मॅचो, स्वतंत्र, सुधारणावादी, समानतावादी तरुणांची (आधुनिक) गोची.
By Admin | Updated: September 10, 2015 21:41 IST2015-09-10T21:41:57+5:302015-09-10T21:41:57+5:30
पण ‘तिच्या’ रिअॅक्शन भलत्याच! अशी एकाच घटनेची वेगवेगळी रिअॅक्शन पाहून त्याच्या दिमागचं दही होणं अपरिहार्य असतं. त्याला कळतच नाही की मागच्या वेळी असं घडलं तेव्हा ती भलतंच बोलली, आता भलतंच बोलतेय! ही काय भानगड आहे!

मॅचो, स्वतंत्र, सुधारणावादी, समानतावादी तरुणांची (आधुनिक) गोची.
- अनघा पाठक
प्रसंग एक -- ती : रसिकाचा बॉयफ्रेंड बघितलास? कसला श्ॉबी आहे? ना कपडे घालण्याचा सेन्स, चेहरा पाहिला तर घामेजलेला अन् काळपट, केस तर जंगल्यासारखेच होते. यक! एखादा चांगला श्ॉम्पू कंडिशनर वापरायचा ना त्याने. अॅण्ड ही शुड गेट अ फेशिअल मॅन.
तो : आय नो. पण त्याला सवय नाहीये ह्या सगळ्याची. गावाकडचा आहे तो. मुलांनी पण चांगलं दिसलं पाहिजे. सॅलोनमधे जाऊन ब्यूटी ट्रिटमेंट घेतल्या पाहिजेत हे त्याच्या गावीही नसेल.
ती : सो व्हॉट? गावाकडचा असो की अजून कुठला, मुलांनी त्यांचे लूक मेण्टेन केलेच पाहिजेत. तू बघ बरं कसा डिसेण्ट आहेस. तुला माहितेय कुठला फ्रॅगनन्स वापरायचा, कुठलं फेशियल करायचं, कोणत्या वेळेस कुठला लूक कॅरी करायचा आणि म्हणूनच तू मला खूप आवडतोस.
तो : (थोडासा लाजत) थँक्यू!
***
तीच दोघं.. काही दिवसांनंतर
तो : अग ए! कुठे चाललीस रागारागात एवढी.
ती : हे बघ, आता माझं डोकं फिरवू नको. जेवढा केलास तेवढा तमाशा पुरे.
तो : पण मी काय केलं?
ती : तुझं आणि रसिकाचं काय सुरू होतं आता कॉस्मेटिक सेक्शनमधे?
तो : काय चाललं होतं? तिला चांगलं कंडिशनर हवं होतं आणि मी सजेस्ट करत होतो. हे चांगलं आहे, यानं केस कसे सिल्की होतात, माङो झालेत, एवढंच सांगत होतो.
ती : हेच ! हेच ! केस सिल्की, गाल गुलाबी, होठ शराबी, आंखे नशिली.. हे असलं सगळं ना मुलींनाच शोभतं. निदान आपण आपला जेण्डर ‘मेल’ लिहितो हे तरी विसरू नकोस. तुङयापेक्षा रसिकाचा बॉयफ्रेंड परवडला. गबाळा, गावंढळ असला तरी मॅचो वाटतो तो.
प्रसंग दोन
ती : चल ना, आज मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊ.
तो : (खिसा चाचपत) कुठे?
ती : ते मेडिटेरेनिअन फुलच नवीन रेस्टॉरण्ट सुरू झालंय ना तिथे जाऊ.
तो : अगं पण ते थोडं महाग आहे. माङयाकडे तेवढी कॅश नसेल.
ती : मी म्हटलं का तुला पैशाविषयी काही? वेडाच आहेस. आपण रिलेशनशिपमधे आहोत ह्याचा अर्थ प्रत्येक वेळेस तूच खर्च केला पाहिजे असं नाही. आय अॅम इण्डिपेडण्ट. माझा एवढंच काय तुझाही खर्च मी करू शकते. त्यात काही वावगं वाटत नाही मला!
तो : थँक्यू !
***
काही दिवसांनंतर.. रिटेक
तो : चल फिरायला जाऊ आज त्या नव्या फ्रेंच रेस्टॉरण्टमधे.
ती : तिथले रेट माहिती आहेत का? कालच म्हणालास ना सध्या तंगी आहे म्हणून.
तो : सो व्हॉट? आज माझा मूड आहे आणि बिल भरायला तू आहेस की!
