लॉकडाऊनच्या काळात शेतात राबणारे तरुण हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 06:04 PM2020-07-16T18:04:58+5:302020-07-16T18:22:25+5:30

तुमच्याकडं भरपूर शेती नसेल, थोडी असेल, अंगण असेल, तेही नसेल तर गॅलरी असेल, खिडकी असेल, त्यात काही लावता येतं. फुलांची झाडं लावावी, कलम भरावं, बोन्साय करावं, बिया रुजवाव्या.

maharashtra rural young students working in farms in monsoon in coronavirus lockdown. | लॉकडाऊनच्या काळात शेतात राबणारे तरुण हात

लॉकडाऊनच्या काळात शेतात राबणारे तरुण हात

Next
ठळक मुद्देउद्या हे संकट गेल्यावर आपापल्या कामात गुंतल्यावरही लोक शेतीला विसरणार नाहीत असं आता वाटतंय.

- श्रेणीक नरदे

कोरोनामुळे अख्खा भारत लॉकडाऊन झाला. उद्योगधंदे थांबले, ऑफिसं थांबली, शाळा-कॉलेजनी सुटय़ा दिल्या. शहरातील लोक गावी परतले, गावची पोरं घरची घरी राहिली.  आणि एकदम ग्रामीण भागात मनुष्यबळ भरभक्कम झालं. 
गेल्या महिन्याभरात शेती, बागकामाशी संबंधित वेबसाइट, यू-टय़ूब चॅनल यांच्या प्रेक्षकांत भरपूर वाढ झाल्याचं दिसतं. माणसांनी केलेला पहिलावहिला व्यवसाय म्हणजे शेती. शेतीनेच माणसाची भटकंती थांबवली आणि त्याला स्थिरस्थावर होण्यास भाग पाडलं. 
या लॉकडाऊनच्या काळातही अनेकांनी हौशी बागकाम केलं. शेतीतली कामं तर जोरदार सुरू आहेत. 
त्याच्याशी संबंधित माहिती देणारे वेबपोर्टल, वृत्तपत्रं, यू-टय़ूब चॅनल आदी ठिकाणी पडणा:या उडय़ा या साक्षर लोकांच्या आहेत. यातून वेगवेगळे प्रयोग करण्याकडे एकूण तरुणांचा कल वाढलेला दिसतोय. शेताच्या बांधाला फळझाडं लावण्यापासून, शहरांत किचन गार्डन करण्यापासून, ते प्रत्यक्ष शेतात काम करणा:यांची संख्या आज वाढलीय.
शेतातलं काम हे एक क्रिएटिव्ह काम असतं, बिया रुजवणं, त्यांचं अंकुरणं, त्याचं रोपटं होणं, फुलं सुटणं, आणि त्या झाडाला निरोगी फळं येणं हे बघण्यापेक्षा करण्यात मोठ्ठा आनंद असतो. मात्र कामाच्या धावपळीत म्हणा, शाळे-कॉलेजच्या अभ्यासात म्हणा आपण इतके गुंतून गेलेलो असतो की, सहजच एखादी बी पडून ती रुजून फुटून अंकुरलेली बघण्याचंही आपल्याला भान नसतं. 
आता आली टाळेबंदी. सगळं ठप्पं. घरात बसून बसून बसणार तर किती? सातत्याने मोबाइलवर व्यस्त राहणा:यांनाही दोन-चार महिन्यांनी याचा कंटाळा आलाच. त्यामुळे मग गावी आलेले, शिकलेले, नोकरीवाले तरणोही शेताकडे जाऊ लागले.
पूर्वी म्हणलं जायचं, म्हातारी झाली तरी सासू स्वयंपाकघर सोडत नाही, तसंच इकडे पोराचा बापही शेती पोराकडे सोपवायला तयार नसतो. 
यात त्यांची चूक आहे असं नाही, शिकलीसवरली पोरं ही हुकतात त्यामुळे बापाला काळजी वाटते की हा काय शेतात राबणार?
आता हे पहा त्याचं झालं असं, मिरचीचं शेत होतं, त्यावर मुट:या आलता, मुट:या म्हणजे पानं गोळा व्हायला लागतात आणि प्रकाशसंशलेन व्यवस्थित न झाल्यानं झाडांची वाढ खुंटते, तर लॉकडाऊनच्या काळात हौशी पोरगं बापाला म्हटलं मी स्प्रे घेतो. यानं चांगला चार्जिंग पंप अडकवला आणि त्यात औषध कालवलंतं तणनाशकाचं, गडी मस्त नाइट पँट-टी-शर्ट कानात ब्लू टूथ हेडफोन घालून लागला फवारायला, कौतुकानं बापही बांधावर बसून बघू लागला, एवढय़ात टाकी संपली परत औषध भरायला आला. बापानं बघितलं पोरगं तणनाशक कालवतंय. झालं खाल्या शिव्या. 
तर हे असं होतं. 
पण सगळेच काही बिनसुद्धीचे नसतात. पण बाप लोकं  अडवतात त्यावेळी अशीही काही कारणं असतात.
पण पोरांना बापाचे कष्ट पाहवत नाही. चल मी येतो म्हणत ते कामाला लागतात. 
आता पावसाळा. शेतात नव्या लावणीची, पेरणीची लगबग सुरू आहे. यंदा यात मुलांची फार मदत होतीय. विशेष म्हणजे  काही पालक आपल्या तरुण मुलामुलींच्या पद्धतीने नवी शेती करताहेत. 


