नाचणार्या कार्यकर्त्यांना जेवण
By Admin | Updated: August 29, 2014 09:46 IST2014-08-29T09:46:23+5:302014-08-29T09:46:23+5:30
गणेशोत्सवात मिरवणुकीवर होणार्या वारेमाप खर्चाला फाटा देत दत्तनगरमधील अन्नदाता बाप्पा मंडळाने २१ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा अत्यंत जबाबदारीनं सांभाळली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणार्या कार्यकर्त्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालत त्यांची तब्येत सांभाळण्याचं काम हे मंडळ करतंय.

नाचणार्या कार्यकर्त्यांना जेवण
>अन्नदाता बाप्पा मंडळ, सोलापूर
खास उपक्रम :
गणेशोत्सवात मिरवणुकीवर होणार्या वारेमाप खर्चाला फाटा देत दत्तनगरमधील अन्नदाता बाप्पा मंडळाने २१ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा अत्यंत जबाबदारीनं सांभाळली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणार्या कार्यकर्त्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालत त्यांची तब्येत सांभाळण्याचं काम हे मंडळ करतंय.
१९९२ साली या मंडळाची स्थापना झाली. त्याचवर्षी या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, मिरवणुकीच्या दिवशी धावपळ करणार्या कार्यकर्त्यांना, लेझीम-झांज खेळणार्यांचे खायचे फार हाल होतात. धड प्यायला पाणी मिळत नाही. एखाद्या टपरीवर, उघड्यावर तळलेले भजीवडे खात, चहा पीत चालावे लागते. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना पोटदुखी होते, पचन बिघडतं. दुसर्या दिवशी डॉक्टरांकडे त्यांची गर्दी वाढते. दहा दिवस धावपळ करणार्या कार्यकर्त्यांना गणपती गेला की असा त्रास सहन करावा लागतो. हे सारं पाहून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की, आपणच अन्नदान करायचं. मिरवणुकीतल्या कार्यकर्त्यांना खाऊपिऊ घालायचं. सुरुवातीची दोन वर्षे त्यांना फार यश लाभलं नाही. पण त्यानंतर मात्र दरवर्षी ते रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे २ वाजेपर्यंत लोकांना आनंदानं खाऊपिऊ घालतात.
या उपक्रमाला बळ मिळावं म्हणून त्यांनी केवळ वर्गणीवर भर न देता छोटे-मोठे उद्योजक, व्यापारी आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही धान्य वर्गणी म्हणून देण्याचं साकडं घातलं. कुणी किलोभर धान्य दिलं तरी ते घेतात. एरव्ही वर्गणीसाठी स्पर्धा करुन सगळा खर्च डॉल्बीवर करणार्या मंडळांच्या गर्दीत हे लोकांना जेऊ घालणारं मंडळ वेगळं दिसतं. दरवर्षी पाच हजार लोक या मंडळातर्फे चालवल्या जाणार्या उपक्रमात जेवतात. ऐनवेळेस धान्य किंवा पैसे कमी पडले तर मंडळाचे ४0-५0 सभासद स्वत: पैसे जमवून उपक्रम सुरूच ठेवतात. मंडळाचे खजिनदार प्रकाश गाजूल सांगतात, स्वच्छ-शुद्ध पिण्याचं पाणी कार्यकर्त्यांंना मिळणं हे आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट. तब्येत सांभाळणं हे ध्येय समोर ठेवून आम्ही करतोय.
- काशीनाथ वाघमारे