ती : हॅलो! मीच बिल भरायचं तर तुझा काय उपयोग? तुङया माहितीसाठी सांगते, पैसे मुलांनी खर्च करायचे असतात, मुलंच करतात नेहमी, ओके?
प्रसंग तीन
तो : काल दुपारपासून कुठे गायब होतीस? पन्नास फोन केले तुला मी.
ती : रागावला आहेस? सो सॉरी ना पिल्लू! काल ना प्रियाच्या घरी नाईट आऊटला गेले होते. आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो होतो आणि त्यात फोन स्वीच ऑफ झाला.
तो : मग मला सांगता नाही येत तुला? मी सोडलं असतं ना प्रियाकडे तुला. घ्यायलाही आलो असतो. किती वेळा सांगितलंय तुला की तू कुठे जातेस, कुठे असतेस सगळं मला माहीत असलं पाहिजे म्हणून. फुकट स्वत:चाही त्रस वाढवतेस अन् माझाही.
ती : औ.. कोणीतरी खूप पङोसिव्ह होतंय वाटतं? सो स्वीट.. तू माझी अशी एक्स्ट्रा काळजी घेतोस ना तेव्हा मला खूप आवडतं. प्रॉमिस कर, तू कायम माझी अशीच काळजी घेशील..
***
पुनश्च प्रसारण
ती : बारा मिसकॉल्स? वेड लागलंय का तुला? पहिल्या फोनमधे कळत नाही मी बिझी आहे, नाही उचलू शकत कॉल आता, मग काय चावलं तुला?
तो : काही चावलं नाही, जाम टेन्शनमधे होतो मी दुपारपासून! पत्ता नाही तुझा. कुठे आहेस, काय करतेस. मी नाही विचारणार तर कोण विचारणार? तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार?
ती : माझी काळजी घ्यायला मी स्वत: समर्थ आहे. सारखे शंभर प्रश्न विचारत जाऊ नको. लहान नाहीये मी की तू सारखं माङया पाठीमागे लागावं. मला सफोकेट होतं..
हे तिन्ही प्रसंग वाचलेत.
विषय एकच, घटनाक्रम साधारण सारखाच.
पण ‘तिच्या’ रिअॅक्शन भलत्याच! अशी एकाच घटनेची वेगवेगळी रिअॅक्शन पाहून त्याच्या दिमागचं दही होणं अपरिहार्य असतं. त्याला कळतच नाही की मागच्या वेळी असं घडलं तेव्हा ती भलतंच बोलली, आता भलतंच बोलतेय! ही काय भानगड आहे!
असे पार बुचकळ्यात पडलेले, गोंधळलेले, बिच्चारे कन्फ्यूज झालेले जरा बारकाईने बघितलं तर आपल्या आसपास बरेच दिसतील! आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही चौकटीच्या मधेच कुठेतरी अडकलेले, कसंही वागलं तरी सगळ्याच बाजूनं थपडा खाणारे असे कितीतरी तरुण आपल्या अवतीभोवती आहेत.
आजच्या जगात ‘मुलगा’ म्हणून जगणं त्यांच्यासाठीही सोपं उरलेलं नाही!
पूर्वी एक बरं होतं मुलांनी काय करावं, कसं वागावं हे ठरलेले होतं. त्या ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन कुणी वागावं अशी अपेक्षाही नव्हती आणि ठरल्या चौकटी मोडायची कुणाची टापही नव्हती. मुलांनी त्यांचं पुरुषत्व सिद्ध करावं, स्वत:चं घोडं पुढे दामटावं, ङोपत नसतानाही अनेक जबाबदा:या डोक्यावर घेऊन ठेवाव्यात. सगळं कसं रीतसर!
मग मधेच कुठेतरी माशी शिंकली. फेमिनिझम अर्थात स्त्रीमुक्ती आणि त्याही पुढं जाऊन स्त्री-पुरुष समानतेचं एक नवं वारं आलं. जिथं तिथं मुली समान हक्क मागत भेटू लागल्या. त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागलं. त्यातून तरुण मुलांच्याही सामाजिक आयुष्यात बदल व्हायला लागला. शाळा, कॉलेज, नोकरी ह्या प्रत्येक टप्प्यावर मुली भेटायला लागल्या. समानतेची, समान हक्काची भाषा करायला लागल्या. लढाईच होती ती. मग काही वर्षे त्या लढाईत मुलींशी भांडण्यात गेली. स्त्रियांना मागे ओढण्यात, त्यांना कमी लेखण्यात आणि त्या पुरुषांची बरोबरी कशी करू शकत नाहीत हे सिद्ध करण्यात काही काळ गेला. (अर्थात, महिलांना मदत करणारे सन्माननीय अपवाद तेव्हाही होतेच.) जगभरात, भारतातही विशेषत: शहरांत स्त्रियांचं पुरुषांच्या बरोबरीत वावरणं, वागणं, काम करणं हळूहळू स्वीकारलं गेलं. सगळेच हक्क मान्य झाले असं नाही; पण निदान आता मुलींचं अस्तित्व नाकारता येणार नाही, हे तरी तरुणांनी स्वीकारलंच. त्यातून जशी आधुनिक स्त्रियांची व्याख्या तयार झाली तसंच आधुनिक पुरुषांची प्रतिमा तयार झाली.
