Meet Jaydev Unadkatut, once a looser now a champion! | उनाड(कट) म्हणून ज्याची टवाळी झाली तो कसा झाला रणजी चॅम्पिअन?

उनाड(कट) म्हणून ज्याची टवाळी झाली तो कसा झाला रणजी चॅम्पिअन?

ठळक मुद्देअपयशानंतर यश कसं खेचून आणतात आणि किती मेहनत करतात याचं एक उदाहरण आहे, जयदेव उनाडकट!

अभिजित  पानसे

वर्ष 2018. त्यावर्षी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मोबदला मिळालेला ‘तो’ सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. तब्बल 11 कोटींहून जास्त किमतीची बोली राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर लावली; पण त्याच आयपीएलमध्ये त्यानं इतकी जेमतेम बॉलिंग केली, इतके रन्स वाटले की त्याही बाबतीत तो महागडा ठरला.  क्रिकेटशौकीन व नेटकर्‍यांनी त्याची यथेच्छ टवाळी केली. इतकी त्यानं हास्यास्पद कामगिरी केली. त्याच्यावर अनेक मिम्स तयार झाले. तेव्हापासून क्रिकेटशौकिनांसाठी, मिमर्ससाठी तो कायम गमतीचा विषय ठरला. मिमर्ससाठी तर तो कायमचा कंटेंट प्रोव्हायडर. दिंडा अकॅडमीचा कायम सदस्य म्हणून त्याची टर उडवली जाते.
पण दोन वर्षात चित्र बदललं. त्याला या वर्षीच्या रणजी मोसमात सौराष्ट्रचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आणि त्यानं त्या संधीचं सोन करत इतिहास घडवला. रणजी क्रिकेटच्या इतिहासात त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी जिंकली. सौराष्ट्रने रणजी जिंकणं ही ऐतिहासिक गोष्ट आहे. त्या संघाचा कप्तान म्हणजे तोच, सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट.
2019-20 च्या संपूर्ण रणजी मोसमात जयदेव उनाडकटचा खेळ अव्वल झाला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी त्याची कामगिरी व त्याचा अ‍ॅटिटय़ूड. डावखुरा मध्यम गती बॉलर असलेला जयदेव उनाडकटने या मोसमात  67 वीकेट्स घेतल्या. हा एक विक्र म ठरला.
या रणजी मोसमातील उपांत्य सामना खूप चित्तथरारक ठरला. गुजरात संघाला उपांत्य सामन्यात  हरवून सौराष्ट्रनं अंतिम सामना गाठला. भारतातील एक कंटाळवाणी खेळपट्टी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजकोटच्या खेळपट्टीवर गुजरात विरु द्ध  सौराष्ट्र रणजी सेमिफायनल सामना झाला. यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये 304 धावा केल्या व गुजरातला पहिल्या इनिंगमध्ये जयदेव उनाडकटने महत्त्वाच्या 3 वीकेट्स घेऊन 252 धावांत रोखलं. आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये सौराष्ट्रने 274 धावा केल्या. सामना सतत दोन्ही संघाकडे झुकत होता. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सेशनर्पयत सामना गेल्यावर पुन्हा एकदा कॅप्टन जयदेव उनाडकट संघासाठी धावून आला. गुजरात संघ विजयाकडे हळूहळू वाटचाल करत होता. तेव्हा जयदेव उनाडकटने केवळ 3.2 षट्कांत 4 बळी घेऊन सामना एकहाती फिरवून सौराष्ट्रला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. 
सौराष्ट्र अंतिम सामन्यात धडकला.  तसे गेल्या 4 वर्षात सौराष्ट्र 4 वेळा रणजी अंतिम सामन्यात पोहोचला; पण त्याला कायम अजिंक्यपदानं हुलकावणी दिली. 
