लाइक्सचं मायाजाल
By Admin | Updated: March 17, 2016 21:36 IST2016-03-17T21:36:28+5:302016-03-17T21:36:28+5:30
आपल्याला हवं तेच आणि तेवढंच इतरांना दाखवून अपेक्षित प्रतिक्रि या मिळवता येतात, जे खऱ्या आयुष्यात करता येणं शक्य नसतं

लाइक्सचं मायाजाल
मुक्ता चैतन्य ( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
आपल्याला हवं तेच आणि तेवढंच इतरांना दाखवून अपेक्षित प्रतिक्रि या मिळवता येतात, जे खऱ्या आयुष्यात करता येणं शक्य नसतं. खऱ्या जगण्यात आपल्याला अपेक्षित तेच घडत नाही. अनपेक्षित धक्के, अपयश, उपेक्षा हे सारं वाट्याला येतंच! त्यापेक्षा आॅनलाइन जग बरं. वाटेल तेव्हा आॅन, वाटेल तेव्हा आॅफ ! त्यामुळे तिथं आपली जी प्रतिमा तीच खरी, असं मानून स्वत:चा स्वत:शी झगडा सुरू होतो. आणि व्यसनाच्या गर्तेत आपण ‘स्वत:ला’च हरवून टाकतो! हातातला स्मार्ट फोन, त्यावरचं इंटरनेट आणि त्यानं आपल्याला जगाशी एका क्षणात जोडून टाकणं या सगळ्यातून आपल्यात एक प्रकारचं मानसिक परावलंबत्व येतंय. मानसोपचारतज्ज्ञ, समाज शास्त्रज्ञ त्याला ‘व्यसन’ म्हणतायेत. कालपर्यंत इंटरनेट आणि मोबाइलवर सतत खेळल्या जाणाऱ्या गेम्सच्या सवयीला व्यसन म्हटले जात होते, आज स्मार्ट फोनचा अतिकेरी वापर हेच व्यसन आहे असं म्हणायला आणि मानायला सुरु वात झाली आहे. सोशल मीडिया मार्केटिंग तज्ज्ञ जेसन थिबल्ट यानं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती, ‘व्हाय आय जस्ट क्विट फेसबुक’. या पोस्टनंतर जगभरात त्यावर प्रचंड चर्चेला सुरु वात झाली. या पोस्टमध्ये जेसन लिहितो, ‘न्यूज फीड हे माझं व्यसन बनलं होतं. त्याचे अलर्ट सतत माझ्या फोनवर वाजत राहायचे. ते वाचण्यात माझा प्रचंड वेळ जायला लागला आणि सगळ्यात भयंकर म्हणजे, माझं जे काम मला खूप आवडतं त्याकडे मी दुर्लक्ष करायला लागलो. मी जेव्हा जेव्हा फेसबुकवर अपडेट्स बघतो माझ्या मेंदूतली रासायनिक प्रक्रि या बदलते, मला मिळणाऱ्या लाइक्समुळे माझ्या मेंदूतली रासायनिक प्रक्रि या ड्रग्ज घेतल्यानंतर जशी बदलते तशी बदलायला लागली आणि मग त्या सुखाच्या-धुंदीच्या आनंदासाठी माझा मेंदू मला पुन्हा पुन्हा सोशल मीडियावर जाण्यासाठी उद्युक्त करायला लागला. मग मात्र मी फेसबुक सोडून निघून गेलो.’ जेसनची ही प्रतिक्रि या खूपच बोलकी आहे. पण जेसनला हे जे जमलं ते भल्याभल्यांना जमणं कठीण आहे. कामाच्या आणि मनोरंजनाच्या गरजेच्या पलीकडे सातत्यानं फक्त आभासी जगातच वावरण्याच्या सवयीला ‘इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर’ असं म्हटलं जातं. गेली काही वर्षे इंटरनेटचा अतिरेकी वापर हा आजार आहे की नाही यावर जगभरात ऊहापोह चालू होता. पण आता जगभरातले मानसोपचारतज्ज्ञ इंटरनेटचा अतिरेकी वापर हा आजार असल्याचं मान्य करतात. अर्थात जेव्हा हा एक मानसिक आजार आहे असं आपण म्हणतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेटचा वापर कुणी करूच नये असं कुणाचंही म्हणणं नाही. इंटरनेटचे अगणित फायदे आहेत. कामासाठी, मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर करणं, जगभरातल्या घडामोडी समजून घेणं हे सारं घडत इंटरनेटनं जग जवळ आणलं आहे, यात काहीच वाद नाही. दुमत नाही. मात्र सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतही चुकूनमाकून जाग आली तर लगेच सोशल साइट्स चेक करणं हे काही ‘उत्तम आणि गरजेचा’ वापर यात मोडत नाही. गरज आणि ही अतिरेकी ओढ यात पुष्कळ अंतर आहे. आपलं जगणंच या आभासी जगाशी, स्वत:च्या सुखदु:खाशी जोडून टाकणं, त्यासाठी बेचैन होणं, प्रत्यक्ष बोलण्याऐवजी व्हर्च्युअलीच बोलणं जास्त व्हायला लागलं की समजायला हरकत नाही की आपल्याभोवती या व्यसनाचा विळखा पडायला सुरु वात झाली आहे. आपल्या हातात स्मार्ट फोन, टॅब आणि इतर अनेक गॅजेट आल्यानंतर आपल्यात अगणित बदल झाले