मॅरेज मटेरिअल
By Admin | Updated: March 12, 2015 14:55 IST2015-03-12T14:55:27+5:302015-03-12T14:55:27+5:30
लग्न तर करायचंय; पण तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे; हे जगाला सांगायची डेअरिंग आहे का तुमच्यात?

मॅरेज मटेरिअल
इंधुजा पिल्लई.हे नाव ऐकल्यासारखं वाटतं तुम्हाला? आठवत नसेलच, पण गेला आठवडाभर हे नाव प्रचंड चर्चेत होतं. नव्या भाषेत सांगायचं तर ‘व्हायरल’ होतं, ऑनलाइन चर्चेचा तापला विषय होतं!
असं काय केलं या मुलीनं!
खरंतर काही नाही, ती २३ वर्षांची आहे.
इंजिनिअर आहे. मूळची तमिळ. सध्या बंगळुरूत राहते. या वयात मुलगी आली की पालक तिच्यासाठी स्थळं पाहू लागतात. तसंच इंधुजासाठी स्थळं पाहायचं म्हणू लागले.
पण असं ‘बघून-दाखवून’ लग्न इंधुजाला तसं फार झेपेना. त्यामुळं आपल्याला जसा मुलगा हवा तसा आपणच शोधावा म्हणून इंधुजानं एक आपली वेबसाइटच तयार केली.
त्याच्यावर स्वत:ची माहिती स्वच्छ शब्दांत लिहिली. आणि आपल्याला कसा मुलगा हवाय, कसा अजिबात नको हे स्पष्ट शब्दांत लिहिलं!
इतक्या स्पष्ट शब्दांत मुलीनं आपल्या अपेक्षा लिहिणं हे खरंतर आपल्या समाजाला झेपत नाही; झालंही तसंच! एकीकडे त्या वेबसाइटला भेट देऊन लग्नाचं प्रपोजल मांडणारे अनेकजण होते, दुसरीकडे प्रचंड चर्चा. तिच्या आगाऊपणापासून धाडसापर्यंतची आणि कौतुकापासून स्पष्टवक्तेपणाचीही!
विशेष म्हणजे, आपल्याला कसा मुलगा हवा हे तर तिनं स्पष्ट लिहिलं होतंच (ते हल्ली मॅचमेकिंग साईट्सवर अनेकजण लिहितात); पण मी स्वत: कशी आहे, मी काय करीन आणि काय नाही हेदेखील तिनं अत्यंत प्रांजळपणे लिहिलेलं आहे.
हे खरं तर बाकी सार्या चर्चेत अत्यंत वेगळं आहे.
कारण आपल्याला जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत याची न संपणारी यादी असते; पण आपण काय आहोत, लग्नानंतर काय तडजोडी करू, अजिबात करणार नाही हे अनेकांना माहितीही नसतं. स्व-ओळख तर अजिबात नसते!
इंधुजानं स्वत:विषयी फ्रॅन्कली लिहिण्याचंही धाडस केलं आहे.
म्हणूनही खरंतर तिचं प्रोफाईल हे अत्यंत चर्चेचा विषय झालं आहे.
(सोबतची तिच्या फोटोसह असलेली चौकट पहा, तिनं स्वत:विषयी माहिती देत,
जोडीदाराविषयी काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, ते सहज दिसेल.)
तिचं म्हणणं सगळ्यांना पटेलच असं नाही. तिनं व्यक्त केलेली मतं टोकाची वाटतील, अनेकांना रुचणारही नाहीत किंवा खूप जणांना आवडतीलही, कौतुक वाटेल या मुलीच्या ‘स्वतंत्र’ असण्याचं!
पण आपला विषय तो नाही!
आपण करून पाहूया, एक एक्सरसाईज.
कॉपीच मारू म्हणा ना, इंधुजाची!
आणि विचार करून पाहू की, आपल्याला लग्न तर करायचंय, पण आपण स्वत:ला किती ओळखतो, आपली स्वत:बद्दल काय मतं आहेत, स्वत:विषयी खरं खरं इतरांना सांगण्याची तरी कुठं सवय असते आपल्याला?
ते जमतंय का?
आणि मोकळ्या, मोजक्या आणि स्वच्छ शब्दांत सांगता येतील का आपल्याला आपल्या अपेक्षा?
बघा प्रयत्न करा, ट्राय मारून पाहा.
कदाचित तुम्हाला तुमचीच एक खरी ओळख, खरा चेहरा दिसेल!!
****
समजा;
तुम्हाला इंधुजासारखं स्वत:चं प्रोफाईल लिहायला सांगितलं, तर तुम्ही काय लिहाल स्वत:विषयी?
आणि अपेक्षा?
जोडीदाराविषयी काय अपेक्षा लिहाल?
