर वाटलं असेलच ही जिंकली मिस युनिव्हर्स? कारण तसं वाटत असताना त्यांनी आपल्या रंगावरून, केसांवरून खाल्लेले टोमणे, तू सुंदर नाहीस हे मनात रुजवलं गेलं ती भावना आणि भांडणात ती ‘काळी’ किंवा ‘कालीकलूटी’ हे ऐकणं इतकं आम असतं की, त्यामुळे आपण सुंदर नाहीच असं अनेकींनाही वाटतं.
झोझिबिनीला शुभेच्छा देणार्‍या सोशल मीडियातही हेच चित्र दिसलं. 
अनेकांनी ही एक नवीन सुरुवात आहे म्हणून शुभेच्छा दिल्या. सौंदर्याला रंग नसतो असंही सांगितलं. काहींनी नाकं मुरडून हा जागतिक बाजारपेठेचा डाव आहे आणि आफ्रिकेत सौंदर्यप्रसाधनं विकायची ही खेळी आहे असंही म्हणत ताशेरे ओढले.
मात्र या सार्‍यात एक उल्लेख होता. 
‘अ ब्लॅक गर्ल!’
म्हणजे कौतुक करणार्‍यांनीही तेच शब्द वापरले आणि टवाळी करणार्‍यांनीही!
त्वचेच्या रंगापलीकडे सौंदर्य आहे नव्हे, प्रत्येक रंग सुंदरच असतो हे पूर्ण मान्य करेर्पयत अजून किती काळ जगाच्या पाठीवर जावा लागणार आहे?

***********************************

बिलिव्ह. पॉवर ऑफ ड्रिम्स!

‘मी अशा जगात वाढले, जिथं माझ्यासारख्या दिसणार्‍या बायका, माझ्यासारखी त्वचा, माझ्यासारखे केस यांना कुणी सुंदर म्हणत नाही.
. आता हा मिस युनिव्हर्सचा मुकुट माझ्या डोक्यावर पाहून तरी ‘हे’ म्हणजे सौंदर्य नाही असं म्हणणार्‍या नजरा घटकाभर जरी बदलल्या, तसे विचार ‘थांबले’ तरी मला पुरे आहे.
आज यानिमित्तानं एक दार उघडलं गेलं आहे. 
आज माझ्या चेहर्‍याकडे पाहताना कुणा मुलीला वाटलं की माझा रंग कसाही असो, माझी त्वचा, माझे केस वेगळे असो.
म्हणजे मी सुंदर नाही, असं नाही. 
मी सुंदर आहे.
ैआणि त्याहून मोठी एक शक्ती आहे माझ्याकडे, माझ्या स्वप्नांची शक्ती. ती स्वप्नं पूर्ण होतात असं वाटून, त्यांच्या स्वप्नांची, चेहर्‍यांची प्रतिबिंब जरी त्यांना माझ्या चेहर्‍यात आज दिसली तरी छान आहे हे जिंकणं.!
***
- झोझिबिनी टुंझीनं सोशल मीडियात लिहिलेली ही प्रतिक्रिया.
लहानशीच; पण ती बोलतेय. जगातल्या प्रत्येक मुलीशी. आपल्या रंगाविषयी मनात किंतू आणणार्‍या, आपलं सौंदर्यच इतरांनी नाकारलं म्हणून स्वतर्‍ला नाकारणार्‍या अनेक जणींशी. ती म्हणतेय, तसं पाहा, तिच्याकडे कोण म्हणतं, ती सुंदर नाही? आपण सुंदर नाही?



 ( शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)

 

Web Title: meet miss universe zozibini Tunzi & change your perception about beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.