‘मेट्रोसेक्शुअल मॅन’ असं त्या प्रतिमेचं साजेसं बारसंही झालं. पण आता ह्याच मेट्रोसेक्शुअल मॅनची भलतीच गोची झालीये.
स्त्रिया बदलल्या तशा त्यांच्या पुरुषांकडून असणा:या अपेक्षाही बदलल्या. दुर्दैवाने या अपेक्षा नुस्त्या बदलल्याच नाहीत, तर दुप्पट झाल्या. म्हणजे एका बाजूला पुरुषांनी परंपरेने त्यांच्यावर लादलेल्या जबाबदा:याही पार पाडायच्या आणि दुस:या बाजूला आधुनिकीकरणामुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे स्त्रियांच्या वाढलेल्या अपेक्षाही पूर्ण करायच्या. उदाहरणार्थ, पूर्वी गाडी नेहमी पुरुषांनी चालवायची असा एक संकेत होता. फार पूर्वी स्त्रियांची इच्छा असली तरी त्यांना गाडी चालवायची मुभा नसे. इतकं असूनही एखादीने गाडी चालवलीच तर ती चेष्टेचा विषय बने. आता गाडी चालवणं स्त्रियांच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचा, इंडिपेण्डण्ट असण्याचा भाग आहे.
तरी आजचं चित्र काय सांगतं? स्वत:ची इच्छा असेल तर मुलगी गाडी चालवणार, नाहीतर ‘तो’ सोबत असेल तर गाडी ‘त्यानेच’ चालवायची. (त्याची इच्छा असो वा नसो.)
स्त्री स्वातंत्र्याला पूरक अशा अपेक्षा पूर्ण करताना पारंपरिक अपेक्षांनी आजही मुलांचा पिच्छा सोडलेला नाही. मग ती रेस्टॉरंटची बिलं देण्याइतकी साधी गोष्ट असो, गर्लफ्रें डवर पैसे खर्च करणं असो, किंवा स्वत:चं घर घेणं, गाडी घेणं, कुटुंब चालवणं इथर्पयत सगळंच त्याच्या वाटय़ाला कम्पलसरी येतं. लग्नाच्या बाजारात तर अजूनच गंमत. मुलीच्या घरच्यांना पारंपरिक अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा हवा असतो, पण मुलींना मात्र आधुनिक विचारांचा जोडीदार निवडायचा असतो. ह्या दोन्हीपैकी एकाही बाजूच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलं कमी पडली की त्यांचा कपाळमोक्ष ठरलेलाच.
या सा:यात अजून एक मोठी गोम आहे. गरज असेल तेव्हा मुलांनी मुलींना सपोर्ट द्यायचा, पण त्यांच्यावर विसंबून राहायचं नाही, म्हणजे त्यांच्याकडे सपोर्टही मागायचा नाही किंवा आपण आधार देतोय तुला असं म्हणायचंही नाही. तसं फिलिंगही द्यायचं नाही. पण तो आधुनिक विचारांचा असेल तर त्यानं तिला सपोर्ट करणं तर मस्ट आहे. पण म्हणजे नेमकं कधी नी काय करायचं हेच त्याला कळत नाही. अशी काहीशी विचित्र गुंतागुंत सध्याची मुलं अनुभवत आहेत.