***
मुख्य म्हणजे खरं खरं लिहा.
आपण लग्न जुळवणार्या साईटवर जशी कोरडी माहिती देतो,
गुळमुळीत शब्दांत काहीबाही सांगतो तसं नको!
खरं, अगदी खरं!
इंधुजानं लिहिलं तितकं फ्री आणि फ्रॅँक लिहिण्याचा प्रयत्न तर करून पाहा!
***
तुम्ही फक्त एकच करा;
इंधुजानं लिहिलंय तसं लिहिण्याचा प्रयत्न करा.
‘स्वत:विषयी’ माहिती लिहा.
आणि
जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत
तेही लिहा.
***
करून तर पाहा ही एक्सरसाईज गंमत म्हणून;
कदाचित तुमचं तुम्हालाच कळेल की,
आपल्याला कसा जोडीदार हवाय;
आपण काय आहोत, हे होणार्या जोडीदाराला
कसं सांगायचं;
आईबाबांना कसं सांगायचं?
**
मग देता एक ट्राय;
लिहा आणि पाठवा आम्हाला.
त्यातून आपण शोधू आपलीच एक ओळख;
आणि डोकावून पाहू इतरांच्या मनात;
शोधू तरी मुलांना आणि मुलींनाही
कसा जोडीदार हवाय?
ते स्वत:कडे कुठल्या नजरेनं पाहतात.?
**
अंतिम मुदत- २५ मार्च २0१५
पाकिटावर- मॅरेज मटेरिअल असा उल्लेख करायला विसरू नका.
सगळ्यात महत्त्वाचं.
‘ऑक्सिजन’ काही तुमचं लग्न जुळवून देणार नाहीये;
त्यामुळे मी प्रोफाईल पाठवतोय/पाठवतेय;
ते आमचं प्रोफाईल कुणाशी तरी मॅच करून द्या; आमचं लग्न तुम्ही जुळवून द्या
असं म्हणत प्लीज फोन करू नका.
हा फक्त अभ्यास आहे; जो तुमच्यासोबत आम्हीही करतो आहोत; एवढंच!
लग्न ठरवताना तुमची तुम्हाला ओळख होण्यासाठीचा एक प्रयत्न आहे, असं समजा!!
इंधुजा पिल्लई
जेण्डर- टॉमबॉय
वय- २३
शिक्षण- बी.ई.
वजन- ६३ किलो.
स्वत:विषयी अधिक माहिती
मी दारू पित नाही, आय हेट स्मोकिंग. अंडं खाते, पण खाण्यापिण्याची काही शौकिन नाही. मला बॅडमिण्टन खेळता येतं, गाता येतं, नाचताही येतं. मला चष्मा आहे, त्यात मी बावळट दिसते. मला शॉपिंगचीही फार आवड नाही, टीव्ही पहायलाही फारसं आवडत नाही. मी वाचतबिचत नाही. तशी बरी वागते, पण फ्रेण्डशिप वगैरे काही देत नाही. मी बायकी नाही, मॅरेज मटेरिअलही नाही. मी आयुष्यात कधीही लांब केस वाढवणार नाही. पण एक खात्री आहे, लाइफटाइम कमिटमेण्ट करीन आणि ती पूर्ण करीन!
जोडीदार कसा हवा?
अ मॅन, शक्यतो दाढी राखणारा, जग पाहण्याची हौस असलेला, जो स्वत:पुरतं कमावतो आणि आपलं काम कसं बोअर आहे अशी तक्रार करत नाही. कुटुंबाची जबाबदारी नसली तर चांगलंच. आईवडीलही लांब असले तर बरे. मुलं आवडत नसतील तर वन एक्स्ट्रा पॉईण्ट. उत्तम पर्सनॅलिटी, चांगलं गाता येतं आणि ३0 मिनिटं सलग उत्तम बोलता येत असेल तर फारच छान!
(इंधुजाच्या वेबसाइटवर असलेल्या तिच्या प्रोफाईलचा स्वैर-संपादित अनुवाद. आजवर तिच्या या वेबसाइटला दोन लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.
ती म्हणते, हे असं प्रोफाईल वाचून माझ्यावर टीका होणार हे उघड आहे. तशी झालीही. पण मी फक्त गोष्टी एक्सप्लोअर करते आहे. मला शोधायचाय मनासारखा जोडीदार. माझ्या आईवडिलांना यानं त्रास होईल असं वाटलं होतं, पण तेही आता नव्या नजरेनं या विषयाकडे बघत आहेत. आता माझ्या या वेबसाइटची चर्चा झाल्यावर अनेकजण माझं कौतुक करताहेत. पण माझं म्हणणं अनेकांना झेपणारं नाही, याची मला जाणीव आहे.)
- ऑक्सिजन टीम