आहेत. आपल्या नात्याची गणितं बदलली आहेत, देह प्रतिमा बदलली आहे, सेल्फी काढण्याचं खूळ मानगुटीवर बसून नाचतं आहे. एकीकडे आपण आत्मकेंद्री बनत आहोत, तर दुसरीकडे आपण नको इतके उघडेवाघडे झालो आहोत. अनेकदा तर खऱ्या जगापेक्षा आपण आभासी जगातच अधिक कम्फर्टेबल असतो. पण यातून आपण अधिक तणावग्रस्त होत जातो. मनाच्या तळाशी साठून राहिलेला राग, निराशा आभासी जगातल्या वावराने कमी होत नाही, तर ती वाढत जाते. आपण इम्पलिसव्ह होत जातो. आपल्याच न कळत आपण निराशेला आमंत्रण देत असतो. आपल्या मनात होणाऱ्या आणि बऱ्याचदा हाताबाहेर जाणाऱ्या या गोष्टी नीट समजावून घेण्याची वेळ आली आहे. लाइक्सचं मायाजाल, सेल्फीचा भयंकर खेळ, निराशेची आवर्तनं, नात्याची गोची या प्रत्येक मुद्द्यावर नेमकं मनाच्या पातळीवर, समूहात आणि कुटुंबात काय काय घडतंय? या व्यसनापासून दूर राहायचं आणि तरीही इंटरनेटचा आनंद घ्यायचा कसा यावर पुढच्या काही भागांमध्ये चर्चा करूया... तोवर, दिवसभरात २५ वेळा फेसबुक आणि व्हॉट्सअॅप चेक करत असाल तर आजपासून २० वेळाच करण्याचा प्रयत्न करूया.. एक छोटीशी सुरुवात.. आपली आपल्यासाठी, जमेल? - सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार यांच्याशी इंटरनेट अॅडिक्शनसंदर्भात बोललं तर लक्षात येतं की, आभासी जगातला वावर, त्यामुळे निर्माण होणारा ताण आणि स्वप्रतिमेबद्दलचा घोळ हे नवेच प्रश्न आता या व्यसनाच्या पोटातही दिसू लागले आहेत. हे व्यसनच !! इंटरनेटचा अतिरेकी वापर हे व्यसन आहे का? तर आहे. ड्रग्ज घेणं, दारू पिणं या व्यसनाप्रमाणेच हेही एक व्यसन आहे. सिगारेटची तलफ येते, एका विशिष्ट वेळी दारू प्यायली नाही तर अस्वस्थ वाटतं तसंच काहीसं याही व्यसनाचं आहे. थोड्या थोड्या वेळानं सोशल मीडियावरील नोटिफिकेशन तपासून बघण्याची इच्छा प्रचंड प्रमाणात उफाळून येणे आणि ती काबूत ठेवता येत नाही ही व्यसनाचीच लक्षणं आहेत. इंटरनेट वापराचा रोजचा कालावधी किती आहे, त्यावर वावरतानाचा व्यक्तीचा स्वभाव या सगळ्याचा विचार करून व्यसन लागण्याइतपत नेटचा वापर वाढला आहे की नाही हे ठरवलं जातं. सततच्या वापरातून मनावर ताण निर्माण होतो, तो घालवण्यासाठी पुन्हा पुन्हा मन त्या वापराकडे वळतं. हे चक्र सतत चालू राहतं आणि हळूहळू आभासी जग आणि प्रत्यक्ष जग यातलं अंतर कमी होऊन, ज्या जगात स्वप्रतिमेला अधिक बळकटी मिळते तिथं रमणं सुरू होतं. सत्य आणि आभास यामधील भांडण! आभासी जग आणि प्रत्यक्ष जग यातला तिढा हा खरतर स्वप्रतिमेचा खेळ आहे. खऱ्या प्रत्यक्ष जगण्यात/वागण्यात आत्मविश्वास नसणं, स्वप्रतिमा बळकट नसणं अशा अनेक कारणांमुळे व्यक्ती आभासी जगातील कौतुक, प्रशंसा यावर अवलंबून राहायला सुरु वात करते. पण मुख्य म्हणजे खऱ्या जगण्यातील आनंद, राग, द्वेष, मत्सर, प्रेम, आकर्षण या भावना खऱ्या जगापुरत्याच मर्यादित न राहता आभासी जगातही महत्त्वपूर्ण बनतात तेव्हा स्वप्रतिमा बनवणं किंवा मोडून पडणं या गोष्टींना सुरु वात होते. अधिक यश कुठं? खऱ्या जगात की आभासी जगात? - असा प्रश्न निर्माण झाल्यावर आभासी जगात जर अधिक यश आणि प्रशंसा मिळत असेल तर व्यक्ती त्या खोट्या जगात वावरणंच अधिक पसंत करतो. तेच त्याला त्याचं खरं जगणं वाटू लागतं. यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हवं तेव्हा या आभासी जगाला बंद करता येतं. आपल्याला हवं तेच आणि तेवढंच इतरांना दाखवून त्यांच्या अपेक्षित प्रतिक्रि या मिळवता येतात, जे खऱ्या आयुष्यात करता येणं शक्य नसतं. खऱ्या जगण्यात अनेकदा अपेक्षित असेल ते घडतंच असं नाही. अनपेक्षित धक्के, अपयश, उपेक्षा अशा नकोशा भावनांना खऱ्या आयुष्यात सामोरं जावं लागतं. अनेकदा या साऱ्याला तोंड देताना प्रचंड मानसिक ताकद लावावी लागते. आभासी जगात मात्र यातलं काहीच करण्याची गरज नसते. त्यामुळे तिथला वावर अधिक सोपा आणि सहज वाटतो.