रंग नसलेल्या पावसाची जादू
By Admin | Updated: June 25, 2015 14:54 IST2015-06-25T14:54:26+5:302015-06-25T14:54:26+5:30
पाऊस पडून गेला की आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं; त्याला पाहून मातीनं रुसावं का?

रंग नसलेल्या पावसाची जादू
>
पाऊस पडून गेला की
आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं;
त्याला पाहून मातीनं रुसावं का?
सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास,
मला काय दिलंस म्हणून भांडावं का?
***
नाहीच भांडत ती,
मान्य करून टाकते की,
त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं,
उगीच मनाला लावून घ्यायचं नाही,
त्या कोरडय़ा सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं?
***
तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं;
पण तो तिला जगण्याची,
उमलण्याची,
स्वत:तून रंग फुलवण्याची जादू देतो.
त्या जादूनं,
काळ्या मातीतून किती रंग उमलतात,
आणि रंगच कशाला,
किती गंध, किती आकार,
किती प्रकारचं जगणंही बहरतं!
क्षणभर उजळणा:या रंगापेक्षा
स्वत: अनेक रंगांत उमलण्याची जादू
म्हणून तर काळ्या मातीला
किती युगं झाली, हवीच असते त्याच्याकडून.
***
जगण्याचा तोल हा असा असतो,
कुणाला क्षणभराचे रंग मिळतात,
कुणाला सुंदर क्षण मिळतात,
कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं,
तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज.
त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते.
एकदा ती जादू आली की,
रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत,
ते उमलत राहतात,
बहरत राहतात.
***
येत्या पावसाळ्यात
ही जादू आपल्यालाही शिकता येईल.
( एका स्पॅनिश कवितेचा मुक्त अनुवाद)