यावेळी मात्र जयदेव उनाडकट फॉर्मात होता.
सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करत अर्पित वसावडाच्या महत्त्वपूर्ण शतकाच्या व न्यूझीलंड दौर्‍याहून पराभूत होऊन परतलेल्या चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या भरवशावर 425  धावा केल्या. पहिल्या इनिंगमध्ये सौराष्ट्रकडून धर्मेद्र जडेजाने 3 व कर्णधार जयदेव उनाडकटने 3 वीकेट्स घेऊन बंगालला 381 धावांत रोखलं. हे सामन्याचे तथापि संपूर्ण मोसमाचे अत्यंत नाजूक क्षण होते. कारण राजकोटसारख्या खेळपट्टीवर व रणजी 
क्रि केटच्या फॉरमॅटमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेणं अत्यंत गरजेचं असतं. बंगालचा संघ सौराष्ट्रवर आघाडी घेण्याच्या स्थितीत होतं. बंगालचा अनुष्टुप मुजूमदार 63 धावा काढून संघाला लयीत सौराष्ट्रच्या धावसंख्येकडे नेत होता; पण त्याला महत्त्वाच्या क्षणी जयदेव उनाडकटने एलबीडब्ल्यू बाद केलं. आणि त्यानंतर 2 बॉल्सनंतर बंगालच्या आकाशदीपला उनाडकटने  प्रसंगावधान राखून भन्नाट रन आउट केलं. 
सौराष्ट्रला अत्यंत महत्त्वाची व निर्णायक आघाडी मिळाली. 
शेवटी अंतिम सामना अनिर्णित झाला व नियमाप्रमाणे प्रथम डावातील आघाडीमुळे सौराष्ट्र विजेता ठरला. रणजी क्रि केटच्या इतिहासात प्रथमच सौराष्ट्रने आपल्या नव्या कर्णधाराच्या महत्त्वपूर्ण कामगिरीने रणजी ट्रॉफी उचलली. 
संपूर्ण रणजी मोसमात जेव्हा जेव्हा संघाला गरज होती कर्णधार जयदेव उनाडकट धावून आला. महत्त्वाच्या क्षणी वीकेट्स काढून सामना सौराष्ट्रच्या दिशेने फिरवला. जयदेवने या रणजी मोसमात 10  सामन्यांत 7 वेळा फिफर म्हणजे एका डावात 5  वीकेट्स घेतल्या, तर दोनदा सामन्यात 10 वीकेट्स घेतल्या. अशाप्रकारे एकूण 67 वीकेट्स या मध्यम गती डावखुर्‍या बॉलरने घेतल्या. एका रणजी मोसमात सगळ्यात जास्त वीकेट्स घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला. 
चेतेश्वर पुजाराने जयदेव उनाडकटचे कौतुक केलं, की तो भारतीय संघात पुन्हा जागा मिळवू शकतो. रणजी क्रिकेटमधील कामगिरीला अधिक महत्त्व द्यायला हवं.
‘समय हर किसिको शूरवीर बनने का एक अवसर देता हैं. वो क्षण यंही हैं.!’  बाहुबलीतील हा डायलॉग जयदेव उनाडकटसंदर्भात अगदी अचूक ठरतो. जेव्हा जेव्हा अपयश येतं तेव्हा तेव्हा रणजीत खेळून कमबॅक करणार्‍या खेळाडूंची परंपरा आपल्याकडे मोठी आहे. अस्सल चोख खेळ दाखवण्याची ही संधी असते. उनाडकटनेही हेच केलं. आजतागायत कायम हास्यास्पद ठरलेला, कायम आपल्या  स्लोवर वन कटर  बॉलवर भिस्त असलेला, आयपीएलमध्ये खोर्‍यानं धावा  वाटणार्‍या  उनाड जयदेवने कर्णधारपदाची जबाबदारी अंगावर घेतल्यावर जबाबदार बॉलिंग करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
अपयशानंतर यश कसं खेचून आणतात आणि किती मेहनत करतात याचं एक उदाहरण आहे, जयदेव उनाडकट! 

Web Title: Meet Jaydev Unadkatut, once a looser now a champion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.