आपल्या नव:याने किंवा प्रियकराने आपले लाड करावेत, आपल्यावर भरपूर पैसे खर्च करावेत, आपली काळजी करावी, आपली मदत करावी आणि आपण जरा वेळ दिसेनासे झालो की कासावीस व्हावं अशी मुलींची अपेक्षा असते. पण जरा कुठे या अपेक्षा त्यानं पूर्ण करायला घेतल्या तर आपल्या आयुष्यातल्या पुरुषांनी आपल्याला स्पेस द्यावी, पङोसिव्ह असू नये, व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू नये असंही याच मुली ठणकावून सांगतात. म्हणजे टेक केअर करायचं की नाही, कसं करायचं, किती प्रमाण, केव्हा हे सारे नियम मुलीच ठरवतात. कधी त्यांना एकदम रफ अॅण्ड टफ, ‘मर्द को दर्द नहीं होता’ असा आविर्भाव असणारा कुणी तो हवा असतो, तर पुढच्याच मिण्टाला आपल्या भावनांनी न्याय देणारा ‘सेन्सेटिव्ह’, हळवा, भावुक, चांदणं पाहणारा, कविता करणाराही कुणी हवा असतो.
असं कॉम्बिनेशन स्वत:त मुरवणं अनेक तरुणांना अशक्य तर वाटतंच, पण आपण कधी काय नी कसं वागावं याची टोटलच न लागल्यानं ‘तिच्या’साठी काहीही आणि कितीही केलं तरी सतत भांडणं, मनस्ताप आणि घोळच त्याच्या वाटय़ाला येतो.
‘मै कही का ना रहा’ अशीच अवस्था मग अनेक मुलांची होते.
त्यांना हेच कळत नाही की, या मुली समान हक्क मागणा:या, स्वतंत्र, खमक्या, इडिपेंडण्ट कधी असतात? कधी या मुली एकदम हळव्या, टिपिकल बायकी रूपात पुन्हा प्रवेश करतात?.
- हेच प्रश्न घेऊन सध्याची अनेक तरुण मुलं एक फॉम्यरुला शोधायचा प्रयत्न करताहेत.
थोडंसं सेन्सेटिव्ह, थोडंसं मॅचो, जरासं केअरिंग आणि चिमूटभर सपोर्टिव्ह असं कॉकटेल त्यांना करावं लागणार आहे.
पण ते कसं जमावं?
मग त्यांनाही सांगावंच लागणार, पूर्वीच्याच टिपिकल भाषेत. ‘बाबा, वाटेवरती काचा रे. जप..!’
कन्फ्यूज असणं चांगलंच
आधुनिक पुरुषांच्या बदलत्या जडणघडणीचा आणि त्यांच्या गोंधळलेल्या मनस्थितीचा अभ्यास करणा:या निक क्लेमंट ह्या पाश्चात्त्य लेखकाच्या मते आजकालच्या पुरुषांची कन्फ्यूज मनस्थिती ही त्यांच्या प्रगतीचं लक्षण आहे. अशा प्रकारच्या कन्फ्यूजनमधूनच नवीन बदल घडून येतात. येणारी प्रत्येक पिढी ही जुन्या पिढीची पुरुषत्वाची व्याख्या टाकून देऊन स्वत:ची नवी व्याख्या घडवत आहे. दुर्दैवाने नव्या पिढीच्या मुलांना त्यांच्या जुन्या माणसांकडून ना आधार मिळत ना मार्गदर्शन. कारण आधीच्या पिढीचे पुरुष आणि त्यांचं वास्तव आणि आजच्या पिढीचे पुरुष आणि त्यांचं वास्तव पूर्णपणो वेगळं आहे.
मॅनक्रिमिनेटचं नवं भूत
काही दिवसांपूर्वी एका भारतीय ऑनलाइन मॅगङिानने ‘डोण्ट मॅनक्रिमिनेट’ ही कॅ म्पेन लॉँच केली. मुलगा आहे म्हणून सहन कराव्या लागणा:या अन्यायाचा पाढाच ह्या कॅम्पेनमध्ये वाचला होता. मुलींना क्लबमध्ये फ्री एण्ट्री मिळते आणि मुलांना मात्र पैसे मोजावे लागतात. मुलांना मुलींसाठी दार उघडावे लागते किंवा सगळी सहानुभूती मुलींनाच मिळते अशा प्रकारच्या (हास्यास्पद) भेदभावांची जंत्री ह्या ऑनलाइन मॅगझीनने सादर केली. ह्या कॅम्पेनवर नेटिझन्सनी सणकून टीका केली. आता ह्या कॅम्पेनची हवा थंडावली असली, तरी ह्या कॅम्पेनने मुलांच्या मनात बळावत असणारी असुरक्षिततेची भावनाच अधोरेखित केली गेली, हे नक्की!
(अनघा ‘लोकमत टाइम्स’ वृत्तपत्रत सहायक उपसंपादक आहे.)