या काळात आंब्याचे कलम करणं, कोय कलम, गुटी कलम (एअर लेअरिंग), बोन्साय तयार करणं, औषधी वेली झाडं लावणं, गुलाबाचा डोळा भरणं, बाकीची फुलझाडं लावणं असे प्रयोग दरवर्षी होत असतात. मात्र यावेळी त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. 
नवनिर्मिती, सृजनात्मक कामं माणसाला आनंद देत असतात. आताचा हा कोरोनाकाळ अत्यंत निराशेचा आणि भेसूर वाटणारा आहे. यात एकमेव शेती, बागकाम ही कामं मनाला प्रचंड उभारी देत असतात. 
शेतात या दिवसात मजूर मिळत नाही. त्यामुळे कधीकधी पिकं मागास होतात. मात्र यावेळेस पुरेसं मनुष्यबळ आहे. त्यामुळे कामं झटपट उरकत आहेत. घरचेही लोक आपली मूलं आपल्या कामात हातभार लावताहेत हे बघून समाधान पावताहेत. 
भरपूर अंगमेहनत, त्यानंतर बांधावर बसून मोडलेली भाकरी, रात्री थकून येणारी गाढ झोप हे शेतीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदेही मिळताहेत.
हे वर्ष जसं इतर उद्योगधंदावर परिणाम करणारं ठरलं आहे, तसंच ते शेती व्यवसायावरही परिणाम करणारं असेल. बहुतेकांच्या शेतात नवीन पद्धतीने पिकं घेतलेली पद्धतही रुजेल. हे सारं येणा:या उत्पन्नांवर अवलंबून असेलही. 
ज्यांच्या घरची उत्तम आणि पुरेशी शेती असेल, त्यांना शेतातील कोणताही तणाव नसलेलं काम किंवा आपण यातूनही येणा:या उत्पन्नावर आपली गुजराण करू शकतो याची जाणीव जसजशी होईल तशी ही नोकरी, उद्योगव्यवसायातील लोकसंख्या शेतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
शेतीकामाची आवड असणा:यांना या कोरोनाकाळाने एक चांगली संधी दिलीय. नुसतीच आवड असणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम करणं वेगळं. या कोरोनाकाळाने ही संधी दिलीय. 
आता तुमच्याकडंही भरपूर शेती नसेल, थोडी असेल, अंगण असेल, तेही नसेल तर गॅलरी असेल, खिडकी असेल, त्यात काहीही लावता येतं. फुलाची झाडं लावावी, कलम भरावं, बोन्साय करावं, बिया रुजवाव्या यात प्रयोग आहे, मेहनत आहे, सृजनात्मक काम आहे. 
अनेकांना शेतीतून मन:शांती मिळालीय या काळात, उद्या हे संकट गेल्यावर आपापल्या कामात गुंतल्यावरही लोक शेतीला विसरणार नाहीत असं आता वाटतंय.

Web Title: maharashtra rural young students working in farms in monsoon in coronavirus lockdown.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.